Monday, July 6, 2020

म्हैसाळ विस्तारित सिंचन योजनेच्या मान्यतेसाठी जनजागृती करणार-प्रकाश जमदाडे

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
म्हैशाळ विस्तारीत जत उपसा सिंचन योजनेस मान्यता देणेसाठी जनजागृती करणार असल्याची माहिती बाजार समितीचे माजी सभापती व केंद्रीय रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यानी पत्रकार बैठकीत दिली. ही कामे पूर्ण झाली तर जत तालुक्यातील वंचित 65 गावांनाही पाणी मिळणार असून त्याचबरोबर या पुढे कधीच तालुक्यात पाण्याच्या टँकरची व चारा छावण्यांची आवश्यकता भासणार नाही.

श्री. जमदाडे म्हणाले की,1984 साली 63 कोटीची म्हैसाळ योजना अस्तित्वात आली.  मात्र पुढे ही योजना थांबली. पुढे सरकलीच नाही. 1995 साली युतीच्या शासन काळात जत तालुक्यातील 22 हजार 500  हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणताना 16 लघू पाटबंधारे तलाव, संख व दोड्डनाला हे दोन मध्यम प्रकल्प भरून देणची तरतुद करून जत तालुक्याचा म्हैसाळ योजनेत समावेश करण्यात आला. पुरेसा निधी व राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे आजही योजना पुर्ण होवू शकली नाही. खासदर संजय (काका) पाटील यांनी 2015 मध्ये म्हैसाळ योजनेचा प्रधानमंत्री सिंचन योजनेत समावेश केला. केंद्र सरकार कडून खा. संजयकाका पाटील यांनी मोठया प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला व माजी आमदार विलासराव जगताप यांनी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करून उत्तरेस येळवी, सनमडी तलावात पाणी आणले तर दक्षिणेस बिळूर पर्यंत पाणी गेले. खा. संजयकाका पाटील, कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष झाल्यावर 178 कोटी खर्च करून 462 कि.मी. पाईपलाइनद्वारे कामे प्रगतीत आहेत. मूळ म्हैसाळ योजना पुर्णत्वाच्या मार्गावर आहे.
सन 2012 साली पूर्व भागातील काही गावांनी आपल्याला पाणी मिळावे अथवा आम्हाला कर्नाटक राज्यात जायला  परवानगी द्या, अशी मागणी सरकारकडे केली होती. तेव्हा शिवसेनाप्रमुख आणि आज राज्याचे  मुख्यमंत्री असलेल्या उध्दव ठाकरे यांनी माडग्याळला भेट देवून जनतेच्या भावना समजून घेवून कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले होते. मंत्री जयंत पाटील यांनीही अर्थमंत्री असताना अनुशेष डावलून अनेक साठवण तलाव पुर्ण केली आहेत. ते सध्या जलसंपदा मंत्री आहेत. मंत्री विश्वजित कदम व जयंत पाटील या सर्वांनी मिळून या योजनेस त्वरीत मान्यता देऊन काम पुर्ण करावे, अशी मागणी श्री. जमदाडे यांनी केली.
तालुक्यात सरासरी 4 ते 5 इंच पाऊस पडतो. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचीही अवस्था बिकट असते. दरवर्षी पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. माहे जुलै 2019 मध्ये 89 गावांना 113 टँकरद्वारे पिण्यासाठी पाणी पुरवले होते. खा. संजयकाका पाटील यांनी 65 गावांसाठी म्हैशाळ विस्तारीत - जत उपसा सिंचन योजना मार्च 2019 मध्ये महाराष्ट्र शासनास सादर केली आहे. लोकसभेच्या प्रचारात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर योजनेस मान्यता देवू असे संख येथे जाहिर सभेत सांगितले होते. जत उपसा सिंचन योजनेसाठी मुळ म्हैशाळ टप्पा क्र. 3 बेडग येथुन 2.50 मिटर व्यासाच्या पाईनमधून 59 किमी अंतरावर तीन टप्यात पाणी उचलून मल्लाळ येथे वितरण हौदात सोडून तेथून 462 किमी लांबीची पाईपलाईन करून 48 पूर्ण व 17 वंचित गावातील 50 एकर क्षेत्र ओलिताखाली योणर आहे. यासाठी 5 टि.एम.सी पाणी लागणार आहे. साधारणपणे 838.13 कोटी खर्च अपेक्षित आहे. योजना बंदिस्त पाईपलाईनमधून असलेने भुसंपदनाचा प्रश्न नाही.
सध्या कृष्णा खोऱ्यात कृष्णा लवादानुसार बिगर सिंचनासाठी 33 टि.एम.सी पाणी राखीव आहे, परंतु सध्या फक्त 9 टी.एम.सी. पाण्याचा वापर होत आहे. भविष्यात 20 टि.एम.सी पाणीवापर गृहीत धरला तरीही 13 टि.एम.सी. पाणी शिल्लक राहते. या पाण्यापैकी या योजनेचे 5 टि.एम.सी. पाणी उपलब्ध होवू शकते. कृष्णा खोरे लवादानुसार समुच्चय पाणी वापर 594 टि.एम.सी. असून लवादाच्या सूत्रानुसार 662 टि.एम.सी पाणी वापर अपेक्षित आहे. त्यामुळे कृष्णा खोऱ्यातील लवादाने दिलेल्या मर्यादेअंतर्गत पाणी वापर करून कायदयाच्या चौकटीत पाणी वापराचे उल्लंघन न करता या योजनेस पाणी मिळू शकते. सदरची योजना तांत्रिक भौतिक व अर्थिक दृष्ट्या योग्य व परिपूर्ण असलेने खास बाब म्हणून मान्यता देऊन काम चालू करावे. योजनेमुळे कोणत्याही गावास पिण्यासाठी टॅँकर द्यावा लागणार नाही. किंवा चारा छावण्यांची अावश्यकता भासणार नाही. सदर योजनेबाबत 65 गावांतून जनजागृती करून सर्व पक्षीय नेते,शेतकरी व पत्रकार मित्रांना बरोबर घेवून मंत्री जयंत पाटील व खा. संजयकाका पाटील यांच्या माध्यमातून योजना पूर्ण करण्यासाठी संचारबंदी शिथिल झालेनंतर जनजागृती करणार असल्याचे श्री.जमदाडे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment