Thursday, June 18, 2020

जत- घाटगेवाडी प्रधानमंत्री रस्त्याची दुरावस्था

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आलेल्या जत-घाटगेवाडी या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय अशी झाली असून वाहनधारकांना या रस्त्यावरून वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे वाहन चालवताना चालकाला अपघाताला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने या रस्त्याची त्वरित दुरूस्ती करावी, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांनी केली आहे.

 जत -घाटगेवाडी हा सात किलोमीटर अंतर असलेला रस्ता सन २००६ या वर्षी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून   रक्कम रूपये एक्याऐंशी लाख एकोनसत्तर हजार रुपये खर्चून हा रस्ता पूर्ण  करण्यात आला. टेंभूर्णी येथील ठेकेदार मे.देशमुख अॅड कंपनी या ठेकेदारामार्फत या सात किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे दिसत आहे. या रस्त्याचे देखभालीसाठी व दुरूस्तीसाठी प्रशासनाने चारलाख चौसष्टहजार रूपयेची तरतूद करूनही सबंधित ठेकेदाराने ही रक्कम देखभालीसाठी व रस्ता दुरूस्ती करण्यासाठी न वापरल्याने रस्त्याची आज अशी दयनीय अवस्था झाल्याचे दिसून येत आहे.
 सद्या या रस्यावरील डांबर बिळूर रोड, श्री. गणेश मंदिर काॅर्नर ते क्षीरसागर यांचे घराचे पाठीमागे असलेल्या ओढ्यावरील पुलापर्यंत संपूर्णपणे निघून गेले आहे. रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. तसेच पुढे ओढ्यावरील पुलापासून ते घाटगेवाडी गावापर्यंत जागोजागी रस्त्याच्या कडेला असलेल्या साईडपट्टया खचल्या आहेत त्यामुळे या मार्गावरून वाहनधारकांना आपली दोन चाकी व चारचाकी वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. सद्या रस्त्यावर सर्वत्र चिखलच असल्याने वाहने चालविणे म्हणजे अपघाताला आमंत्रण दिल्यासारखे झाले आहे. प्रशासनाने घाटगेवाडी येथील नागरिकासाठी जत-घाटगेवाडी या रस्त्याचे नुतनीकरणाचे काम हाती घेवून हे काम लवकरात लवकर पूर्ण करून घाटगेवाडी येथील लोकांना न्याय द्यावा, अशी मागणी  सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment