Wednesday, May 13, 2020

शिक्षक कोरे यांच्या वारसांना आर्थिक मदत करण्याची मागणी

जत शिक्षक भारतीने घेतली तहसिलदार सचिन पाटील यांची भेट
 जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर  डफळापूरजवळ चेक पोस्टवर ड्युटी करणारे शिक्षक  नानासो कोरे यांचा काल झालेल्या अपघाती  मृत्यू दुर्दैवी असून या अनुषंगाने त्यांच्या वारसांना एक कोटी रुपयाची आर्थिक मदत करावी व  वारसांना विनाअट शासकीय सेवेत घेण्यात यावे याबाबत  जत तालुका शिक्षक भारतीच्यावतीने जतचे तहसीलदार सचिन पाटील यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.

याबाबत तहसीलदार सचिन पाटील यांनी मृत शिक्षक नानासो कोरे यांच्याबाबत शासकीय मदत मिळवून देण्यासंदर्भात आवश्यक असणारे सर्व प्रस्ताव तयार केलेले आहेत,असे सांगितले. आज रोजी स्वर्गीय नाना कोरे यांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली असल्याचेही सांगितले
चेक पोस्टवर कार्य करणारे शिक्षक यांच्या बारा तासाच्या ड्युटी ऐवजी आठ तास ड्युटी करण्यात यावी याबाबतही तहसीलदार यांच्याशी चर्चा केली. यावेळी तहसीलदार यांनी बारा ऐवजी आठ तासांची ड्युटी शिक्षकांना देण्यात येईल, असे सांगितले
बाज केंद्रातील प्राथमिक शिक्षकांचे पगार अद्यापही शिक्षकांच्या खात्यावर जमा नाहीत याबाबत ही तहसीलदार यांना सांगितले असता  तहसीलदार यांनी  संबंधित बँकेतील कर्मचाऱ्यांना शिक्षकांचे पगार तात्काळ जमा करण्याचे आदेश दिले.
 यावेळी शिक्षक भारती अध्यक्ष दिगंबर सावंत, नवनाथ संकपाळ, जिल्हा उपाध्यक्ष मल्लय्या नंदगाव, तालुका उपाध्यक्ष अविनाश सुतार, जितेंद्र बोराडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment