Friday, June 5, 2020

शाश्वत विकासासाठी पर्यावरण व जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन ही काळाची गरज: प्राचार्य डाॅ. युवराज भोसले

जत (जत न्यूज वृत्तसेवा)-
शाश्वत विकास हा  मानवाच्या सध्याच्या व भविष्यातील गरजांची प्रतीपूर्ती करतो. पर्यावरण व जैवविविधतेचे  संरक्षण करणारा शाश्वत विकास ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था (कोल्हापूर)चे प्रशासन सहसचिव प्राचार्य डाॅ. युवराज भोसले यांनी केले. ते  जत येथील राजे रामराव महाविद्यालयामधील रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन-२०२० निमित्त आयोजीत "शाश्वत विकासासाठी पर्यावरण व जैवविविधता" या दि. ४ व ५ जून या दोन दिवसीय पहिल्या आॅनलाईन परिषदेच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डाॅ. विठ्ठल ढेकळे होते.

         डाॅ. भोसले पुढे म्हणाले की, निरंतर चालणा-या मानवी विकासाच्या प्रक्रियेत नैसर्गिक साधनसंपत्ती वारेमाप वापर केला जात आहे. मानव व पर्यावरण यांचा परस्परसंबंध असून त्यातून आर्थिक विकास साधला जातो. परंतु लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम पर्यावरण बिघाडावर होत आहेत व मानवी हस्तक्षेपामुळे प्रदुषण व जागतिक तापमानवाढ यांमुळे संपूर्ण जैवविविधतेचे अस्तित्व धोक्यात आल्यामुळे जागतिक पर्यावरण व विकास आयोगाने १९८७ पासून शाश्वत विकासाची संकल्पना  उदयास आणली. यातून भावी पिढीच्या गरजा भागविण्यासाठी निसर्गाला इजा न करता मानवी गरजांची पूर्तता करत विकास साधणे गरजेचे आहे. यासाठी विकासाचा दर्जा सुधारून त्याचे पुनरुज्जीवन करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे, अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, रोजगार व सर्वच मूलभूत गरजा पुरवणे, पर्यावरण व जैवविविधतेचे संरक्षण करणे, सेंद्रिय शेतीला प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे. भविष्यात उपजिविकेचे चिरकाल व हमखास साधन उपलब्ध झाल्यास व अक्षय उर्जास्त्रोतांचा वापर वाढल्यास लोकसंख्या वाढीचे पर्यावरणहानीवर होणारे दुष्परिणाम कमी होतील.   त्यामुळे पर्यावरण जागृती हा शैक्षणिक अभ्यासाचा महत्वाचा विषय मानून युवा पिढीने संवेदनशील व कृतीशील बनून सामाजिक, आर्थिक व शाश्वत विकासासाठी निसर्ग नियमांच्या चौकटीत राहून पर्यावरण व जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी समाजातील सर्व घटकांना एकत्र घेत चळवळ उभारावी असे आवाहन डॉ. भोसले यांनी शेवटी केले.
           कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी प्राचार्य डाॅ. विठ्ठल ढेकळे म्हणाले की, जागतिक पर्यावरण दिन-२०२० चे 'पर्यावरणासाठी वेळ' हे उद्दिष्ठ सार्थ ठरविण्यासाठी कोरोनामुळे लागू केलेली सक्तीची टाळेबंदी सद्या जशी पर्यावरण व जैवविधता यांचे संरक्षण होण्यासाठी उपयुक्त ठरत आहे तसेच भविष्यात देखील निसर्ग व पर्यावरणात मानवी हस्तक्षेप कमी केला पाहिजे. भावी पिढीच्या गरजा भागविण्यासाठी 'जगा व जगू द्या' ह्या तत्वाचा अवलंब सर्वांनी करणे गरजेचे आहे. पर्यावरणाची शुध्दता व पावित्र्य भावी पिढीसाठी राखण्यासाठी एनएसएस, एनसीसी, तरूण मंडळे, सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन यांसारखे पर्यावरणपुरक कृतीशील कार्यक्रम राबवले तर भारतासारख्या शेतीप्रधान व विकसनशील देशांचा सर्वांगिण विकास साधला जाईल.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. महादेव करेन्नावर यांनी तर आभार प्रा. कृष्णा रानगर यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा.डाॅ. सचिन दांगट यांनी केले.
   समारोप समारंभापूर्वी  प्रा. डाॅ. अफरोज आलम  यांचे " क्वालिटी पब्लिकेशन इन इंडियन बायोडायव्हरसिटी", प्रा. डाॅ. राणी भगत यांचे "फ्लोरिस्टिक स्टडीज अॅण्ड इंम्पॅक्ट अनॅलिसीस इन मुळशी वाॅटरशेड कॅचमेंट एरिया नाॅर्दन-वेस्टर्न घाट" व तर प्रा. डाॅ. योगेश कोळी यांचे "बर्ड लाईफ आॅफ सिंधुदुर्ग" अशी तीन बीजभाषणे दिवसभरात पार पडली.
       या राष्ट्रीय परिषदेस देशातील विविध विद्यापीठे व महाविद्यालयातील ३०० प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवून पर्यावरण, जैवविविधता, शाश्वत विकास या क्षेत्रातील ताज्या संशोधनावर चर्चा केली.
सुरवातीला उत्कृष्ठ संशोधन पेपरचे सादरीकरण करणा-या विजेत्यांचा निकाल जाहीर करण्यात आला. १. रसायनशास्त्र विभाग: प्रथम- पांडुरंग तळपदे (राजाराम काॅलेज, कोल्हापूर), द्वितीय- प्रियदर्शनी चिदंबरम (मनोमनियन सुंदरनार विद्यापीठ, तिरूनालवेली, तामिळनाडू), तृतीय- बी.एल. शिंदे (वाघहिरे काॅलेज, सनसड-पूणे); वनस्पतीशास्त्र विभाग: प्रथम- के.सी. धुमाळ (नवरोजी वाडिया काॅलेज, पूणे), द्वितीय- राॅय चौधरी अनन्या (चाकदहा काॅलेज, नादिया, प. बंगाल), तृतीय- सारिका पाटील (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर); प्राणीशास्त्र विभाग: प्रथम- कडकोल सुप्रीत (वेंकटरमण स्वामी काॅलेज, बंटवाल), द्वितीय- के. किरणवती (सेंट अलोयसिमस काॅलेज, मेंगलोर), तृतीय-चैत्राली गुजर (यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा)
            सदर परिषद यशस्वी करण्यासाठी संयोजक प्रा. डाॅ. राजेंद्र लवटे, प्रा. महादेव करेन्नावर, प्रा. कृष्णा रानगर, प्रा. दीपक कुंभार, डाॅ. शिवाजी कुलाळ, प्रा. मल्लाप्पा सज्जन, डाॅ. विजय जाधव, प्रा. अभय पाटील, प्रा. गोविंद साळुंखे, डाॅ. सचिन दांगट, प्रा. कु. विद्या माळी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थीनी यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment