Sunday, July 12, 2020

स्वर्गीय राजारामबापू पाटील यांचे स्वप्न पूर्ण होणार - अँड. होर्तीकर

उमदी,(जत न्यूज वृत्तसेवा)-
खुजगाव धरण बांधून जत, कवठेमहांकाळ व आटपाडी  तालुका पाणीमय करण्याचे स्वप्न स्वर्गीय नेते राजारामबापू पाटील यांचे होते. ते स्वप्न त्यांचा मुलगा व आमचे नेते जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या रुपाने पूर्ण होत आहे. सन १९८२ साली स्वर्गीय राजारामबापू पाटील यांनी उमदी ते सांगली अशी पदयात्रा काढून जत तालुक्यातील जनतेची व दुष्काळी भागातील लोकांची पाण्यावाचून होणारी तडफड  शासनासमोर मांडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु काही विघ्नसंतोषी लोकांमुळे त्याकाळी पाणी आणण्याचे ते स्वप्न पूर्ण करता आले नाही. त्यामुळे तेच स्वप्न उराशी बाळगून जलसंपदामंत्री जयंतरावजी पाटील यांनी संपूर्ण जत तालुक्यासह पूर्व भाग पाणीमय करण्यासाठी कर्नाटक सरकारशी सकारात्मक चर्चा केली असून लवकरच जत तालुक्यासह जत पुर्व भागात पाणी येणार आहे. जतचा पाणी प्रश्न फक्त जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील हेच सोडतील असे वक्तव्य राष्ट्रवादी प्रदेश कार्यकारणी सदस्य माजी जिल्हा परिषद सदस्य अँड. चन्नापाण्णा होर्तीकर यांनी 'जत न्यूज पोर्टल'शी बोलताना केले.
कर्नाटक सरकार दुष्काळी भागाला पाणी देण्यासंदर्भात सकारात्मक असून पूर्व भागात कर्नाटकातील पाणी येईल तेव्हा दुष्काळी तालुक्यात पाणी देण्याचे स्वर्गीय राजारामबापू यांचे स्वप्न पूर्ण होईल. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांचे सुपुत्र जयंत पाटील यांची प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. ते जत तालुक्यात पाणी आणल्याशिवाय गप बसणार नाहीत, अशी भूमिका जयंत पाटील यांनी घेतली आहे. सध्या कर्नाटकातील हिरे पडसलगी योजनेतून पाणी पूर्व भागातील काही गावांना देण्यासाठी कर्नाटक सरकारशी चर्चा केलेली आहे. या चर्चेला कर्नाटक सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे २१ गावांना कर्नाटकातील हिरे पडसलगी योजनेतून पाणी मिळू शकते, १८ समाविष्ट गावांना म्हैसाळ योजनेतून पाणी मिळेल, राहिलेल्या ३२ गावांचा म्हैसाळ योजनेत नव्याने समावेश करून पाणी देण्याचे नियोजन आहे. कर्नाटकाला सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा काही भाग जत तालुक्यात कसा देता येईल याबाबत विचार केला जात आहे. सर्व योजनांना बळ देऊन जत पूर्व भागातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी एका बैठकीत यापूर्वी सांगितले होते, असे अँड.होर्तीकर म्हणाले.
       सध्या महाराष्ट्रातील पाणी कर्नाटकाला देण्यासंदर्भात विचार विनिमय होत असून यात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची महत्त्वाची भूमिका आहे. जर कर्नाटकाला पाणी द्यायचे असेल तर महाराष्ट्राला कर्नाटक आणीबाणीच्या काळात पाणी देण्यासंदर्भात विचार केल्यास महाराष्ट्राकडून कर्नाटकला पाणी देण्याचा विचार होऊ शकेल,अशी भूमिका घेतल्याने कर्नाटक सरकारला पाणी हवे असेल तर महाराष्ट्राच्या दुष्काळी जत तालुक्याला पाणी देणे कर्नाटकला भाग पडेल. त्यामुळे जत तालुक्यातील पाणी प्रश्न मिटेल असा विश्वास अँड. होर्तीकर यांनी व्यक्त  केला.

सन १९८२ साली जत तालुक्यातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी व जत दुष्काळी भागातील लोकांच्या वेदना शासन दरबारी मांडण्याकरिता सांगली ते उमदी अशी पदयायात्रा स्वर्गीय राजारामबापू पाटील यांनी काढली होती. यामध्ये मी व कॉम्रेड कल्लाप्पाण्णा होर्तीकर सहभागी झालो होतो. आजही आम्ही दोन्ही कुटुंबीय स्वर्गीय राजारामबापू पाटील यांचे  अनुयायी असून जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे जत तालुक्यातील पाणी प्रश्न सोडवत असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
   - माजी जि.प.उपाध्यक्ष बसवराज पाटील

No comments:

Post a Comment