Monday, May 25, 2020

अफवा पसरवल्यास गुन्हा: आवटे

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
शहरातील त्या तरुणाचा मृत्यू कोरोनाने झाला नसून त्याच्यात कोणतेही लक्षण आढळले नाही. त्याच्या शरीरात काविळ व रक्ताचे प्रमाण कमी होते. म्हणून त्याचा मृत्यू झाला आहे. तरीही प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने आई व वडील यांच्यासह सहा जणांना क्वारंटाईन केले जाईल.मात्र, याबाबतची खात्री न करता सोशल मीडियावर कोरोनामुळे तरुणाचा  मृत्यू झाल्याची खोटी माहिती पसरवली. अधिकृत माहिती असल्याशिवाय सोशल मीडियावर अशा खोट्या अफवा पसरवल्यास गुन्हा दाखल करू, असा इशारा जतचे प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांनी पत्रकार बैठकीत दिला.

ते म्हणाले, “तालुक्यात बसर्गी व शहरात आलेल्या तिघांना मिरजेला नेण्यात आले असून, त्यांचाही अहवाल प्राप्त होणार आहे. लोकांनी जत शहरातील त्या मृत तरुणाच्या बाबतीत घाबरून जाऊ नये, प्रशासनाने योग्यती खबरदारी घेतली आहे. शहरातील वृद्ध हृदय रोग, दमा, श्वसनाचे त्रास, यासह गंभीर आजार असलेल्या व्यक्तींची माहिती घेतली जात असून त्यांच्याबद्दल विशेष काळजी घेण्यात येणार आहे. प्रशासकीय यंत्रणा पूर्ण ताकदीने आज अखेर काम करत आली आहे. यापुढे ही करत राहील. मात्र, सोशल मीडियावर खोट्या अफवा पसरवल्यामुळे यंत्रणेवरील ताण वाढणार आहे.
त्यामुळे सर्वांनीच अफवांकडे दुर्लक्ष करा. सोशल मीडियावर खोटी माहिती पसरविल्यास सायबर क्राईम अंतर्गत व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमीन, संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल. यावेळी तहसीलदार सचिन पाटील, नगरपरिषद मुख्याधिकारी अभिजित हराळे, तालुका वैद्यकीय अधिकारी संजय बंडगर, जत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक मोहिते, पोलिस निरीक्षक रामदास शेळके आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment