Thursday, June 4, 2020

येळवीत रोजगार हमीच्या कामाला सुरुवात

ओंकार स्वरुपा फौंडेशन संस्थेचा पुढाकार

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
ओंकार स्वरूपा फौंडेशन संस्थेच्यावतीने जतचे तहसिलदार सचिन पाटील व गटविकास अधिकारी श्री. धरणगुत्तीकर यांना रोजगार हमीचे काम चालू करण्याबाबतचे निवेदन दिले होते त्याचा पाठपुरावा करत आज रोजगार हमीचे काम येळवी येथे वन विभागामार्फत आणि कृषि विभागामार्फत सुरू झाले आहे. कामाची सुरुवात येळवीचे सरपंच विजय कुमार पोरे, उपसरपंच सुनील अंकलगी, ओंकार स्वरूपा फौंडेशन संस्थेचे अध्यक्ष दिपक अंकलगी,  संस्थेचे सचिव तथा ग्रा.पं. सदस्य संतोष पाटील, कृषी सहाय्यक विठ्ठल राख,जत कृषी विभाग आत्माचे प्रमुख रविकिरण पवार, वनखात्याचे वनपाल एस. एस. मुजावर, राजू कदम, तुकाराम सुतार, बजरंग चव्हाण, ज्ञानेश्वर माने, नवनाथ तेरवे,चंद्रकांत खंडागळे, ग्राम रोजगार सेवक राजु रूपनुर, वनरक्षक सचिन वगरे, किरण जाधव, पांडुरंग व्हनमाने तसेच सर्व मजुरांच्या उपस्थितीत कामाची सुरुवात करण्यात आली.

     कोरोनो विषाणू संसर्गामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून गावातील बेरोजगार युवकांच्या हाताला काम नसल्याने ते काम मिळवून देण्यासाठीचा प्रयत्न संस्थेने केला आहे. ग्रामीण भागातील बहुतांश अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. गावात श्रमिकांच्या स्थलांतरासोबत रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. रोगाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिकांना कामाची आवश्यकता लक्षात घेऊन तसेच एरवी पुणे, मुंबईसारख्या शहरात रोजगारासाठी जाणारे ग्रामस्थ पुन्हा आपल्या मूळ गावी परतले आहेत. परिणामी ग्रामीण भागात बेरोजगार ग्रामस्थांची संख्या वाढली आहे. रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. बेरोजगाराच्या, मजुराच्या हाताला ओंकार स्वरूपा संस्थेने आज काम मिळवून दिले.
             गावाजवळच मजुरांना काम मिळाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटल्यामुळे मजुरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यामुळे शेतीसोबत पूरक व्यवसायात वाढ होणार असून, शेतीसोबत काम करत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती समाधानकारक होणार आहे. यावेळी संस्थेचे सचिव संतोष पाटील म्हणाले, 'आज वनविभागामार्फत 20 वीस लोकांना रोजगार तसेच उद्या कृषी विभागामार्फत 20 लोकांना रोजगार उपलब्ध झाला असून, नंतर गावातील ज्या लोकांनी 4 नंबरचा फॉर्म भरला आहे त्या लोकांना टप्प्या टप्प्याने रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. रोजगार हमीच्या कामामुळे नवीन आशा निर्माण झाल्या असून, वेळेवर कामाचा दाम मिळत असल्याने प्रशासनाचे काम खूप समाधान कारक आहे. गावात राबविल्या जाणाऱ्या या योजनेत भ्रष्टाचार करणार नाही आणि करूही देणार नाही. त्याचबरोबर हाताला काम आणि योग्य दाम मिळत असल्याने  प्रत्येक मजुराच्या घरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.'

No comments:

Post a Comment