Friday, July 3, 2020

राज्यातील अनुसूचित जाती-जमातीच्या कुटुंबांना वीज दरात सवलत द्या

राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघाची मागणी
सांगली,(प्रतिनिधी)-
राज्यातील अनुसूचित जाती-जमातीच्या कुटुंबियांना वीज दराच्या आकारणीमध्ये सवलत देण्याची मागणी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचेकडे कास्ट्राईब कर्मचारी महासंघ (महाराष्ट्र) चे राज्य महासचिव नामदेव कांबळे यांनी  निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदनात कांबळे यांनी म्हटले आहे की, देशातील तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी अनुसूचित जाती/ जमाती, इतर व झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबांना मोफत वीज पुरवठा करणेचे धोरण अंमलात आणले होते.
त्या काळी या योजनेचा महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण देशामध्ये अंमलबजावणी झाली. परंतू सद्यस्थितीत सदर योजना बंद असल्यामुळे दरमहा येणाऱ्या घरगुती भरमसाट वीज बिलामुळे सामान्य जनता हैराण झाली आहे. जे कुटुंब (ग्राहक) निव्वळ विजेचा घरगुती वापर करते, तेवढ्याच वापराच्या बिलाची आकारणी व्हायला हवी. इतर आकारामध्ये अनेक प्रकारचे टॅक्स लावले जातात. त्यामध्ये स्थिर आकार, वहन आकार, इंधन समायोजन आकार, व विजशुल्क या आकारण्या सामान्य कुटुंबाला लावण्यात येऊ नयेत. या वारेमाप आकारणीमुळे सामान्य लोकांना दर महिन्याचे बील भरणे कठीण जाते. तरी या सरसकट टॅक्स मधून सामान्य जनतेला वगळावे व फक्त वीज वापराचेच बील लावावे अशी मागणी होती.
 तदनंतर शासनाने 100 युनिटच्या पर्यंत  वीज वापर बिलास माफी केली आहे. 100 युनिट वीज माफीनंतर  अनुसूचित जाती/ जमातीच्या कुटुंबाना  वीज वापरावर विविध प्रकारचे आकारले जाणारे टॅक्स माफ करावे, अशी मागणी पुन्हा ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचेकडे  केली आहे. अशी माहिती कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे वरीष्ठ उपाध्यक्ष गणेश मडावी यांनी दिली.

No comments:

Post a Comment