Friday, July 31, 2020

वाद्य कलाकारांवर उपासमारीची वेळ

आर्थिक मदत देण्याची मागणी ;३ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन 
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे वाद्य कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. विवाहासह आनंदाच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या या वाद्य कलाकारांना आता कामच नसल्याने त्याची आर्थिक स्थिती मोठी बिकट झाली आहे. अशा या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो  कलाकारांना सध्या काम नाही. त्यामुळे सरकारने सरसकट पाच हजार रुपये प्रत्येक कलाकारांना मदत द्यावी, या मागणीसह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय होलार समाज संघटना(A)गट यांचेवतीने जत तहसील कार्यालयासमोर दि.३ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.याबाबतचे निवेदन तहसिलदार कार्यालयास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब ऐवळे ,जेष्ठ नेते रामभाऊ हेगडे व जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब गेजगे यांनी दिले आहे.
 या निवेदनात अनेक मागण्या नोंदवण्यात आल्या आहेत. जिल्हास्तरीय कलाकार मानधन समितीमध्ये होलार समाजातील कलाकारांना प्रतिनिधीत्व मिळावे. सर्व कलाकारांना शासनाने कोरोना कालावधीमध्ये सरसकट पाच हजार रुपये मानधन देण्यात यावे व वयाची अट रद्द करावी. तसेच सर्व कलाकारांना शासनाने जीवनावश्यक वस्तुचे वाटप करावे. कलाकारांनाही राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज पुरवठा करण्यात यावा व तसे बँकाना शासनाने आदेश करावेत.अनेक कलाकार हे कोरोना या  आजारावर प्रबोधन जनजागृती करत आहेत, त्यांना शासनामार्फत
योग्य मानधन देऊन कार्यक्रम करणेसाठी परवानगी देणेत यावी, अशा  मागण्या करण्यात आल्या आहेत.या मागण्यांसाठी दि.३ ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment