Friday, May 29, 2020

ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व संचारबंदी लागू असल्याने राज्य व महानगरातील कामगार मजूर वर्ग स्वगृही परतले आहेत. ग्रामीण भागातील कामधंदेसुद्धा लॉकडाऊनमध्ये बंद असल्याने हाताला कामे नाहीत. यामुळे उपजीविकेची मोठी समस्या निर्माण झाली आहे, यासाठी शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची कामे उपलब्ध करून देऊन बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे, असे मत केंद्रीय रेल्वे बोर्डाचे संचालक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी केली आहे.

जत तालुका हा विस्ताराने मोठा आहे. तालुक्यातील सर्वाधिक लोक हे पुण्या- मुंबईला गेले होते ते आता जत तालुक्यात परत आले आहेत.  पश्चिम महाराष्ट्र व दक्षिण महाराष्ट्र याच बरोबर जिल्ह्यात सर्वात मागासलेला तालुका म्हणून जत तालुक्याची ओळख आहे. तालुक्यात कुठलेच उद्योगधंदे नसल्याने कामगार व मजूर वर्ग मुंबई, पुणे, औरंगाबाद, सुरत, आदी महानगरासह विट उद्योग व ऊस तोडणी करिता कुटुंबासह कामाच्या शोधात दरवर्षी मोठ्या प्रमाणात स्थलांतर करीत असतात. आधीच गावातील मजुरांच्या हाताची कामे संचारबंदी मुळे बंद झालेली असताना आणखी त्यात महानगरातून आलेल्या मजुरांची भर पडल्याने रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
ग्रामीण भागात मजुरांच्या हाताला काम
नसल्यामुळे आता जगायचे तरी कसे? असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झालेला आहे. त्यामुळे शासनाने मनरेगा अंतर्गत येत असलेल्या खत निर्मितीचे खड्डे, गांडूळ व कंपोस्ट खतासाठीचे खड्डे, माती नालाबांध, समपातळी चर, समपातळी बांध, दगडी बांध, शेतातील बंदिस्त बांध, भूमिगत बंधारे, शेततळे, आदि कामाला सुरुवात केल्यास मजुरांच्या हाताला काम मिळेल व शेतकऱ्यांना सुद्धा याचा लाभ होईल अशी मागणी श्री. जमदाडे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment