Friday, May 22, 2020

जीवनात परीक्षा हेच अंतिम ध्येय नव्हे

प्राचार्य डॉ.व्ही.एस. ढेकळे
राजे रामराव महाविद्यालयात 'नैराश्यावर बोलु काही'  कार्यक्रम

जत ,(प्रा तुकाराम सन्नके)-
परीक्षा जवळ आली की, कित्येक विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारची भीती निर्माण होते. या भीतीतूनच स्वत:च्या प्रयत्नावर व क्षमतेवर शंका निर्माण होऊन, यातून न्यूनगंड व नैराश्य जन्माला येते. जर या भीतीचं रूपांतर नैराश्यामध्ये झाले तर तो विद्यार्थी प्रयत्नशून्य बनतो. यालाच टेन्शन असे म्हणतात. अशावेळी त्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करून त्यांच्यात आत्मिक बळ निर्माण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ व्ही एस ढेकळे यांनी व्यक्त केले.
ते राजे रामराव महाविद्यालयाच्या विद्यार्थी मार्गदर्शन व समुपदेशन कक्ष, विद्यार्थी विकास कक्ष व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विशेष वेबीनारचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मानसोपचारतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जसा वाढतोय, तसा नागरिकांच्या वागणुकीवर परिणाम दिसून येत आहे. लॉकडाऊननंतर लोक घरीच राहिल्याने परिस्थिती आणखीनच बिघडली आहे. हाताला काम नाही, आर्थिक संकट, जीवनशैलीत बदल आणि मुलभूत सोयी-सुविधांचा अभाव यामुळे लोकांच्या मानसिक आरोग्यावर याचा परिणाम होत आहे.
       
दुसर्‍या सत्रात व्याख्याते म्हणून डॉ श्रीकांत कोकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, कोरोना व्हायरसमुळे देशातील नागरिकांचे मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे. कोरोनाच्या भितीने मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होत अनेक लोक नैराश्याच्या आहारी जाऊ लागले आहेत. आपण 15 ते 29 या वयोगटाचा विचार केला तर लक्षात येईल, तरुण वर्गावर अभ्यास, शिक्षण, करिअर याचं खूप जास्त दडपण पाहायला मिळतं. हे दडपण, एकाच प्रकारचं नसून ते समाजाचं, घरचं, रिलेशनशिप, नोकरी, रोजगार आणि जबाबगारी याचं असतं. याच वयात तरुणांना नैराश्याला सामोरे जावे लागते. मात्र योग्य मार्गदर्शन व समुपदेशन केले गेले तर नैराश्यावर मात करता येते.
       या वेबीनारचे स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ संजय लठ्ठे यांनी केले तर आभार डॉ शिवाजी कुलाळ यांनी व्यक्त केले. प्रा. दिपक कुंभार व अभयकुमार पाटील यांनी या मार्गदर्शनपर व्याख्यानाचे नियोजन केले होते. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment