Tuesday, May 5, 2020

कवठेमहांकाळ तालुक्यातील घोरपडी येथील एकजण कोरोना बाधित

आरोग्य यंत्रणेच्या सतर्कतेमुळे त्वरित उपचाराखाली
  व्यक्तीचा मेहुणा संपर्कात, तो जत तालुक्यातील बेवणूरचा

 सांगली ,(जत न्यूज वृत्तसेवा)-
मुंबईहून घोरपडी(ता.कवठेमहांकाळ) येथील मूळ गावी येणाऱ्या 41 वर्षीय व्यक्तीस कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कवठेमहांकाळ येथील ही कोरोना बाधित ही दुसरी व्यक्ती आहे. दरम्यान, याच्या संपर्कात एकमेव मेहुणा आला असून त्यालाही तपासणीसाठी नेण्यात आला आहे. हा मेहुणा जत तालुक्यातील बेवणूर गावचा आहे. कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यातील लोक मुंबईला कामानिमित्त मोठ्या प्रमाणात आहेत. ही मंडळी मोठ्या संख्येने आपल्या मूळ गावी येऊ लागल्याने गावागावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मुंबई येथील ट्रक वर काम करणारा एक जण ट्रकमधुन इस्लामपूर येथे आला. तेथून तो टँकरमधून कवठेमंकाळ तालुक्यातील घोरपडी या आपल्या गावाकडे निघाला होता‌ . तथापि मुंबई येथून आल्याने सदर व्यक्तीची वैद्यकीय तपासणी चोरोची येथे करण्यात आली. यावेळी या व्यक्तीची लक्षणे कोरोणा संशयित वाटल्याने तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला ढालगाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडे तपासणीसाठी पाठविले.
या ठिकाणी असणाऱ्या डॉ. सतीश कोळेकर यांनी त्या व्यक्तीला कवठेमंकाळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. डी. आर. पाटील यांच्याकडे संदर्भित केले. त्यांनी जिल्हा आरोग्य यंत्रणेची संपर्क केला असता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी तात्काळ 108 रुग्णवाहिकेद्वारे सदर व्यक्तीला मिरज येथील आयसोलेशन कक्षात दाखल केले. काल या व्यक्तीचा स्वाब घेण्यात  आला होता. आज त्याचा रिपोर्ट प्राप्त झाला असून सदर व्यक्ती कोरोणा बाधित असल्याचा अहवाल मिळाला आहे. या व्यक्तीला  त्याच्या गावाकडे जाऊ न देता रस्त्यातच त्याची  तपासणी केल्याने पुढील अनर्थ टळला. आरोग्य यंत्रणेने केलेल्या तत्पर हालचालींबद्दल जिल्हाधिकारी डॉ .अभिजीत चौधरी यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

No comments:

Post a Comment