Monday, May 4, 2020

गड्या, आपला गावच बरा!

लॉकडाऊनमुळे गावांतील लोकसंख्येत सात टक्क्यांनी वाढ

भारत देश खर्‍या अर्थाने ४0 हजार खेड्यांमध्येच वसला आहे, त्यामुळे गावाकडेच चला, असे महात्मा गांधी म्हणायचे. अर्थात महात्मा गांधींच्या त्यामागचा उद्देश हा गाव-खेड्यांच्या विकासाच्या दृष्टीचा होता. पण सध्या देशातील कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे आणि शहरांमध्ये कोरोनाचे भय जास्त असल्याने याकाळात गावातील लोकसंख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. ही वाढ सात टक्के इतकी नोंदवली गेली आहे.

सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च (सीपीआर) या संस्थेने केलेल्या अभ्यासात शहरातील लोकसंख्येत जवळपास ११ टक्क्यांची घट झाल्याचे समोर आले आहे. तर गावातील लोकसंख्येत सात टक्क्य़ांची वाढ दिसून आली आहे. लॉकडाउनमुळे लोकांचे गावाकडून शहरात होणार अप-डाउन बंद झाले आहे, असेही या अहवालात समोर आले आहे. कोरोना संक्रमणाला आळा घालण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. ३ मे रोजी लॉकडाउनचा दुसरा टप्पा पूर्ण झाला आणि त्यानंतर १७ मेपर्यंत लॉकडाउनच्या तिसर्‍या टप्प्याचीही घोषणा झाली. लॉकडाउनमुळे भारतातील लोकसंख्येवर काय परिणाम होतोय, याचाही अभ्यास केला जात आहे. यात अनेक मुद्दे निदर्शनास आले आहेत. लॉकडाउनमुळे लाखोंच्या संख्येने गावाकडील लोक शहरात येणे आता बंद झाले आहे. यामुळे शहरानजीकच्या गावांमध्ये लोकसंख्येत वाढ  झाली आहे. यात राजस्थानचा पश्‍चिम भाग, ओडिशा येथे सर्वाधिक स्थलांतरणाचे प्रमाण आढळून आले आहे. प्रवासी मजुरांनी केलेले पलायन हे यामागचे कारण असू शकते, असे सीपीआर संस्थेचे वरीष्ठ अधिकारी पार्थ मुखोपाध्याय यांनी सांगितले.
लक्षवेधी बाब अशी की जास्त लोकसंख्या असलेल्या आणि गरीब राज्य म्हणून पाहिल्या जाणार्‍या बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये लोकसंख्येत जास्त वाढ झालेली नाही. या राज्यांमधून मोठय़ा संख्येने लोक इतर राज्यांमध्ये जात असतात. लॉकडाऊनमुळे रेल्वेसेवा बंद आहे. त्यासोबतच राज्यांच्याही सीमा सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बिहार आणि उत्तर प्रदेशमधील लाखोंच्या संख्येने लोक इतर राज्यांमध्ये अडकून पडले आहेत. मजुरांसाठी रेल्वे सुरु करण्यात आली आहे, त्यामुळे  येत्या काळात या आकडेवारीत लक्षणीय वाढ होऊ शकतो.

No comments:

Post a Comment