Saturday, June 6, 2020

प्रा. श्रीमंत ठोंबरे व प्रयोगशाळा सहायक सुरेश पुजारी सेवेतून निवृत्त

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
 शिक्षणातून व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होत असतो.  विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त, संस्कार, नितीमुल्य  आणि स्वावलंबन  बिंबविण्याचे  काम शिक्षक करीत असतात. महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणजे एक प्रचंड उर्जा. हेच ते वय की जेथे त्याचे पुढील आयुष्य कसे असणार ते ठरणार असते. अलीकडील शिक्षण क्षेत्रातील वातावरण बदलत जात असले तरी काही शिक्षक आपले कार्य निष्ठेने आणि समर्पित भावनेने व व्यक्तिगत लाभ किंवा हानीचा विचार न करता ज्ञानदानाचे कार्य मन लावून करताना दिसतात. त्यातीलच एक नाव म्हणजे प्रा. श्रीमंत ठोंबरे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. व्ही एस ढेकळे यांनी व्यक्त केले.
ते राजे रामराव महाविद्यालय येथे प्रा श्रीमंत ठोंबरे यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने आयोजित सेवागौरव समारंभात शुभेच्छा देताना बोलत होते.
   पुढे बोलताना ते म्हणाले की, प्रा. ठोंबरे यांच्याबरोबर प्रयोगशाळा सहायक सुरेश पुजारी हेदेखील सेवानिवृत्त होत आहेत. पुजारी यांनी संस्थेच्या कोल्हापूर व जत येथील महाविद्यालयात आपली ३१ वर्षे सेवा बजावली आहे. एक प्रामाणिक, मनमिळावू व कर्तव्यदक्ष शिक्षकेतर कर्मचारी म्हणून त्यांनी संस्थेच्या व महाविद्यालयाच्या लौकिकात भर घातली आहे.
       आपले मनोगत व्यक्त करताना प्रा ठोंबरे म्हणाले, कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांच्या मार्गदर्शनामुळे संस्थेच्या कराड, तळमावले, लोणी काळभोर, इचलकरंजी व जत या शाखेवर प्रामाणिकपणे व निष्ठेने सेवा बजावण्याची संधी मिळाली. ३५ वर्षाच्या सेवेमध्ये अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करता आले. विद्यार्थ्यांना पोलिस, सैन्य व क्रिडा सेवेमध्ये जाण्याची संधी उपलब्ध करून दिली.  पोलिस निरीक्षक अशोक कदम, महाराष्ट्र केसरी संजय पाटील, क्रीडा शिक्षक लक्ष्मण दोडमणी, कबाडगे, अरुण देसाई, पोपट पाटील, सोबत अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी घडवता आले. अनेक तालुका, जिल्हा, विद्यापीठ, झोनल, राज्य व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन, मार्गदर्शन व क्रिडा क्षेत्रात जतसारख्या दुष्काळी भागातील विद्यार्थी घडवता आले. ज्या ज्या ठिकाणी सेवा केली तेथील क्रिंडागणे, मैदाने, महाविद्यालयाचा परिसर आधुनिक व नीटनेटका बनवला. प्राचार्य शामराव चव्हाण, क्रिडा शिक्षक वसंतराव जाधव, व शिवाजी विद्यापीठ अँथलेटीक्स कोच पांडुरंग मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सलग २२ वर्षे शिवाजी विद्यापीठ संघ निवड समिती, अखिल भारतीय आंतरविद्यापीठ समिती, पश्चिम विभाग समिती व महाराष्ट्र राज्य क्रीडा संघटनेमध्ये काम केल्याचा आनंद आहे.
          कार्यक्रमादरम्यान प्राचार्य ढेकळे, क्रिडा सहसंचालक नागेश मोटे, प्रा चंद्रसेन मानेपाटील, प्रा जयसिंगराव सावंत, डॉ संजय लठ्ठे, लक्ष्मण दोडमणी, अश्विनी पवार, सायली माने, आष्लेश मस्कर, विजय पाटील, मुलगा सोहम ठोंबरे आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. आर. डी. करांडे यांनी केले. प्रा. अबताफ खतिब यांनी सूत्रसंचालन तर डॉ. विजय जाधव यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, व कुटुंबीय झुम अँपच्या माध्यमातून उपस्थित होते.

No comments:

Post a Comment