Thursday, June 25, 2020

पाण्यासाठी बांध, तलाव आणि प्राणवायूसाठी वृक्ष लागवडीची गरज : डॉ. राजेंद्र लवटे

सातारा,(जत न्यूज वृत्तसेवा)-
सदृढ व निरोगी आरोग्यासाठी मानवाला स्वच्छ पाणी व शुद्ध प्राणवायूची अत्यंत गरज असते. नैसर्गिक पावसाचे पाणी वाया न घालवता ते बांध, तलाव यांची निर्मिती करून अडवणे व नैसर्गिकरित्या झाडापासून मिळणा-या प्राणवायूचा पुरवठा वाढवण्यासाठी दरवर्षी प्रत्येकाने दहा झाडे लावून आपले शरीर निरोगी ठेवावे, असे आवाहन वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र लवटे यांनी केले. ते सातारा येथील लालबहादुर शास्त्री महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना,  वनस्पतीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'राष्ट्रीय सेवा योजनेची पर्यावरण व जैवविविधता संरक्षण यांमधील भूमिका' या विषयावर झालेल्या 'ऑनलाईन वेबिनार'मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ हे होते.

डॉ. लवटे पुढे म्हणाले, वाढणारी लोकसंख्या, औद्योगिक क्रांती, मानवी हाव यांमुळे प्रदुषण वाढत आहे, त्यामुळे पर्यावरण व जैवविविधतेची प्रचंड हानी होत आहे. अणूबॉंब, रासायनिक, विषारी, जैविक अस्त्रे यांच्या वापरामुळे मानवासहित संपूर्ण जैवसृष्टीचा संहार होणार हे काही घटनांमुळे पर्यावरण समस्या ही जागतिक समस्या आहे हे लक्षात आले आहे.
सजिवांना आवश्यक असलेले शुध्द पाणी व प्राणवायू यांसाठी बांध, तलाव निर्मिती व वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. पर्यावरणातील होत असलेले बदल त्याचा शेती व शेती उद्योगावर होत असलेले वाईट परिणाम कमी करण्यासाठी राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेमधून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली जात आहे. यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने पाणी अडवणे तसेच वृक्ष लागवडीचे नियोजन व व्यवस्थापन या गोष्टीविषयी जनजागृती होणे आवश्‍यक आहे. हवामान, जमीन, पाण्याचा अभ्यास करून कृषी हवामान विभागानुसार वृक्ष लागवडीचे नियोजन करावे. वृक्ष लागवडी वेळी बऱ्याचदा प्रदेशनिष्ठ नसलेल्या, आपल्या जंगलामध्ये न आढळणाऱ्या प्रजातींची लागवड केली जाते. पर्यावरण पूरक वनस्पतीची निवड न केल्याने अन्नसाखळ्या सुदृढ होण्याऐवजी त्यावर दुष्परिणाम होतो, असे निदर्शनास आले आहे. यासाठी पर्यावरण पूरक स्थानिकवनस्पतींची लागवड होणे आवश्‍यक आहे. गावाच्या परिसरात सार्वजनिक जमिनी, गायराने, शाळा, महाविद्यालय परिसर, पाण्याचे पाट, नद्या, नाले, तलाव, रस्ते, शेताचे रस्ते, शेताचे बांध, शेतातील घरे, गावातील घरे इ. ठिकाणी वनस्पतीतील गुण, गुणधर्म, आकारमान इ.चा विचार करून लागवड करण्यासाठी विद्यापीठे, सरकारी संस्था, वनविभाग, कृषी विभाग स्वयंसेवी संस्था यांच्या सहाय्याने पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्यात एनएसएस स्वयंसेवकानी पुढाकार घ्यावा असे शेवटी आवाहन केले.
     अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजेंद्र शेजवळ म्हणाले, 'तंत्रज्ञानाची बेसुमार वाढ, लोकसंख्यावाढ, शहरीकरण, कारखाने यांमुळे प्रदुषणात वाढ झाली असून शुध्द पाणी व हवा मिळत नसल्याने आजार वाढत आहेत. कोरोना व्हायरस हा पर्यावरणाचा असमतोल व मानवी अतिरेक यांचाच परिपाक आहे. तरी मानवाने आत्मकेंद्री व स्वार्थी वृत्ती सोडून पूर्वापार चालत आलेले मानव व निसर्ग यांचे प्रेमाचे नाते जुळले गरजेचे आहे.
    डाॅ. लवटे यांनी चित्रफितींच्या माध्यमातून राजे रामराव महाविद्यालय, जत च्या एनएसएस विभागाच्या वतीने महाविद्यालय परिसरात पाणी अडविण्यासाठी बांधलेल्या पाझर तलावाचे व पंधराशे वृक्षांची लागवड करून ठिबक सिंचनाद्वारे त्यांचे जतन केल्याची माहिती दिली.
     स्वागत व प्रास्ताविक डॉ. प्रविण जाधव यांनी केले. आभार  डाॅ. सुनील गुरव यांनी मानले तर सूत्रसंचालन डॉ. अरविंद नलवडे यांनी केले.

No comments:

Post a Comment