Friday, May 29, 2020

उत्तम प्रशासक :मुख्याध्यापक राजेंद्र कारंडे

सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळ, सनमडी संचलित राजर्षी शाहू महाराज आश्रमशाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र कारंडे हे 31 मे रोजी आपल्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होत आहेत. संस्थेची मुहूर्तमेढ लावलेल्या श्री . कारंडे सरांनी  आपल्या कामांतून संस्थेच्या विस्ताराला मोलाचा हातभार लावलाच शिवाय तालुक्यात संस्थेची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांनी आपल्या तालुक्यातील भटक्या-विमुक्त विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी या शिक्षण संस्थेची निर्मिती केली.
अर्थात ही संस्था उभी करताना आणि ती पुढे नेटाने चालवताना राजकीय त्रासाला सामोरे जावे लागले. पण माजी आमदार सनमडीकर यांनी संस्था फक्त चालवली नाही,तर त्याचा विस्तार केला आणि शिक्षण क्षेत्रातील अग्रगण्य संस्था म्हणून नावलौकिकही मिळवला. आज सिद्धार्थ शिक्षण प्रसारक मंडळाच्या संस्थेअंतर्गत जतसह सनमडी आणि माडग्याळ येथेही आश्रमशाळा आहेत. विशेष म्हणजे आज या आश्रमशाळा स्वतःच्या इमारतीत मोठ्या थाटामाटात उभ्या आहेत. आणि सुमारे एक हजारांवर मुले शिक्षण घेत आहेत.
हे सगळे सांगायचे कारण म्हणजे मुख्याध्यापक राजेंद्र कारंडे सर यांचा या संस्थेच्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. संस्था उभी करण्यापासून ते आजच्या त्याच्या वटवृक्षापर्यंतच्या प्रवासात त्यांचे परिश्रम, जिद्द  वाखाणण्यासारखे आहे. जतमध्ये  मार्केट यार्डमध्ये 31 वर्षांपूर्वी आश्रमशाळेची मुहूर्तमेढ उभी राहिली. या शाळेचे पाहिले मुख्याध्यापक होते राजेंद्र कारंडे सर! जत शहरात विठ्ठलनगर, पारधीवस्ती, वडरगल्ली या भागात फिरून मुलांच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगून त्यांनी मुले गोळा केली. तेव्हा खरे तर या समाजात आजच्यासारखी शिक्षणाची परिस्थिती नव्हती. मुलांना शिक्षणाचा गंध नव्हताच,पण पालकांनाही शिक्षणाचे महत्त्व माहीत नव्हते. मुलं फक्त भटकंती करायचे. अशा प्रतिकूल परिस्थितीतही श्री. कारंडे सरांनी मुले गोळा केली. पाहिल्यावर्षी पहिली आणि दुसरीचे वर्ग सुरू करण्यात आले. त्यावेळचा पट होता 30. या मुलांना दिवसभर वर्गात आणि रात्री शाळेत थांबवून ठेवणे मोठे कठीण राहायचे. शिक्षणाचा गंध नसलेल्या या मुलांना त्याची गोडी लावून त्यांना शाळेत थांबवण्याचं काम करत असतानाच चौथीपर्यंत शाळेचा पट दोनशेच्या वर नेला. नंतर सातवीपर्यंत मुलांना शिक्षण मिळू लागले. आज तर संस्था माध्यमिक आश्रमशाळाही चालवत आहे.
मला या संस्थेत तीन वर्षे काम करण्याची संधी मिळाली. 1992 ते 1995 या कालावधीत मी याठिकाणी सहाय्यक शिक्षक म्हणून काम केले आहे. पहिल्यांदा मार्केट यार्डात शाळा भरत होती. नंतर ती जत-विटा मार्गावरील निगडी कोपऱ्यावर सनमडीकर हॉस्पिटलच्या नव्या इमारततीत शाळा भरू लागली होती. अजून हॉस्पिटल सुरू व्हायचे होते. मुख्याध्यापक श्री. कारंडे सर यांच्या नेतृत्वाखाली आणि माजी आमदार सनमडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेची भरभराट होत होती.  शिक्षकही नव्या दमाचे होते. या सगळ्यांच्या प्रयत्नांतून शाळेने आपला एक वेगळा ठसा निर्माण केला होता आणि तो आजही आहे.
श्री. कारंडे सर यांना फक्त शाळेचा ध्यास होता. सतत कामात व्यग्र असायचे. सर्वांकडून उत्तम प्रकारे कसे काम होईल, याबाबतीत त्यांचा कटाक्ष असे. आश्रमशाळांवर समाज कल्याण विभागाचे नियंत्रण आहे. या विभागाची करडी नजर संस्थांवर असते.  समाज कल्याण खात्याने संस्थेवर बोट ठेवू नये, असे उत्तम कामकाज करण्याची त्यांची धडपड असायची. संस्था आणि समाजकल्याण विभाग यांच्यात उत्तम समनवय साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला. उत्तम प्रशासक म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेता येईल.

शाळेत विविध उपक्रम राबवण्याबरोबरच विद्यार्थ्यांना कसल्याच अडचणी येऊ नयेत, यासाठी त्यांचा सतत प्रयत्न राहिला आहे. आज शाहू आश्रमशाळा ही शहरातील एक नावाजलेली शाळा आहे. जत-वळसंग मार्गावर असलेल्या या शाळेला उत्तम परिसर लाभला आहे. स्वतंत्र, हवेशीर आणि सर्वसोयीनियुक्त वर्गखोल्या लाभलेल्या आहेत. वसतिगृह आणि स्वयंपाक खोल्या, स्वच्छतागृहे अशा सर्व सुविधा इथे उपलब्ध आहेत. परिसरात झाडे असल्याने एक रम्य वातावरण तयार झाले आहे. या सगळ्यात श्री. कारंडे सरांचा वाटा मोठा आहे. आज संस्थेची कमान डॉ. कैलास सनमडीकर यांच्याकडे आहे. विविध उपक्रम राबवताना शाळा नेहमी 'टॉप'वर कशी राहील,यासाठी डॉ. सनमडीकर यांचा प्रयत्न असतो. जत येथील जत हायस्कूलचे मुख्याध्यापक आणि प्राचार्य राहिलेले डॉ. श्रीपाद जोशी यांचे  काही काळ मार्गदर्शन घेऊन शाळांमध्ये विद्यार्थीहित जोपासणारे उपक्रम राबवले गेले.
श्री. कारंडे सर यांच्या या कार्याची दखल संस्थेने तर घेतलीच,पण समाजकल्याण विभागानेही दाखल घेऊन त्यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देऊन गौरव केला. शिक्षण सेवक सोसायटी, सांगली यांनीही त्यांना आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार देऊन सन्मान केला. आज श्री. कारंडे सर आपल्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होऊन आपल्या नवीन जीवनाला सुरुवात करणार आहेत. त्यांना उत्तम आरोग्य लाभो, हीच प्रार्थना!-मच्छिंद्र ऐनापुरे, जत

4 comments:

 1. खूप खूप शुभेच्छा

  ReplyDelete
  Replies
  1. आपल्याला खूप खूप शुभेच्छा व व उत्तम आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

   Delete
 2. सर आपल्या उत्तम कार्याला कोटी कोटी शुभेच्छा..
  सेवानिवृत्तीनंतर उत्तम सदृढ आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...

  ReplyDelete
 3. सर आपल्या उत्तम कार्याला कोटी कोटी शुभेच्छा..
  सेवानिवृत्तीनंतर उत्तम सदृढ आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...

  ReplyDelete