Sunday, May 3, 2020

बाजारपेठ, उद्योग, बांधकामे, वाईन शॉप सुरू

हॉटेल, पानपट्टी, बार बंदच! सोशल डिटन्स पाळावाच लागेल
सांगली,(जत न्यूज वृत्तसेवा)-
 राज्यात 17 पर्यंत लॉकडाऊन असले तरी सांगली जिल्हा ऑरेंज झोनमध्ये असल्याने बऱ्याच गोष्टी सुरू करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे वाईन शॉप सुरू होणार असल्याने दारूप्रेमी खूश झाले आहेत. दरम्यान, शाळा-महाविद्यालय, हॉटेल, पानपट्टी, बार, सार्वजनिक प्रवासी वाहतूक बंद राहणार आहेत.

अत्यावश्यक सेवा वस्तूंची बाजारपेठ सुरू करण्यांत येणार आहे. मान्सून पूर्व कामे, उद्योग, बांधकामे यांना सशर्त परवानगी देण्यात आली आहे. मात्र पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसे झाल्यास कलम144 नुसार कारवाई करण्यात येईल. अंत्यसंस्कारासाठी पूर्वीप्रमाणे 20 लोकांना एकत्र येण्यास परवानगी आहे. तर लग्न समारंभाला 50 लोकांना एकत्र येण्यास परवानगी देण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, नागरी वस्तीतील कमी गर्दीच्या ठिकाणची केसकर्तनालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेतच वैयक्तिक कारणासाठी फिरण्यास परवानगी आहे. काही बाबींना शिथिलता देण्यात आली असली तरी यापुढे कायम मास्क वापरण्यास सक्ती करण्यात आली आहे. याशिवाय सोशल डिस्टनशिंग पाळणे, अनावश्यक गर्दी न करणे या अटींचे पालन करावे लागणार आहे.
सांगली जिल्ह्यात लॉक डाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आल्याने रेड झोनमधून आपण ऑरेंज झोनमध्ये आलो आहे. यापुढेही नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत. आपण नियम नाही पाळले तर पुन्हा रेड झोनमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे  परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी आपण नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली पाहिजे, असे डॉ.चौधरी म्हणाले.

No comments:

Post a Comment