Tuesday, July 28, 2020

ऑनलाईन शिक्षणापासून कन्नड माध्यमाचे विद्यार्थी वंचित- धानाप्पा माळी,बाळू कट्टीमनी

सोन्याळ,(जत न्यूज वृत्तसेवा)-
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यशासन, जिल्हा परिषद आणि डाएट यासारख्या आदी संस्थांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी मराठी व उर्दू माध्यमाच्या विध्यार्थ्याकरिता “शाळा बंद, शिक्षण चालू” हा ऑनलाईन शैक्षणिक उपक्रम राज्यभर राबवत आहे.हे स्वागतार्ह आहे. परंतु कन्नड माध्यमाचे विद्यार्थी मात्र या उपक्रमापासून वंचित आहेत.यासाठी शासनाने कन्नड माध्यमातील तज्ज्ञ शिक्षकांना आमंत्रित करून तसे अभ्यासक्रम तयार करवून घ्यावे व कन्नड माध्यमातून ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात यावे, अशी मागणी शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष धानाप्पा माळी आणि बाळू कट्टीमनी यांनी केली आहे.
सद्यस्थितीत कोरोना महामारीने उग्ररूप धारण केले असून त्याने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. यामुळे राज्यातल्या शाळा-महाविद्यालये बंद आहेत. मात्र तरीदेखील महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने “शाळा बंद, शिक्षण सुरू” हा उपक्रम राबवित आहे. हा स्तुत्य उपक्रम आहे. अनेक विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा फायदा होत आहे. या उपक्रमांतर्गत दीक्षा ऍप व ezee test app द्वारे फक्त मराठी व उर्दू माध्यमाचे विद्यार्थ्यांसाठी नमुना पाठ आणि व्हिडिओ बनवून त्यांचे सोय केलेली आहे. पण कन्नड माध्यमाच्या विद्यार्थ्यांची शिक्षण विभागाने कोणत्याही प्रकारची सोय केलेली नाही. राज्य स्तरावर पाठ्यपुस्तक मंडळ व अभ्यास गटात अनेक कन्नड विषयाचे तज्ञ मंडळी कार्यरत असून त्यांचे उपयोग या कामासाठी करून घेता येईल.तसेच शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांसमोरही श्री. माळी आणि श्री. कट्टीमनी या दोघांनी कन्नड माध्यमाच्या विद्यार्थ्यांची कैफियत मांडलेली आहे. शासनाने पाठयपुस्तक आणि विविध अभ्यास मंडळावर कार्यरत असलेल्या तज्ज्ञ कन्नड अभ्यासकांशी चर्चा करून राज्यातील जवळ जवळ साडेपाच हजार शिक्षक आणि चाळीस हजार कन्नड माध्यमांच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन शिक्षणाची सोय करून द्यावी, अशी मागणी कन्नड विभागाचे राज्य प्रतिनिधी व शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष धानाप्पा माळी आणि शिक्षक समितीचे नेते बाळू कट्टीमनी यांनी केली आहे.

2 comments:

  1. पाठ्य पुस्तक कन्नड तज्ञ मंडळी कडून काम होत नाही
    नवीन शिक्षक तंत्र स्नेही ( कन्नड) त्यांचं उपयोग आवश्यक आहे.

    ReplyDelete