Friday, July 31, 2020

वाद्य कलाकारांवर उपासमारीची वेळ

आर्थिक मदत देण्याची मागणी ;३ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन 
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे वाद्य कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. विवाहासह आनंदाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या या वाद्य कलाकारांना आता कामच नसल्याने त्याची आर्थिक स्थिती मोठी बिकट झाली आहे. अशा या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो  कलाकारांना सध्या काम नाही. त्यामुळे सरकारने सरसकट पाच हजार रुपये प्रत्येक कलाकारांना मदत द्यावी, या मागणीसह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय होलार समाज संघटना(A)गट यांचेवतीने जत तहसील कार्यालयासमोर दि.३ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.याबाबतचे निवेदन तहसिलदार कार्यालयास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब ऐवळे ,जेष्ठ नेते रामभाऊ हेगडे व जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब गेजगे यांनी दिले आहे.
 या निवेदनात अनेक मागण्या नोंदवण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरीय कलाकार मानधन समितीमध्ये होलार समाजातील कलाकारांना प्रतिनिधीत्व मिळावे. सर्व कलाकारांना शासनाने कोरोना कालावधीमध्ये सरसकट पाच हजार रुपये मानधन देण्यात यावे व वयाची अट रद्द करावी. तसेच सर्व कलाकारांना शासनाने जीवनावश्यक वस्तुचे वाटप करावे. कलाकारांनाही राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज पुरवठा करण्यात यावा व तसे बँकाना शासनाने आदेश करावेत.अनेक कलाकार हे कोरोना या  आजारावर प्रबोधन जनजागृती करत आहेत, त्यांना शासनामार्फत
योग्य मानधन देऊन कार्यक्रम करणेसाठी परवानगी देणेत यावी, अशा  मागण्या करण्यात आल्या आहेत.या मागण्यांसाठी दि.३ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

सोन्याळ हायस्कूलचा दहावीचा निकाल ९७ टक्के

उज्वल यशाची परंपरा कायम
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने मार्च २०२० मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा श्री विजय विठ्ठल हायस्कुल सोन्याळचा मराठी आणि कन्नड माध्यमाचा  निकाल ९७ टक्के जाहीर झाला असून उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. यशस्वी विध्यार्थ्याचे संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.                     
कन्नड माध्यमातून संदेश शंकरय्या मठपती हा ९७.४० टक्के गुण मीळवून शाळेत प्रथम आला आहे तर दिव्यांगातून जिल्ह्यातही प्रथम क्रमांक पटकावला आहे.सांगली जिल्ह्यात दिव्यांग विभागातून चांगले गुण मिळवून यश संपादन करून शाळेचे नाव जिल्ह्यात झळकावले  आहे. याच शाळेचा प्रज्वल महादेव मुचंडी याने ९५ टक्के गुण मिळवून द्वितीय तर अश्विनी जकप्पा निवर्गी हिने ९२ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. मराठी माध्यमात जाडरबोबलदच्या प्रीती सिद्दण्णा बिराजदार हिने ९३टक्के गुण मिळवून प्रथम, रुपाली विठ्ठल पुजारी हिने ९२.४० टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर स्नेहा विलासराव कुलकर्णी हिने ९० टक्के गुण संपादन करून विद्यालयात तिसरा क्रमांक मिळवला आहे.
या यशस्वी विध्यार्थ्याना शाळेचे मुख्याध्यापक टी. एस. बिरादार, पी बी कांबळे, एल बी नदाफ, एच के.मुचंडी, एस ए पाटील,एस एम निवर्गी,एल एस कोळी,  सौ.आय एस बगली, एच एस अहिरसंग,एस एम पुजारी, एस एस मठपती यांच्यासह आदी शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले आहे. संस्थेचे कार्यवाहक जकाण्णा बिरादार  सचिव सायबणाकाका बिरादार यांनी यशस्वी विध्यार्थ्याचे पुष्पगुच्छ देऊन गौरविले. या ऊत्तुंग यशाबद्दल सोन्याळ आणि जाडरबोबलाद परिसरातून सर्व स्तरातुन मार्गदर्शक शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.

एकुंडी येथील न्यू इंग्लिश स्कूलचा शालान्त परीक्षेचा निकाल 100 टक्के

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
जत तालुक्यातील एकुंडी येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचा शालान्त परीक्षेचा (दहावी) निकाल शंभर टक्के लागला आहे. या शाळेच्या घवघवीत यशाबद्दल ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे.
एकुंडी येथील न्यू इंग्लिश स्कूलने यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखत यंदाही दहावी परीक्षेत शंभर टक्के निकाल लावला आहे. विक्रांत सिदगोंडा कोट्टलगी याने 89 टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. कु. ज्योती बसवराज नाईक हिने 87.40 टक्के गुण मिळवून दुसरा तर  कु. प्रीती दशरथ गुडोडगी हिने 86 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. या सर्व मुलांचे कौतुक होत आहे. संस्थेचे अध्यक्ष बळवंत यमगर, मुख्याध्यापक कृष्णदेव पाटोळे, आय.पी.चौगुले, एस.डी. ओलेकर, पी.एल.मोटे, सौ. वाघमारे तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले. गावातील लोकप्रतिनिधी, पालक आणि प्रतिष्ठित नागरिक यांनी शाळेचे आणि विद्यार्थ्यांचे विविध माध्यमातून अभिनंदन केले.

Thursday, July 30, 2020

शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी जिल्ह्यात होईल - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

सांगली,(जत न्यूज वृत्तसेवा)-
सांगली जिल्ह्यात नागरी भागात जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन शिथील करण्यात आला आहे. मात्र राज्य शासनाने 31 ऑगस्ट पर्यंत जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या अनुषंगाने जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जाहीर केलेले आहे. तसेच राज्य शासनाने दि. 31 ऑगस्ट 2020 पर्यंत जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. 
जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सांगली डॉ. अभिजीत चौधरी यांनी शासन निर्देशानुसार दि. 01 ऑगस्ट 2020 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दि. 31 ऑगस्ट 2020 रोजीच्या 24.00 वाजेपर्यंत खालील प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश पारित केले आहेत.
सांगली जिल्ह्याच्या सीमा, बंदी आदेशाच्या कालावधीत बंद राहतील. या कालावधीत आंतरराज्य व आंतरजिल्हा माल वाहतूक, जीवनावश्यक सेवा / सुविधा व अत्यावश्यक सेवांसाठी होणारी वाहतूक व जिल्हा अंतर्गत सशर्त प्रवासी वाहतूक वगळून उर्वरित सर्व वाहतूक प्रतिबंधीत असेल. आंतरराज्य व आंतरजिल्हा व्यक्तीच्या प्रवासावर प्रतिबंध असेल व असा प्रवास मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नियंत्रित केला जाईल. सदर कालावधीत 21.00 वाजलेपासून ते 05.00 वाजे पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शाळा, कॉलेज, शैक्षणिक / प्रशिक्षण / शिकवणी देणाऱ्या संस्था इत्यादी प्रतिबंधित असतील. 
चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्कस (Entertainment), प्रेक्षागृहे, बार आणि सभागृहे, असेंब्ली हॉल यासारखे तत्सम सर्व ठिकाणे प्रतिबंधित असतील. सर्व सामाजिक / राजकीय / क्रीडा / करमणूक / शैक्षणिक / सांस्कृतिक / धार्मिक कार्यक्रम तसेच इतर मेळावे प्रतिबंधित असतील. धार्मिक स्थळे व सार्वजनिक ठिकाणाची उपासनास्थळे प्रतिबंधित असतील. तसेच खाजगी व सार्वजनिक धार्मिक स्थळांच्या ठिकाणी विधिवत पूजेसाठी असणाऱ्या धर्मगुरू अथवा पुजारी यांना वगळून इतर सर्व नागरिकांना धार्मिक स्थळांना भेटी देण्यास प्रतिबंध असेल. हॉटेल्स, रेस्टोरंट, आणि इतर आदरातिथ्य सेवा प्रतिबंधित असतील. हॉटेल्स, रेस्टोरंट व किचन येथून पार्सल देणे व घरपोच सेवा संचार बंदी कालावधी वगळता अनुज्ञेय असेल. तसेच निवासी व्यवस्था प्रदान करणारी हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाउस या आस्थापना जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडील दि.७ जुलै २०२० च्या आदेशानुसार सुरु राहतील. 
जिल्ह्यातील वय वर्षे 65 वरील ज्येष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया, 10 वर्षाखालील बालके व आजार असणाऱ्या व्यक्ती ( Persons with co-morbidities ) यांना अत्यावश्यक गरजा व वैद्यकीय सेवा वगळता घरातून बाहेर पडण्यास मनाई आहे. 
सदर कालावधीत अंत्यविधीकरिता 20 व लग्नसमारंभ करिता 50 व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. शासन निर्देशाप्रमाणे सदर ठिकाणी Social Distancing पाळणे बंधनकारक राहणार आहे. तसेच लग्नसमारंभ विषयक बाबी लॉन / विना वातानुकुलीत - मंगल कार्यालय/ हॉल / सभागृह मध्ये जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडील दि. 23 जून 2020 च्या आदेशातील अटी व शर्तींचे अधीन राहून करण्यास परवानगी असेल. यामध्ये अत्यावश्यक सेवा व औषधी दुकाने (medical shops) वगळून सर्व मार्केट व दुकाने 09.00 वाजे पूर्वी व 19.00 वाजले नंतर चालू ठेवता येणार नाहीत. एखाद्या ठिकाणी गर्दी होवून सामाजिक अंतराच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ मार्केट व दुकाने बंद करण्याचे आदेश देण्यात येतील.
सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू, सुपारी खाणे व थुंकणे प्रतिबंधित असेल. तसेच पानपट्टी मधून पान, तंबाखू, सुपारी व तत्सम पदार्थ फक्त पार्सल स्वरूपात देण्यात यावेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकलेस या  500 रूपये इतका दंड आकारण्यात येईल. सर्व नागरिकांनी कोणत्याही कारणासाठी, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वावरताना (उदा. रस्ते, वाहने, दवाखाने, कार्यालये, बाजार इ.) तीन पदरी मास्क किंवा साधा कापडी मास्क किंवा रुमाल किंवा कापडाने नाक व तोंड झाकून वावरणे बंधनकारक असेल. तसेच सदर बाबीचे उल्लंघन केल्यास 500 रूपये इतका दंड आकारण्यात येईल. प्रतिबंधित क्षेत्र ( Containment Zone ) या क्षेत्रात फक्त अत्यावश्यक बाबींसंदर्भातील कार्याला परवानगी देण्यात येत आहे. वैद्यकीय कारण आणि अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा वगळता अन्य कोणत्याही कारणासाठी या क्षेत्रात लोकांना बाहेर जाण्या-येण्यास पूर्णतः प्रतिबंध करण्यात येत आहे. या संदर्भात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शिकेतील सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे.
क्रीडा संकुले किंवा स्टेडीयमच्या आतील क्षेत्र (बंदिस्त) (indoor) याचा वापर प्रतिबंधित असेल. शासन आदेशानुसार वेळोवेळी शिथिलता देण्यात आलेल्या बाबी आणि ज्या प्रतिबंधित किंवा बंदी घातलेल्या नसतील त्या सर्व बाबी प्रतिबंधित नसलेल्या क्षेत्रामध्ये खालील अटीच्या आधारे सुरु असण्यास परवानगी असेल.
परवानगी असलेल्या बाबीना कोणत्याही शासकीय परवानगीची आवश्यकता नाही. क्रीडा संकुले आणि मैदाने यांच्या बाह्य जागा आणि इतर सार्वजनिक मोकळ्या जागा या वैयक्तिक व्यायामासाठी खुल्या राहतील. परंतु प्रेक्षक जमणेस व समूह सराव किंवा एकत्रित खेळ खेळण्यास प्रतिबंध करणेत येत आहे. सर्व शारीरिक व्यायाम आणि इतर व्यायाम प्रकार सामाजिक अंतराचे निकष पाळून करणेस हरकत नाही. खुल्या मैदानामध्ये गोल्फ कोर्सेस, जिमनॅस्टिक, टेनिस, खुल्या मैदानातील बॅडमिंटन आणि मल्लखांब यांना सामाजिक अंतराचे निकष पाळून दि.05 ऑगस्ट2020 रोजी पासून करणेस परवानगी असेल. केशकर्तनालये, स्पा, सलून्स, ब्युटी पार्लर्स यांना जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडील दि. ३० जून 2020 च्या आदेशानुसार परवानगी असेल. यापूर्वीच्या आदेशाने सुरु करणेत आलेले सर्व उद्योगधंदे व बांधकामे या पुढेही सुरु राहतील.
जिल्हा अंतर्गत (Intra District) सर्व सार्वजनिक आणि खाजगी वाहतूक यांना खालील प्रमाणे प्रवासी संख्येच्या हमीसह वाहतूक व्यवस्थापन करता येईल. परंतु प्रत्येक वापराचे वेळी असे वाहन निर्जंतुकीकरण करणे, प्रवासी व चालक / वाहक यांनी मास्क वापरणे बंधनकारक असेल. चालकाने त्यांचे वाहनात निर्जंतुकीकरण उपकरण ठेवणे बंधनकारक असेल. त्याच प्रमाणे मास्क न घातलेल्या प्रवाशांना वाहनात प्रवेश देता येणार नाही.  दुचाकी - 1 + 1 हेल्मेट व मास्क वापरणे बंधनकारक असेल, तीन चाकी - 1 + 2 व  चार चाकी - 1 + 3.
जिल्हा अंतर्गत बस सेवा हि जास्तीत जास्त 50 टक्के प्रवासी क्षमतेसह त्याचबरोबर बसमध्ये शारीरिक अंतर आणि स्वच्छता विषयक उपाययोजनेसह सुरु करता येईल. प्रत्येक बस प्रत्येक वापरानंतर पूर्णपणे निर्जंतुकीकरण करावी लागेल. त्याच प्रमाणे मास्क परिधान न केलेल्या प्रवाशांना वाहनात प्रवेश देता येणार नाही. वाहनात बसताना सॅनीटायझरचा वापर करणे बंधनकारक असेल.
मॉल्स दि. 05 ऑगस्ट 2020 पासून 09.00 वाजले पासून ते 19.00 वाजे पर्यंत सुरु राहतील. तथापि मॉल्स मधील सिनेमागृहे, खाद्यगृहे / रेस्टोरंट पूर्णपणे बंद राहतील. परंतु मॉल्स मधील अन्नगृहे / रेस्टोरंट ची स्वयंपाकगृहे सुरु ठेवून पार्सल सुविधा संचार बंदी कालावधी वगळता अनुज्ञेय असेल.
वरील नमूद प्रतिबंधित बाबी वगळता उर्वरित सर्व बाबीना मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, मंत्रालय यांचेकडील निर्देशानुसार प्रतिबंध व सुट लागू असेल.  
या आदेशाची अंमलबजावणी पोलीस अधीक्षक, Incident Commander तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी व सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुख यांनी करावी. सदर आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्ती विरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार, गुन्हे दाखल करणेकामी सांगली जिल्ह्यातील सबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी / कर्मचारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत.

Wednesday, July 29, 2020

रामराव विद्यामंदिरची शालान्त परीक्षेतील उज्ज्वल यशाची परंपरा कायम

शाळेचा निकाल 98 टक्के; 98.60 टक्के मिळवून मानसी जाधव प्रथम
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
जत  येथील श्री रामराव विद्यामंदीर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने शालान्त (10 वी) च्या परीक्षेत आपली यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. मार्च 2020 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वीच्या परीक्षेचा  निकाल 98.25 टक्के इतका लागला असून या परीक्षेस 287 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 282 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.119 विद्यार्थी  डिस्टिंक्शन   तर 95 विद्यार्थी फर्स्ट क्लास मध्ये आले आहेत. 
 रामराव विद्यामंदिर या प्रशालेच्या दहावीच्या यशस्वी  निकालाने शाळा आणि विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
कु.मानसी जाधव  98.60 टक्के गुण मिळवून शाळेत पहिली आली आहे. तर  कु.अपूर्वा व्हनमाणे  (98 टक्के), ए.आर.यादव  (97.80 टक्के) व ए.एस.जाधव  (97.20 टक्के) आर.एम.पुजारी  (96.80 टक्के) यांनी त्याखालोखाल यश मिळवले आहे. गणित विषयामध्ये 3 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण संपादन केले आहेत. या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल प्राचार्य ईश्वर वाघमारे, सर्व शिक्षक  यांनी त्यांचे अभिनंदन केले.

नव्या शैक्षणिक धोरणात दहावीचे महत्त्व झाले कमी

शिक्षण व्यवस्था आणखी लवचिक बनवण्याच्या दृष्टीने आवश्यक ते बदल करत केंद्र सरकारने नव्या शिक्षण धोरणाला मंजुरी दिली आहे.  यात शिक्षण व्यवस्था बहुवैविध्य, बहुभाषिक करण्याकडे अधिक भर देण्यात आला असून यापुढे शाळांचा स्तर आता 5+3+3+4 असा करण्यात आला असल्याने त्यामुळे दहावीचे महत्त्व आपोआपच कमी होणार आहे. यंदा पहिल्यांदाच जीडीपीचा ६ टक्के इतका निधी शिक्षणासाठी देण्याची व्यवस्था या नव्या धोरणात नमूद करण्यात आली आहे.यापूर्वी जीडीपीच्या 4 टक्क्यांपेक्षा शिक्षणावर खर्च करण्यात आला नव्हता. मात्र तरीही हा खर्च कमीच आहे. भौतिक सुविधा देण्याबरोबरच आता शाळा तंत्रज्ञान युक्त करण्यास चालना देण्याची गरज आहे. 
या नव्या शैक्षणिक धोरणाच्या निमित्ताने तब्बल ३४ वर्षांनी देशाचे शिक्षण धोरण अद्ययावत करण्याचे काम केंद्र सरकारने केले. ही बाब महत्त्वाची असून भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे माजी प्रमुख के. कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील नेमलेल्या समितीने तयार केलेला  मसुदा स्वीकारण्यात आला आहे. यामुळे नक्कीच या शैक्षणिक धोरणात नावीन्य पाहायला मिळणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नामकरण आता शिक्षण मंत्रालय असे होणार असून अभ्यासक्रम मल्टीडिसिप्लिनरी,बहुभाषिक करण्यात आला आहे. आता एकाच वेळी वेगवेगळे विषय एकत्रितपणे शिकता येणार आहेत. यात मेजर आणि मायनर असे विषयांचे विभाजन असणार आहे. आर्थिक किंवा अन्य कारणांमुळे होणारे ड्रॉपआऊट यामुळे कमी होतील. शिवाय ज्यांना एखादा विषय आवडीचा असेल तो विषय त्यांना शिकता येईल.त्याचबरोबर  मुलांना शिकवताना एकाच भाषेच्या माध्यमातून अध्यापन न करता विविध प्रादेशिक भाषांचा वापर करता येणार आहे आणि महात्त्वाचे म्हणजे बोर्ड परीक्षांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.  यापूर्वी १० + २ अशी आतापर्यंत शाळेची रचना होती, ती आता ५+३+३+४ अशी असणार आहे. म्हणजेच पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी, नववी ते अकरावी आणि बारावी ते पदवी अशी रचना असेल. साहजिकच यात बोर्ड परीक्षांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
तीन ते १४ वर्ष वयोगटाचे विद्यार्थी शिक्षण हक्क कायद्याच्या कक्षेत आले आहेत. यापूर्वी हा वयोगट ६ ते १४ वर्षे  असा होता. जे संशोधनासाठी उच्च शिक्षण घेऊ इच्छितात त्या विद्यार्थ्यांसाठी चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम तर जे विद्यार्थी पदवीनंतर नोकरी करू इच्छितात त्यांच्यासाठी तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असणार आहे. म्हणजेच रिसर्च करणाऱ्यांसाठी पदवी अधिक एक वर्षांचा मास्टर्स अभ्यासक्रम अशी चार वर्षांची पदवी असेल. यानंतर ते थेट पीएचडी करू शकतील. त्यांना एम. फिल्. ची आवश्यकता नसेल.
लॉ आणि मेडिकल शिक्षण वगळता उच्च शिक्षण एका छताखाली येणार आहे, हे एक नव्या शैक्षणिक धोरणाचे वैशिष्ट्य असणार आहे.

के. एम. हायस्कूलचा दहावीचा निकाल 91 टक्के

जत, (जत न्यूज वृत्तसेवा)- 
जत येथील दि पीपल्स एज्युकेशन सोसायटी संचलित के.एम.हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचा दहावी (शालान्त परीक्षा)चा एकूण निकाल 91.30 टक्के लागला. ओकार रुद्रगौडा पाटील 92 . 80 टक्के गुण मिळवून शाळेत कन्नड माध्यमात प्रथम आला. व्दितीय क्रमांक श्वेता आण्णासो बाबर 90.40 टक्के,  अरपीता शिवाजी शिंदे 90 टक्के, कु . सिमरण हरून नदाफ 89 टक्के, शितल नवनाथ कोळी 87 टक्के, अथर्व सुर्यकांत स्वामी 87 टक्के,  गणेश काडाप्पा सुतार 85.80 टक्के मिळवून यश संपादन केले आहे. कन्नड माध्यमाच्या विठ्ठल शिवगोंडा बिराजदार याने  85.6 टक्के गुण तर  सेमी इंग्रजी माध्यमात प्रणाली राजेंद्र खांडेकर 84.2 टक्के गुण मिळवले आहेत. 
 रामचंद्र प्रल्हाद पोतदार 83.40 टक्के, कु . अप्पेक्षा मलकापा तेग्गी माळी 82.8 टक्के, कु. पोर्णीमा मल्लीकर्जून भद्रे 81.8 टक्के, कु. सानिका महादेव साळे 81.6 टक्के, प्रांजल पांडुरंग सावंत 81.4 टक्के, कु. सानिया जाकीर कातीकर 80 टक्के या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य गुण मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी व मुख्याध्यापक आर. एम. सय्यद व संस्थेचे अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले.

Tuesday, July 28, 2020

प्रहार संघटनेच्यावतीने उमदीत वृक्षारोपण

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
जत तालुक्यातील उमदी खालील विठ्ठलवाडी येथे प्रहार संघटना विठ्ठलवाडीच्यावतीने पावसाळ्यामूळे वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. यात 850 च्यावर वृक्षारोपण करण्यात आले. 
वृक्ष लागवडीत पेरू, सीताफळ,चिंच, आवळा आदी जातींची रोपे लावण्यात आली. याप्रसंगी पाणी फाऊंडेशनचे तुकाराम पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रहार संघटनेचे उमदी (विठ्ठल वाडी) शाखाप्रमुख सुनिल सातपुते, ग्रामपंचायत सदस्य नामदेव सातपुते, ग्रा. प॑. सदस्या अनिता बाळू सातपुते, द्राक्ष बागायतदार आर. डी. सातपुते, पोलिस पाटील शांता सचिन शिंदे, सामाजिक कार्यकर्ते श्रीशैल बिराजदार, ज्येष्ठ नागरिक व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ऑनलाईन शिक्षणापासून कन्नड माध्यमाचे विद्यार्थी वंचित- धानाप्पा माळी,बाळू कट्टीमनी

सोन्याळ,(जत न्यूज वृत्तसेवा)-
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यशासन, जिल्हा परिषद आणि डाएट यासारख्या आदी संस्थांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मराठी व उर्दू माध्यमाच्या विध्यार्थ्याकरिता “शाळा बंद, शिक्षण चालू” हा ऑनलाईन शैक्षणिक उपक्रम राज्यभर राबवत आहे.हे स्वागतार्ह आहे. परंतु कन्नड माध्यमाचे विद्यार्थी मात्र या उपक्रमापासून वंचित आहेत.यासाठी शासनाने कन्नड माध्यमातील तज्ज्ञ शिक्षकांना आमंत्रित करून तसे अभ्यासक्रम तयार करवून घ्यावे व कन्नड माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात यावे, अशी मागणी शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष धानाप्पा माळी आणि बाळू कट्टीमनी यांनी केली आहे.
सद्यस्थितीत कोरोना महामारीने उग्ररूप धारण केले असून त्याने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. यामुळे राज्यातल्या शाळा-महाविद्यालये बंद आहेत. मात्र तरीदेखील महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने “शाळा बंद, शिक्षण सुरू” हा उपक्रम राबवित आहे. हा स्तुत्य उपक्रम आहे. अनेक विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा फायदा होत आहे. या उपक्रमांतर्गत दीक्षा ऍप व ezee test app द्वारे फक्त मराठी व उर्दू माध्यमाचे विद्यार्थ्यांसाठी नमुना पाठ आणि व्हिडिओ बनवून त्यांचे सोय केलेली आहे. पण कन्नड माध्यमाच्या विद्यार्थ्यांची शिक्षण विभागाने कोणत्याही प्रकारची सोय केलेली नाही. राज्य स्तरावर पाठ्यपुस्तक मंडळ व अभ्यास गटात अनेक कन्नड विषयाचे तज्ञ मंडळी कार्यरत असून त्यांचे उपयोग या कामासाठी करून घेता येईल.तसेच शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांसमोरही श्री. माळी आणि श्री. कट्टीमनी या दोघांनी कन्नड माध्यमाच्या विद्यार्थ्यांची कैफियत मांडलेली आहे. शासनाने पाठयपुस्तक आणि विविध अभ्यास मंडळावर कार्यरत असलेल्या तज्ज्ञ कन्नड अभ्यासकांशी चर्चा करून राज्यातील जवळ जवळ साडेपाच हजार शिक्षक आणि चाळीस हजार कन्नड माध्यमांच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन शिक्षणाची सोय करून द्यावी, अशी मागणी कन्नड विभागाचे राज्य प्रतिनिधी व शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष धानाप्पा माळी आणि शिक्षक समितीचे नेते बाळू कट्टीमनी यांनी केली आहे.

Monday, July 27, 2020

संख अप्पर तहसील कार्यालय 'असून अडचण नसून खोळंबा'!

संख येथे तात्काळ दुय्यम निंबधक कार्यालय सुरू करा-सुशीला होनमोरे

सोन्याळ,(जत न्यूज वृत्तसेवा)-
जत तालुक्यातील पूर्व भागातील संखसह उमदी, माडग्याळ, तिकोंडी, मुचंडी सर्कलमध्ये असलेल्या गावातील लोकांना जमीनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार आणि इतरकामी जत येथिल दुय्यम निबंधक कार्यालयात जावे लागत असल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. संखला अप्पर तहसील कार्यालय होऊन अडीच वर्षे झाली,पण किरकोळ कामकाज व  नाममात्र दाखले वगळता इतर महत्त्वाच्या कोणत्याही कामासाठी लोकांना जतलाच जावे लागत आहे. याठिकाणी महत्त्वाची कामे होत नसल्याने संख अप्पर तहसील कार्यालयाची अवस्था 'असून अडचण नसून खोळंबा' अशी झाली आहे.  तरी राज्यसरकारने जत पूर्व भागातील लोकांची गैरसोय दूर होण्यासाठी संख येथे स्टॅम्प व्हेंडरसह  नवीन दुय्यम निबंधक कार्यालयास मंजूरी द्यावी व जत पूर्व भागातील लोकांची सोय करावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्या सुशीला होनमोरे यांनी लेखी निवेदनाव्दारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे  केली आहे. 
जत हा  तालुका सांगली जिल्ह्यातील भौगोलिक दृष्ट्या विस्ताराने सर्वात मोठा आणि कर्नाटक राज्याच्या सिमेवर असलेला कायमस्वरूपी दुष्काळी असा तालुका आहे.  तालुक्याचे त्रिभाजन करून संख, उमदी व माडग्याळ येथे नवीन तालुका करण्याची येथील जनतेची बऱ्याच वर्षांपासूनची मागणी आहे. तालुक्याच्या विभाजनाचा प्रस्ताव २००४ पासून प्रशासकीय पातळीवर प्रलंबित आहे. तालुक्यात १२३ गावे व २७६ वाड्या-वस्त्यांचा समावेश आहे. लोकसंख्या चार लाखाहून अधिक आहे. दोन लाख २४ हजार ५३८ चौरस मीटर क्षेत्रफळ आहे. सांगली जिल्ह्यात भौगोलिक विस्ताराने सर्वात मोठा तालुका म्हणून जत तालुक्याची गणना केली जात आहे. हिंगोली जिल्ह्याइतके क्षेत्रफळ  केवळ जत तालुक्याचे आहे हे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल.  विभाजन किंवा त्रिभाजन करून नवीन तालुका होण्यासाठी लोकांचा  रेठा वाढल्याने  यावर जुजबी उपाय आणि मलमपट्टी म्हणून संख येथे अप्पर तहसील कार्यालय मंजूर करण्यात आले आहे. 
सध्या जत येथे मुख्य तहसिल कार्यालय आहे.  तालुक्याचा भौगोलिक विस्तार पाहता  पूर्वभागातील संख येथे लोकांच्या मागणीवरून अडीच वर्षांपूर्वी नव्याने अप्पर तहसिल कार्यालय मंजूर करण्यात आले  आहे. संख अप्पर तहसिल कार्यालय अंतर्गत मुचंडी, माडग्याळ,उमदी,तिकोंडी,व संख असे पाच मंडल विभाग येतात. या चार विभागात एकूण ६७ गावे असून या सर्व गावाचा नाममात्र महसुली कारभार हा अप्पर तहसिल कार्यालय संख अंतर्गत चालतो. परंतु या कार्यालयात ठोस असे कोणतेही कामकाज चालत नाही. संख येथे अप्पर तहसिल कार्यालय झाल्यापासून जत पूर्व भागातील नागरिकांची एकच मागणी वारंवार जोर धरू लागली आहे की, राज्य सरकारने ज्या प्रमाणे जत पूर्व भागातील लोकांची अप्पर तहसिल कार्यालयाची मागणी तत्कालीन भाजप-शिवसेना सरकारने पूर्ण करून  विविध कामांनिमित्त ये-जा करण्यासाठी होणारा हेलपाटा,  वेळ व पैशाची बचत करण्याचे काम केले आहे.त्याप्रमाणे इतर आवश्यक कार्यालय असणे महत्त्वाचे आहे. जमीन किंवा अन्य मालमत्ता खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी महत्वाचे असलेले कार्यालय म्हणजे दुय्यम निबंधक कार्यालय होय. त्यासाठी नवीन दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करून लोकांची  होणारी अडचण व कमालीची गैरसोय दूर करावी यासाठी सोन्याळच्या व माजी जिल्हा परिषद सदस्या सुशीला होनमोरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे. 

संख येथे अप्पर तहसिल कार्यालय सुरू झाले असले तरी अजूनही महसुल विभागाची बहुतांशी कामे ही या कार्यालयामार्फत करण्यात येत आहेत. परंतु  संख अप्पर तहसिल कार्यालय संख अंतर्गत पाच मंडल विभाग व या विभागातील ६७ गावातील लोकांना त्यांच्या जमिनिचे, घरजागेचे, प्लाॅटचे व्यवहार तसेच विविध बॅंकाकडील,सोसायट्याकडील  तारण गहाणखत, तसेच बक्षिस पत्र व मृत्यूपत्र आदी कामासाठी येथील नागरिक व पक्षकारांना तालुक्याच्या ठिकाणी जत येथिल दुय्यम निबंधक कार्यालयातच येण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. पाच मंडलविभागातील एकूण ६७ गावातील लोकांची सोय म्हणून संख या ठिकाणी दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिल्यास या भागातील लोकांचा जत येथे जाणे-येणेचा त्रास वाचणार आहे. व संख पासून जत दुय्यम निबंधक कार्यालयाचे अंतरही लांब आहे. शिवाय जत दुय्यम निबंधक कार्यालयात आल्यानंतर जत पूर्व भागातील लोकांची कामे एका दिवसात न होता त्यासाठी चार- चार दिवस पक्षकारांना कामासाठी ताटकळत बसावे लागत असल्याचा येथील पक्षकारांना अनेक वेळा अनुभव आला आहे. तसेच याकामी त्यांचा वेळ व पैसाही खर्च करावा लागत आहे. तरी नव्याने संख येथे दुय्यम निंबधक कार्यालय सुरु करणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधीनी शासनाकडे पाठपुरावा करावा.-कामण्णा पाटील,
माजी सरपंच जालिहाळ खुर्द ता जत

Wednesday, July 22, 2020

के. एम. हायस्कूल व ज्यु. कॉलेजचे १२ वी परीक्षेत यश

जत (जत न्यूज वृत्तसेवा)- 
जत येथील दि पिपल्स एज्युकेशन सोसायटी संचलीत के. एम. हायस्कूल व ज्यु .कॉलेजच्या इयत्ता १२ वीचा निकाल ९०.५ ७ टक्के इतका लागला असून कला शाखा कन्नड माध्यम ९६.६१ टक्के लागला आहे. कला शाखा मराठी माध्यम ९० टक्के तर विज्ञान शाखा ९६.६१ टक्के इतका लागून  प्रशालेने उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे. 
जत येथील के.एम. हायस्कूल या विद्यालयात शिकणाऱ्या कु. गीतंजली जाधव ८१.५३ टक्के अनुराधा हिरवे ८०.०० टक्के, लोहगाव एल.पी. ७८.७६ टक्के, पाटील ए. आर. ७८.७६ टक्के, शिरहट्टी एस.एम. ७८  टक्के, संती एस पी ७७.०७ टक्के,  औताडे लक्ष्मी ७६.९२टक्के, पाटील वैंजता हे विद्यार्थी विशेष प्राविण्य गुण मिळवून उत्तिर्ण झाले व शाळेचे नाव उज्ज्वल केले. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक आर.एम. सय्यद व सर्व विषय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर गोब्बी व सर्व पदाधिकारी यानी सर्वांचे अभिनंदन केले.

Sunday, July 19, 2020

आशाच्या आंदोलनाला यश; मानधन वाढीचा निघाला आदेश

आता लढा शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी- कॉ.हणमंत कोळी
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
महाराष्ट्र आशा,गटप्रवर्तक फेडरेशन (सिटू)च्या आंदोलनाच्या पहिल्या टप्याला यश मिळाले असून कोरोना काळात प्रभावीपणे काम करणाऱ्या आशा व गटप्रवर्तकाच्या मानधनात वाढ केलेचा आदेश शासनाने 1 जूलैला काढला आहे. या मानधन वाढीमुळे आशा,गटप्रवर्तकांना बळ मिळणार आहे.मात्र आशा व गटप्रवर्तकांना आरोग्य कर्मचारी म्हणून शासकीय सेवेत घेत नाही,तोपर्यत हा लढा चालूच राहिल,अशी माहिती, फेडरेशनच्या जिल्हाध्यक्षा कॉ.मिना कोळी,संघटक कॉ.हणमंत कोळी यांनी दिली.

Thursday, July 16, 2020

राजे रामराव महाविद्यालयाचे 12 वी बोर्ड परीक्षेत यश

जत,(जत वृत्तसेवा)-
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ (पुणे) अर्थात एचएससी बोर्डाच्यावतीने घेण्यात आलेल्या 12 वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यात जत येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे यांनी सांगितले.  महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल ९४.१५ टक्के एवढा लागला असून कु. सौजन्या रमेश महाजन हिने ८३.३० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक तर कु. राणी उत्तम कांबळे हिने ८१.०७ टक्के गुण मिळवून व्दितीय क्रमांक मिळविला.

Sunday, July 12, 2020

जतमधील दडपलेल्या पाच मृत्यूप्रकरणांची सीआयडीमार्फत चौकशी करा : विक्रम ढोणे


पोलिस निरीक्षक शेळके यांच्या काळातील प्रकरणे; ढोणेंचे 17 जुलैला उपोषण 
जत, (जत न्यूज वृत्तसेवा) -
लॉकडाऊनच्या काळात जत तालुक्यातील राहूल दत्तात्रय काळे, कस्तुरी लक्ष्मण शिवणकर, म्हाळाप्पा शिवाजी मासाळ, महांतेश रामगोंडा पाटील, तुषार संभाजी शिंदे या पाचजणांच्या संशयित मृत्यूची प्रकरणे पोलिसांनी दडपलेली आहेत. हे सर्व लोक आर्थिक आणि सामाजिकदृष्या दुर्बल असल्याने पोलिस निरीक्षक रामदास शेळके यांच्या कार्यकाळात आरोपींना वाचवण्यासाठी तपास केला गेला आहे. त्यामुळे यातील सत्य बाहेर यावे म्हणून याप्रकरणांचा तपास राज्य गुन्हे अन्वेशन विभाग (सीआयडी) मार्फत करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी केली आहे.

स्वर्गीय राजारामबापू पाटील यांचे स्वप्न पूर्ण होणार - अँड. होर्तीकर

उमदी,(जत न्यूज वृत्तसेवा)-
खुजगाव धरण बांधून जत, कवठेमहांकाळ व आटपाडी  तालुका पाणीमय करण्याचे स्वप्न स्वर्गीय नेते राजारामबापू पाटील यांचे होते. ते स्वप्न त्यांचा मुलगा व आमचे नेते जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या रुपाने पूर्ण होत आहे. सन १९८२ साली स्वर्गीय राजारामबापू पाटील यांनी उमदी ते सांगली अशी पदयात्रा काढून जत तालुक्यातील जनतेची व दुष्काळी भागातील लोकांची पाण्यावाचून होणारी तडफड  शासनासमोर मांडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु काही विघ्नसंतोषी लोकांमुळे त्याकाळी पाणी आणण्याचे ते स्वप्न पूर्ण करता आले नाही. त्यामुळे तेच स्वप्न उराशी बाळगून जलसंपदामंत्री जयंतरावजी पाटील यांनी संपूर्ण जत तालुक्यासह पूर्व भाग पाणीमय करण्यासाठी कर्नाटक सरकारशी सकारात्मक चर्चा केली असून लवकरच जत तालुक्यासह जत पुर्व भागात पाणी येणार आहे. जतचा पाणी प्रश्न फक्त जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील हेच सोडतील असे वक्तव्य राष्ट्रवादी प्रदेश कार्यकारणी सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य अँड. चन्नापाण्णा होर्तीकर यांनी 'जत न्यूज पोर्टल'शी बोलताना केले.

Friday, July 10, 2020

सर्व कृषी सेवा केंद्रांमध्ये युरिया खत उपलब्ध करून द्या

सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत सोनवणेंची मागणी
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
जत तालुक्यात अनेक कृषी सेवा केंद्राचे दुकानात युरिया खताचा तुटवडा आहे, यापार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना एनबेली युरीया खत मिळत नसल्याने सर्व शेतक-यांची अडचण होत आहे, याकरिता जत येथील सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत सोनवणे यांनी तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांमध्ये युरिया खत उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

होलार समाज संघटनेकडून 'कोरोना योध्दा' सन्मानित

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
सध्या कोरोनाच्या काळात जत तालुक्यात काही समाजसेवक जनतेसाठी रात्रंदिवस आपापल्या पद्धतीने सहकार्य करत असताना त्यांच्या कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय होलार समाज संघटनेने तालुक्यातील सहा समाजसेवकांना 'कोरोना युद्धा' हा पुरस्कार देऊन सन्मानित केले.  यामध्ये जतमधील प्रसिद्ध स्त्री रोगतज्ज्ञ  डॉ. रविद्र आरळी, कामगार सेना राज्य उपाध्यक्ष दिनकर पतंगे, लायन्स कॅबिनेट आॅफीसर राजेन्द्र आरळी, डॉ. नितिन पतंगे व सौ डॉ. प्रगती पतंगे, कवी शिक्षक सहदेव उर्फ एम जगदीश माळी, कवी व अभिनेता राजू सावंत या सर्वांना अखिल भारतीय होलार समाज संघटना संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष आबासाहेब ऐवळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन  गौरविण्यात आले.

Thursday, July 9, 2020

भारतीय चर्मकार समाज संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी गणेश बागडे

जत, (जत न्यूज वृत्तसेवा) -
भारतीय चर्मकार समाज मुंबई, महाराष्ट्र या राज्यस्तरीय संघटनेच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी उमदी (विठ्ठलवाडी) येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते गणेश बागडे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड भारतीय चर्मकार समाज मुंबई, महाराष्ट्रचे राज्याध्यक्ष पंढरी महादेव चव्हाण यांनी केली असून तसे नियुक्तीचे पत्र त्यांना नुकतेच प्रदान करण्यात आले आहे.

Tuesday, July 7, 2020

उमदी गुरुवारपासून सलग पाच दिवस बंद

जत (जत न्यूज वृत्तसेवा)- 
जत तालुक्यात वाढत चाललेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उमदी ग्रामपंचायतीने गुरुवारपासून सलग पाच दिवस उमदी गाव बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.जत तालुक्याच्या सर्वच भागात आता कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे खबरदारी म्हणून 'जनता कर्फ्यु' लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Monday, July 6, 2020

म्हैसाळ विस्तारित सिंचन योजनेच्या मान्यतेसाठी जनजागृती करणार-प्रकाश जमदाडे

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
म्हैशाळ विस्तारीत जत उपसा सिंचन योजनेस मान्यता देणेसाठी जनजागृती करणार असल्याची माहिती बाजार समितीचे माजी सभापती व केंद्रीय रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यानी पत्रकार बैठकीत दिली. ही कामे पूर्ण झाली तर जत तालुक्यातील वंचित 65 गावांनाही पाणी मिळणार असून त्याचबरोबर या पुढे कधीच तालुक्यात पाण्याच्या टँकरची व चारा छावण्यांची आवश्यकता भासणार नाही.

जत तालुका बेकरी व स्वीट मार्ट अध्यक्षपदी विनय अय्यंगार व उपाध्यक्षपदी मिथून माने यांची निवड

जत, (जत न्यूज वृत्तसेवा)-
जत तालुका बेकरी व स्वीट मार्ट संस्थेच्या अध्यक्षपदी विनय अय्यंगार व उपाध्यक्षपदी मिथून माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्या. यावेळी महादेव अंदानी, सिध्दू माळी, मिलिंद माने, महादेव बडकुंद्री, यांच्यासह जत तालुक्यातील बेकरी व्यावसायिक उपस्थित होते.

Sunday, July 5, 2020

राजे रामराव महाविद्यालयातील प्रयोगशाळा सहायक मारुती चव्हाण सेवानिवृत्त

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
 महाविद्यालयाच्या कर्मचारी व सेवकांमुळेच समाजात व शैक्षणिक क्षेत्रात राजे रामराव महाविद्यालयाची प्रतिष्ठा वाढत आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे यांनी व्यक्त केले. ते महाविद्यालयाच्या पदार्थविज्ञान विभागाकडे ४० वर्षे सेवा बजावलेल्या प्रयोगशाळा सहायक मारुती चव्हाण यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने आयोजित सत्कार समारंभात बोलत होते. यावेळी प्रा. श्रीमंत ठोंबरे, प्रा. कुमार इंगळे, मनु मोरे, राम शिंदे, गजानन कुंभार रियाज गंजिवाले, तुकाराम शिंगाडे, नामदेव खुडे आदी प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

व्हसपेठ येथील मोटारसायकल अपघातात सोन्याळचा शेळ्या-मेंढयांचा व्यापारी ठार

सोन्याळ,(जत न्यूज वृत्तसेवा)-
व्हसपेठ (ता.जत) येथे दुचाकी अपघातात  शेळ्या मेंढ्याचा व्यापाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी पहाटे घडली. मयत  म्हाळाप्पा लक्ष्मण गारळे (वय ४० रा.सोन्याळ (गारळेवाडी २) येथील रहिवासी आहे.  अधिक माहिती अशी की , म्हाळाप्पा हा वळसंग येथील बहिणीकडे स्पेंलडर एम.एच. १०. बी. क्यु.६५१० गाडीने एकटाच कामानिमित्त व भेटण्यासाठी गेला होता.

Saturday, July 4, 2020

जिल्ह्यात लॉकडाऊनचा कोणताही विचार नाही

अफवांवर विश्वास ठेवू नका स्वयंशिस्त मात्र पाळा
- जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी
सांगली दि.४(जत न्यूज वृत्तसेवा)-
 कोरोणाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन करण्याच्या अफवा काही समाज विघातक प्रवृत्तींकडून पसरविल्या जात आहेत. याची दखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत  चौधरी यांनी जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा सध्या कोणताही विचार नसून याबद्दल प्रशासन स्तरावर कोणतीही चर्चा नाही. प्रशासन सर्व परिस्थितीवर बारकाईने नजर ठेवून आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. विनाकारण पॅनिक होऊ नये.

Friday, July 3, 2020

मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना कर्नाटकप्रमाणे पदोन्नती द्या

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे महासचिव नामदेव कांबळे यांची मागणी
सांगली,(प्रतिनिधी)-
राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना कर्नाटक राज्याप्रमाणे पदोन्नती देणेत यावी अशी  मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे महासचिव नामदेवराव कांबळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, राज्यातील सर्व विभागाकडील मागासवर्गीय वर्ग 3 व 4 च्या पदावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या सन 2017 पासून राज्यात स्थगिती केल्या आहेत. सामान्य प्रशासन 16 ब विभागाने दिनांक 29 डिसेंबर 2017 ला एक साधे पत्र प्रसिद्ध केल्यामुळे राज्यातील सर्व खाते प्रमुखांनी त्या पत्राच्या आधारावर  मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणे बंद केले आहे.

राज्यातील अनुसूचित जाती-जमातीच्या कुटुंबांना वीज दरात सवलत द्या

राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची मागणी
सांगली,(प्रतिनिधी)-
राज्यातील अनुसूचित जाती-जमातीच्या कुटुंबियांना वीज दराच्या आकारणीमध्ये सवलत देण्याची मागणी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचेकडे कास्ट्राईब कर्मचारी महासंघ (महाराष्ट्र) चे राज्य महासचिव नामदेव कांबळे यांनी  निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदनात कांबळे यांनी म्हटले आहे की, देशातील तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी अनुसूचित जाती/ जमाती, इतर व झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबांना मोफत वीज पुरवठा करणेचे धोरण अंमलात आणले होते.