Monday, August 31, 2020

बिसलसिदराया मंदिराच्या सभागृह कामाचे आमदार सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

जतपासून काही अंतरावर असलेल्या आणि अचकनहळळी (ता.जत) हद्दीत असलेल्या  येथे श्री बिसल सिध्देश्वर मंदिरा समोर सामाजिक सभागृह बांधकामाचे भूमीपूजन आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. आमदार श्री. सावंत यांच्या स्थानिक विकास निधीतून या सभागृहाचे काम होणार असून यामुळे भाविकांची सोय होणार आहे.

जतपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर जत -येळवी मार्गावर श्री बिसलसिद्धेश्वरचे मंदिर असून याठिकाणी सभागृहाची नितांत आवश्यकता होती. आमदार विक्रमसिंह(दादा)सावंत यांच्या स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून ही गरज आता पूर्ण होणार आहे. या भूमिपूजन समारंभाला जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अप्पाराया बिराजदार,माजी पं.स. सभापती बाबासाहेब कोडग,पं.स.सदस्य रविंद्र सावंत,सरपंच सतीश व्हनकट्टे,उपसरपंच पिंटू स्वामी, मधुकर शिंदे,देवस्थान कमिटीचेअरमन समाधान शिंदे, सुरेश शिंदे,गिरमल माळी,पांडुरंग शिंदे,किसन शिंदे,भाऊ शिंदे,गुरप्पा कोरे,व ग्रामस्थ उपस्थित होते.

उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा लाखाचा गांजा जप्त : एकास अटक


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

जत तालुक्यातील संख येथे तूरीच्या शेतात गांजा शेती केल्याची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी 5 लाख 72 हजार रुपयांचा गांजा छापा टाकून जप्त केला.

आज सोमवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२० रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. जी. कोळेकर हे सहकारी पोलिस कर्मचाऱ्यां सोबत संख हददीत पेट्रोलींग करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,संख गावी बिरादार वस्ती येथे राजेंद्र शिवाण्णा बिरादार  याने त्याचे ऊस व तुरीच्या शेतात गांजाची लागवड केल्याबाबत माहिती मिळाली. त्या ठिकाणी दोन पंचासमक्ष छापा टाकला असता सदर इसमाचे शेतीमध्ये ११४.५ किलो वजनाची गांजाची झाडे मिळुन आली त्याची किंमत ५ लाख ७२ हजार ५०० रुपये अशी आहे.सदर राजेंद्र शिवाण्णा बिरादार (रा.संख,ता.जत) यास ताब्यात घेतले असुन सदर इसमाविरुदध उमदी पोलीस ठाणे मध्ये गुंगीकारक औषधे द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८(क),२०(ब),२२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदर कामगिरी ही एएसपी संदीपसिंह गिल्ल यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक डी. जी. कोळेकर, पोलीस उपनिरीक्षक एन.बी.दांडगे,सपोफी कोळी, पोहेकॉ/४२१ गडदे,पोहेकॉ/६०६ पलुसकर ,पोना/१३७० खरात, पोशि/६०८ कुंभारे, होमगार्ड कराडे, नरळे, कोकरे,एंरडे,मोटे यांनी पार पाडली.

जतचे माजी नगराध्यक्ष इक्बाल (पटू) गवंडी यांचे निधन


जत, (जत न्यूज वृत्तसेवा)-

 जतचे माजी सरपंच,जत नगरपरिषदेचे माजी नगरसेवक व विद्यमान नगरसेवक इकबाल उर्फ पट्टू  गवंडी (वय 55) यांचे नुकतेच मिरज येथील एका खासगी हाॅस्पीटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. गेले महिनाभर ते आजारी होते. गवंडी जत ग्रामपंचायतीवर सलग तीनवेळा निवडून आले होते. त्यानंतर नगरपरिषद स्थापन झाल्यानंतरही  ते लागोपाठ  दोनवेळा निवडून आले होते. जतला ग्रामपंचायत असताना सरपंच,उपसरपंच म्हणून व नगरपरिषद स्थापन झाल्यानंतर नगराध्यक्षही म्हणून काम पाहिले होते. सध्या नगर परिषदेवर विद्यमान नगरसेवक होते. अतिशय शांत, संयमी आणि लोकोपयोगी असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.  त्यांच्या निधनाने जत शहरावर शोककळा पसरली आहे.

जत प्रांत कार्यालयातील कारकून लाचलुचपतच्या जाळ्यात

 


जत, (जत न्यूज वृत्तसेवा)- 

जत येथील उपविभागीय कार्यालयातील अव्वल कारकून (भूसंपादन) श्रीकांत कृष्णा चंदनशिवे यास लाच घेताना आज अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधात्मक पथकाच्या जाळ्यात आज  सोमवारी दुपारी सापडला. लाच घेतल्यानंतर कार्यालयातील आपल्या खुर्चीवर जाऊन बसला असता लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली.

श्रीकांत कृष्णा चंदनशिवे (वय ४६ वर्ष ) हा अव्वल कारकून म्हणून जत येथील उप विभागीय अधिकारी उपविभाग कार्यालयात कार्यरत आहे.  हा कर्मचारी मूळचा  कवठेमहांकाळ येथील आंबेडकर नगर येथील असून  यास 20 हजार रुपये लाच स्विकारल्यानंतर रंगेहात पकडले. सांगली लाच लूचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.तक्रारदार यांची बागेवाड़ी पो.वाषाण ता.जत जि. सांगली येथील जिरायत शेतजमीन म्हैशाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत जत कालवा या शासकीय कामामध्ये गेलेली आहे. सदर शेतजमीनीची शासकीय नुकसान भरपाईची फाईल मंजूर करून देणे करिता चंदनशिवे यांनी २५ हजार रूपये लाच मागणी केली असल्या बाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत कार्यालयाकडे  तक्रार दिली होती.

तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आज दिनांक ३१ ऑगस्ट २०२० रोजी ब्युरोच्या कार्यप्रणाली प्रमाणे पडताळणी केली असता त्यामध्ये श्री.चंदनशिवे यांनी तक्रारदार यांच्याकडे प्रथम २५ हजार रूपये लाचेची मागणी करून चर्चे अंती २० हजार रूपये लाचेची मागणी करून लाच रक्कम घेवून येण्यास सांगीतलेचे निष्पन्न झाले. त्यानंतर लागलीच उप विभागीय अधिकारी उपविभाग जत कार्यालय याठिकाणी सापळा लावला असता श्री.चंदनशिवे यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करून २० हजार रूपये लाच रक्कम स्विकारले असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्या अनुषंगाने श्री.श्रीकांत कृष्णा चंदनशिवे यांचे विरुध्द जत पोलीस स्टेशन येथे लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरु आहे. सदरची कारवाई राजेश बनसोडे (पोलीस उपआयुक्त /पोलीस अधीक्षक,) व श्रीमती सुषमा चव्हाण (अपर पोलीस उप आयुक्त /अपर पोलीस अधीक्षक) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सुजय घाटगे,(पोलीस उप अधीक्षक), गुरूदत्त मोरे (पोलीस निरीक्षक) तसेच पोलीस कर्मचारी अविनाश सागर,सुहेल मुल्ला,संजय संकपाळ,सलिम मकानदार, धनंजय खाडे, सिमा माने, वीणा जाधव, चालक बाळासाहेब पवार यांनी केली आहे.

Sunday, August 30, 2020

कोविड रुग्णांसाठी जिल्ह्यात शासकीय व खाजगी 27 रूग्णालये


या रुग्णालयांमध्ये 375 आयसीयु तर 1235 वॉर्ड बेडस् उपलब्ध - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

●आणखी 14 खाजगी रूग्णालये अधिग्रहीत 

सांगली, (जत न्यूज वृत्तसेवा)-

कोविड-19 रूग्णांच्या उपचारासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये आजअखेर कोविड रुग्णांच्या उपचारासाठी शासकीय व खाजगी अशी एकुण 27 रुग्णालये कोविड रुग्णालये म्हणुन अधिग्रहीत करण्यात आली असून यामध्ये कोविड रूग्णांवर उपचार सुरू आहेत. या सर्व रुग्णालयांमध्ये 375 आयसीयु बेडस् व 1 हजार 235 वॉर्ड बेडस, असे एकुण 1 हजार 610 बेडस् उपलब्ध करण्यात आलेले आहेत. यापैकी 14 रुग्णालये सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका हद्दीत असुन 13 रुग्णालये तालुका स्तरावर व ग्रामीण भागामध्ये आहेत. या व्यतिरिक्त आणखी 14 खाजगी रूग्णालये कोविड रूग्णालये म्हणून अधिग्रहीत करण्यात आली आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

 जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोविड रुग्णांच्या उपचारासाठी शासकीय व खाजगी अशी एकुण 27 रुग्णालये कोविड रुग्णालये म्हणुन अधिग्रहीत करण्यात आली आहेत. याव्यतिरीक्त डॉ. दिपक शिखरे, लाईफ केअर हॉस्पिटल कोल्हापुर रोड, डॉ. गोविंद कुलकर्णी यांचे जीएसके फ्रॅक्चर ॲन्ड ऑर्थोपेडीक हॉस्पिटल मिरज, डॉ.रविंद्र वाळवेकर यांचे हॉस्पिटल (भगवान महावीर कोविड सेंटर), डॉ.आशिष मगदुम यांचे क्रांती हॉस्पिटल ही सांगली व मिरज शहरातील हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल्स म्हणून अधिग्रहीत करण्यात आलेली आहेत. इस्लामपुर तालुक्यातील डॉ. कबाडे यांचे स्पंदन हॉस्पिटल आष्टा, आष्टा क्रिटीकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आष्टा, डॉ. शहा यांचे सुश्रुषा हॉस्पिटल इस्लामपुर, डॉ.वाठारकर यांचे आधार हॉस्पिटल इस्लामपुर, डॉ.सांगरुळकर यांचे साई मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, विटा तालुक्यातील डॉ. वारे यांचे श्री हॉस्पिटल विटा, तासगाव तालुक्यातील डॉ. जाधव यांचे हॉस्पिटल, डॉ. शिंदे यांचे श्री हॉस्पिटल, जत तालुक्यातील डॉ.आरळी यांचे उमा चॅरीटेबल हॉस्पिटल / शांताबाई आरळी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, डॉ.पट्टणशेट्टी यांचे मयुरेश्वर हॉस्पिटल ही हॉस्पिटल डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणुन अधिग्रहीत करण्यात आलेली आहेत.

 नागरिकांना या सर्व खाजगी व शासकीय अधिग्रहीत कोविड रुग्णालयांमध्ये असलेल्या एकुण बेडपैकी रिक्त असलेले आयसीयु बेडस व वॉर्ड बेडस ची माहिती तात्काळ व सहजरित्या उपलब्ध व्हावी म्हणुन संगणकीकृत बेड इन्फॉरमेशन सिस्टिम (Bed information system) विकसित करण्यात आलेली असुन या सिस्टिमवर दाखल होत असलेले रुग्ण व रुग्णालयांतुन डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण यांची माहिती रुग्णालयांकडुन Real Time अद्ययावत करण्यात येते. त्याचबरोबर रुग्णांना उपलब्ध बेडविषयी तात्काळ माहिती उपलब्ध करुन देण्याकरीता, जिल्हा परिषद व महानगरपालिका येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलेले असुन ते 24x7 कार्यरत आहेत. जिल्हा परिषद नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक 0233-2374900, 0233-2375900, 0233-2377900, 0233-2378900 आहे.  नियंत्रण कक्षाकडे संपर्क करणारे रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना बेड उपलब्धतेविषयी माहिती दिली जात असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले. 

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, रुग्णालयांकडुन माहिती अद्ययावत करुन घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनन प्रत्येक रुग्णालयासाठी 24x7 असे एकुण 30 प्रशासकीय अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. सदर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रुग्णालयात दाखल होण्यासाठी येत असलेल्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करुन घेण्यासाठी सर्वोतोपरी मदत करावयाची आहे. रुग्णालयाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांंची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयामध्ये उपचाराखाली असलेल्या रुग्णांची योग्य व अद्ययावत माहिती रुग्णांच्या नातेवाईकांना मिळावी म्हणून प्रत्येक रुग्णालयामध्ये मदत कक्ष (Help Desk) स्थापन करणेत आलेले असुन या मदत कक्षामार्फत रुग्णांच्या नातेवाईकांना मोबाईलव्दारे माहिती दिली जाते.

    रुग्णांना आकारण्यात येणाऱ्या बिलांच्या तपासणीसाठी मुख्य लेखा व वित्त अधिकारी आणि जिल्हा कोषागार अधिकारी यांच्या अधिपत्याखाली प्रत्येक रुग्णालयांसाठी लेखा परिक्षण अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आलेली असून रुग्णांना डिस्चार्ज देण्यापूर्वी रुग्णालयाकडून आकारण्यात आलेल्या बिलांची तपासणी करण्यात येत आहे. जिल्हास्तरावर याबाबत शहरी भागासाठी 01 व ग्रामीण भागासाठी उपविभागनिहाय प्रत्येकी 01 भरारी पथक गठीत करण्यात आलेले असुन त्यांच्यामार्फत अचानक रुग्णालयांना भेटी देवून महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि रुग्णालयांकडून आकारण्यात येत असलेल्या बिलांबाबत तपासण्या करण्यात येत असल्याचे  जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले. 

 दाखल रुग्णांपैकी वैद्याकिय तपासणीअंती ज्या रुग्णांना डेडीकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये सक्रीय उपचारांची गरज नाही व जे रुग्ण डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर (DCHC) मध्ये ऑक्सिजन सुविधायुक्त बेडसवर अथवा कोविड केअर सेंटर (CCC) मध्ये उपचाराखाली राहू शकतात किंवा जे रुग्ण गृह विलगीकरणामध्ये राहू शकतात याबाबतचा आढावा घेण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या नियंत्रणाखाली तज्ज्ञ डॉक्टरांच्या एकुण 04 पर्यवेक्षणीय समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत. उपचाराधिन व उपचाराअंती डिस्चार्ज देण्यास योग्य असलेल्या रुग्णांची माहिती घेवून डिस्चार्ज पॉलिसीची अंमलबजावणी योग्यरित्या होते किंवा कसे याबाबत या तपासणी पथकांमार्फत तपासणी करण्यात येत आहे. 

  सर्व कोविड रुग्णालयांसाठी ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी  राज्यातील विविध ठिकाणी संपर्क साधणे आणि वेळेवर, जलद व पुरेसा ऑक्सिजन साठा उपलब्ध करुन देणे यासाठी महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, प्र. सहायक आयुक्त औषधे (अन्न व औषध प्रशासन), प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी यांचे पथक गठीत करण्यात आलेले आहे. नेमण्यात आलेल्या सर्व शासकीय प्रशासकीय अधिकारी, लेखाधिकारी, तपासणी पथके व रुग्णालयांचे कर्मचारी या सर्वांचे याबाबत जिल्हा प्रशासनामार्फत प्रशिक्षण घेण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.


किसान रेल्वे जतरोड आणि कवठेमहांकाळ रेल्वे स्टेशनवर थांबवा-प्रकाश जमदाडे


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

किसान रेल्वे जत तालुक्यातील  जतरोड( वाळेखिंडी) आणि कवठेमहांकाळ रेल्वे स्टेशनवर थांबवण्यात यावी, अशी मागणी रेल्वे मंत्रालय,दिल्ली येथे खासदार संजय(काका) पाटील यांच्या माध्यमातून  करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे बोर्ड (पुणे) विभागाचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी पत्रकारांना दिली.
जत, कवठेमहांकाळ, तासगाव आणि आटपाडी या परिसरात डाळींब, पेरू, द्राक्षे , केळी, बेदाणे , लिंबू, शेंगदाणे ,ड्रॅगन इ.महत्त्वाच्या फळ बागा असून मोठ्या प्रमाणात शेतकरी यांचे उत्पादन घेत आहे. या फळांना मोठ्या प्रमाणात मार्केट हे  मुंबई आणि दिल्ली येथे असल्याने व अगोदर या भागातून रेल्वेची या शहरात सरळ सेवाही नव्हती. म्हणून नाईलाजाने रस्ते मार्गाने हा माल पाठविण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर येत असते.  त्यामुळे साहजिकच हा फळ माल मार्केटपर्यंत  पोहचण्यासाठी अधिक  वेळ लागतो. शिवाय फळं ही नाशवंत असल्या कारणाने ती ताजी राहत नाहीत. याचा मोठा फटका फळांना बसतो ,कारण त्यामुळे  त्यांना दरही कमी मिळतो. शिवाय रस्ते वाहतुकीचा खर्च हा इतर वाहतुकीपेक्षा अधिक असून त्यामुळे  शेतकऱ्यांना  जास्त अर्थिक भुर्दंड बसतोय. फळे उत्पादन करण्याबरोबरच  वाळेखिंडी, सिंदूर (ता.जत)  येथील शेतकरी हे  दुधावर प्रक्रिया करून बनविणाऱ्या अति उच्च गुणवत्ता असलेले जंम्बो पेढ्याचा पारंपारिक व्यवसाय करत आले आहेत. पण दिल्ली आणि मुंबई पर्यत हा माल रस्ते मार्गाने जावूपर्यत बराच कालावधीत जातो. साहजिकच व्यवसायिक ते ग्राहक असा प्रवास लगेच होत नसल्याचे कारणाने आणि हा माल दुधाचा असल्याने   दीर्घकाळ टिकत नाही  किंवा त्याच्या गुणवत्तेमध्ये फरक पडतो.
या शिवाय दिल्ली, मुंबई या मार्केटमधून येणारा मालही रस्ते मार्गाने फिरत-फिरत येत आसल्याने वाहतुकीचा खर्च जास्त होवून जत आणि कवठेमहांकाळ या मार्केट पर्यत हा माल येईपर्यंत या मालांची गुणवत्ता कमी होते. शिवाय किंमतही वाढते त्यामुळे छोट्या उद्योजक आणि व्यापाऱ्याना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. म्हणून जत रोड आणि कवठेमहांकाळ रेल्वे स्टेशनवरती किसान रेल्वे थांबा देण्यात यावा,अशी मागणी करण्यात येणार आहे असे जमदाडे यांनी सांगितले .
21 ऑगस्ट 2020 पासून नाशवंत कृषी मालाच्या वाहतुकीसाठी किसान रेल गाडीची सेवा सुरूवात करण्यात आली आहे. याचा उपयोग भाजीपाला आणि फळांची वाहतुक करण्यात होत आहे.  ही रेल्वे जत आणि कवठेमहांकाळ परिसरातील छोटे शेतकरी आणि छोट्या व्यापा-यांच्या कृषी उत्पादनांच्या वाहतुकीची गरज भागवणार आहे. मार्गावरील जत रोड आणि कवठेमहांकाळ थांब्यावर नाशवंत मालाची लोडिंग आणि अनलोडिंग करण्याची परवानगी दिली जाणार आहे . ही सेवा सुरूवातीला आठवड्यातून एकदा असेल, तथापि वापरकर्त्याच्या अनुभवावर आधारित आणखी सेवा वाढवली जाईल. ही रेल्वे कोल्हापुरहून निघेल व  मिरज, कवठेमहांकाळ,जतरोड, सांगोला, पंढरपुर, कुर्डुवाडी, दौंड आणि अहमदनगर या स्थानकावर थांबेल. सदर गाडीचे डब्बे गाडी क्र. 00107/00108 देवलाली-मुझफ्फरपूर-देवलाली गाडीला मनमाड रेल्वे स्थानकावर जोडले व काढले जातील. यामुळे  प्रयागराज चौकी, न्यु चौकी (अलहाबाद चौकी), दिनदयाल उपाध्य (मुगलसराय), बक्सर, दानापुर (पटणा) आणि मुझफ्फरपुर यापरिसरात नाशवंत कृषी माल पाठविण्यात येईल.  यामुळे जत आणि कवठेमहांकाळ तालुक्याच्या परिसरातील  शेतकरी आणि व्यापाराचा माल सुरक्षित आणि जलद गती पोहचविण्यास मदत होणार आहे.

Saturday, August 29, 2020

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून चोरीतील १६ मोटरसायकली जप्त :एकास अटक


सांगली, (जत न्यूज वृत्तसेवा)- 

पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा सांगली, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले यांनी सांगली जिल्हयातील वाढत्या मोटारसायकलीच्या चोरीचे प्रमाण पाहून पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांना सदर बाबतचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्या प्रमाणे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी खास पथके तयार करून रेकॉर्डवरील आरोपी व संशयीत यांचा शोध करण्याकरीता आदेश दिले होते. त्या अनुषंगाने आज दि. २९ ऑगस्ट २०२० रोजी जत विभागामध्ये पेट्रोलिंग करत असताना रेकॉर्डवरील आरोपी व संशयीत यांची माहिती घेत असताना प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर यांना खबऱ्यामार्फत बातमी मिळाली की, सागर पवार (रा. पांडोझरी, पारधी वस्ती, ता.जत) हा चोरीतील मोटरसायकलसह संख परिसरामध्ये फिरत आहे. अशी बातमी मिळाल्याने त्यास पथकासह सापळा रचून संख गावी मोटरसायकलसह ताब्यात घेतले. 

 सदर इसमाकडे मोटर सायकलचे कागदपत्राबाबत विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्याचेकडे सखोल चौकशी करता त्याचे ताब्यात असणारे मोटरसायकल ही त्याने जत येथून चोरल्याची कबुली दिली. सदर मोटर सायकल बाबत माहिती घेतली असता जत पोलीस ठाणे येथे मोटरसायकली चोरी झाले बाबतचा गुन्हा नोंद असलेचे मिळून आले. त्या बाबत सदर संशयीत इसमाकडे अजून कसून चौकशी केली असता त्याने जत, जयसिंगपूर, सोलापूर, विजापूर या ठिकाणी त्याच्या मित्रासह मोटरसायकली चोरी केल्याचे कबूल केले.

या मोटरसायकली पांडोझरी गावी, पारधी वस्ती येथे असलेचे सांगितले. या ठिकाणी पथकासह छापे टाकले असता एकूण १६ मोटरसायकली किंमत ७ लाख ९० हजार ३०० रुपयेचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आले. पुढील तपास कामी आरोपी व मुद्देमाल जत पोलीस ठाणेकडे देण्यात आला आहे. सदर कामगिरी ही पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अभिजीत सावंत,, सहा. पोलीस फौजदार अच्युत सुर्यवंशी, जितेंद्र जाधव, सतीश आलदर, मच्छिद्रं बर्डे, राजाराम मुळे, राजु शिरोळकर, संजय पाटील, आमसिध्दा खोत, सागर टिंगरे, मुदस्सर पाथरवट, प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर चालक अरुण सोकटे, शंकर पाटील यांनी पार पाडली.

Monday, August 24, 2020

वाद्य वाजवण्यास परवानगी देण्याची होलार समाज संघटनेची मागणी

विटा तहसीलदारांना निवेदन

विटा,(जत न्यूज वृत्तसेवा)-

अखिल भारतीय होलार समाज संघटना (A)गटाच्या वतीने  तहसिलदार ( विटा खानापूर) यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात होलार समाजातील वाद्य कलाकारांना वाद्य वाजविण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी करण्यात आली. सध्या गणेशोत्सव सुरू असून  गणेशविसर्जनसाठी दहा लोकांना वाद्य वाजविण्यास परवानगी मिळावी, असे निवेदनात म्हटले आहे.

सध्याच्या परिस्थितीमुळे समाजातील कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे तरी प्रशासनाने दहा कलाकारांना वाद्य वाजवण्याची परवानगी द्यावी, अन्यथा समाजास भुकबळी झाल्यास प्रशासन जबाबदार राहील. याची नोंद घ्यावी, असे निवेदनात म्हटले आहे. तहसिलदार यांना निवेदन देताना अखिल भारतीय होलार समाज संघटना (A) गटाचे खानापूर तालुकाध्यक्ष  राहुल केंगार (बलवडी), कडेगाव तालुका अध्यक्ष जीवन केंगार(चिखली), स्वाभिमानी कलाकार संघटना संस्थापक  दत्तात्रय हेगडे, आरपीआयचे खानापूर तालुका संघटक बाळासाहेब झेंडे,कामगार चळवळीचे नेते शंकर दादा माने उपस्थित होते.

Sunday, August 23, 2020

सध्या आपले सरकार काय करते?

कोरोना संसर्गाच्या टाळेबंदीने देशाची अर्थव्यवस्था चिंताजनक बनली आहे. महासत्तापदाचे स्वप्न पाहणाऱ्या या देशास आर्थिक दैन्यावस्थेतून बाहेर काढण्यासाठी सत्ताधारी लोकांकडून कोणते प्रयत्न सुरू आहेत, हे कळायला मार्ग नाही. जर ते सुरू आहेत किंवा काय हे तपासण्याची काही मापपट्टी आपल्या नागरिकांकडे आहे का, याचीही माहिती मला नाही. कारण सत्ताधारी गटाच्या बाजूचे लोक उदोउदो करताना दिसत आहेत तर विरोधक देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली असल्याचे सांगतात. त्यामुळे देशात नक्की नेमकं काय चाललं आहे आणि आपला देश अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावर कोणत्या टप्प्यावर आहे कळायला मार्ग नाही. खरे तर आज केवळ आपलाच देश नाही तर संपूर्ण विश्वच गंभीर आर्थिक संकटात सापडलेले असताना आणि अनेक देशांत या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न सुरू असताना आपले काय सुरू आहे, हा प्रश्न मात्र भेडसावतो आहे. सध्या या व्यापक आर्थिक दुरवस्थेचे खापर करोना विषाणूवर फोडण्याची सोय आहे, हे मान्य. पण हा कोरोनाकाळ सुरू होण्याआधीच आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेस मुडदुस झालेला होता. त्यामुळे आपली आर्थिक अवस्था हातपायांच्या काडय़ा झाल्यासारखी आहे म्हणून कोरोनास बोल लावण्याचे काहीच कारण नाही, असेही अनेकांना वाटत आहे. आपल्या अर्थव्यवस्थेची करोनाच्या आधीपासूनच बोंब होती. करोनाने तिचे तीनतेरा वाजवले इतकेच,असेही म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या वास्तवाकडे आपण उघडय़ा डोळ्यांनी पाहायला हवे. पण तसे कोणीच पाहताना दिसत नाही. अभिनेता सुशांतसिंग याच्या आत्महत्येनंतर जे काही राजकारण चालले आहे, ते खरेच क्लेशदायक आहे.  अर्थतज्ज्ञांच्या भाकितानुसार या वेळेस पहिल्यांदाच आपल्या अर्थव्यवस्थेचा वेग शून्याखाली जाईल. याचा अर्थ असा की याआधी अनेकदा आपल्या अर्थव्यवस्थेचे आकुंचन झाले आहे. तिचा वेग मंदावला आहे. पण १९७९ पासून तो कधीही उणे झालेला नाही. यंदा तो तसा असेल. ऐंशीच्या दशकातील आर्थिक संकटास जागतिक तेल समस्या कारणीभूत होती. त्यामुळे सर्वच देशांची परिस्थिती दयनीय होती. आता तसे म्हणता येणार नाही. आपल्यासारखे देश आताच्या संकटात इतरांच्या तुलनेत अधिक भरडले जाणार आहेत. अनेक तज्ज्ञांनी दाखवून दिल्यानुसार यंदा आपले सकल राष्ट्रीय उत्पन्न किमान पाच टक्के ते १० टक्क्यांपर्यंत घसरू शकते. गतकालीन आणि सध्याच्या संकटकालात फरक असा की याआधीच्या अरिष्टांमुळे गरिबांची अन्नान्नदशा होत असे. परंतु, अभ्यासू पत्रकार हरीश दामोदरन यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’मधील लेखात दाखवून दिल्याप्रमाणे यंदा धान्याची कोठारे ओसंडून वाहतील इतके कृषी उत्पन्न पिकेल. तथापि मोठय़ा प्रमाणावरील नागरिकांची हे धनधान्य खरेदी करण्यासारखी परिस्थितीच नसेल. याचा सरळ अर्थ असा की पुरवठा ही या आर्थिक आव्हान काळातील समस्या नाही. प्रश्न आहे तो मागणी नसण्याचा. ही मागणी नाही कारण नागरिकांच्या हाती पैसा नाही आणि ज्यांच्या हाती तो आहे तो वर्ग उद्याच्या चिंतेने खर्च करण्यास तयार नाही. म्हणून आता प्रयत्न हवे आहेत ते मागणी कशी वाढेल यासाठी. पण त्याबाबत सरकार एक चकार शब्द काढण्यास तयार नाही. आपण योजलेले उपाय अत्यंत परिपूर्ण असल्याची सरकारला खात्री आणि ते पुरेसे नाहीत या सत्याची जाणीवच अनेकांना नाही. अशा वातावरणात आभासी आनंदाचा एक बुडबुडा तयार होतो आणि सर्वच त्यात सुखाने नांदू लागतात. तसे आपले आहे. वास्तविक अशा परिस्थितीत किती नावीन्यपूर्ण उपाय योजायला हवेत हे इंग्लंडचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांच्यासारख्यांनी दाखवून दिले आहे. जास्तीतजास्त नागरिकांनी हॉटेलात जाऊन खावे यासाठी त्यांनी विशेष योजना जाहीर केली. त्यानुसार त्या देशात हॉटेलात खाण्यावर होणाऱ्या खर्चाच्या दरडोई १० पौंडांपर्यंतच्या बिलातील निम्मा वाटा सरकार उचलते. याचा परिणाम म्हणून नागरिकांची हॉटेलांकडे रीघ लागली. म्हणून त्या देशातील उपाहारगृहांत काम करणाऱ्या १८ लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या वाचल्या. जर्मनी, अमेरिका, युरोपातील अन्य काही देश यांनीही असे काही अप्रचलित उपाय योजून नागरिकांकडून मागणी कशी वाढेल यासाठी प्रयत्न केले. त्याचा परिणाम त्या त्या देशांच्या अर्थव्यवस्थांवर ठसठशीतपणे दिसतो. याउलट आपल्याकडची सरकारी मदत योजना मात्र कर्ज हमीच्या मर्यादा वाढवण्यापलीकडे फार काही करीत नाही. तीत उद्योगादींसाठी पतपुरवठय़ाच्या मर्यादेत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे, हे मान्य. पण बाजारात उत्पादनांस मागणीच नसताना अधिक आणि स्वस्त पतपुरवठय़ाच्या आधारे जास्त उत्पादन करून बाजारात धाडण्याचा उपयोग तरी काय? त्यातून फक्त दुकानांची धन. पण खरेदीदारच नसल्याने दुकानदारांनीही हात आखडता घेतल्यास आश्चर्य ते काय! सध्या समाजजीवन मात्र एका अत्यंत भुक्कड विषयात तल्लीन झाले आहे. ही आपल्याच इतिहासाची पुनरावृत्ती. देशावर सोने गहाण ठेवण्याची वेळ आली असता त्या संकटाच्या गांभीर्याचा लवलेशही नसलेले अनेक जण त्या वेळी दूरदर्शनवरील भक्तिरसपूर्ण मालिकेत चित्त हरवून घेत होते. तसेच हे. यात निष्पाप निरागसता नाही. असलेच तर अज्ञान आहे. त्याची व्याप्ती आणि खोली किती याची जाणीव कुणालाच नाही.

तुकारामबाबा यांच्याकडून गणेशमूर्तींचे वाटप

 46 गावात 'एक गाव एक गणपती' उपक्रम 

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)- 

जत तालुक्यात 'एक गाव, एक गणपती' ही संकल्पना राबविल्या जाणाऱ्या गावातील गणेश मंडळाना चिकलगी भुयार मठ (ता. मंगळवेढा जि. सोलापूर) येथील श्रीसंत बागडे बाबा मठाचे मठाधिपती, जत येथील पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष तुकारामबाबा महाराज यांच्या हस्ते ४६ गणेश मूर्ती, सँनिटाईजर व मास्क यांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम गोंधळेवाडी (ता जत) येथे झाला. या उपक्रमाला जत तालुक्यातील गणेश मंडळांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 

श्रीसंत सदगुरु श्रीसंत बागडे बाबा यांच्या पुण्यस्मरण सोहळा निमित्त गणेशमंडळांना मोफत गणेश मूर्तीची वाटप व 'एक गाव एक गणपती एक' अनोखा उपक्रम अंर्तगत मंडळाना गणेश मूर्तीचे वाटप करण्याचे काम तालुक्यातील गोंधळेवाडी येथे करण्यात आले.

गोंधळेवाडी येथे ३१ गणेश मूर्ती व चिकलगी भुयार मठ येथे १५ गणेश मूर्तीचे वाटप करण्यात आले. गणेश मूर्तीला मास्क घालून, सोबत मंडळाला सँनिटाईजर व मास्क देऊन हा एक अनोखा उपक्रम राबवलेला आहे.यावेळी ह.भ.प तुकाराम महाराज म्हणाले, पूर्वभागा तील कोरोना परिस्थितीचा विचार करुन एक गणेश मंडळांना व तरुण पिढीला एक दिलासा म्हणून एक गाव एक गणपती उपक्रम राबविण्यासाठी श्रीसंत बागडेबाबा मानवमित्र संघटनेने गावपातळीवर जनजागृतीचे काम करण्यात आलेले आहे. गणेश मंडळाला ५ ते ६ फूटाची गणेश मूर्ती सँनिटाईजर व मास्क देऊन अनोखा उपक्रम राबविला आहे.यावेळी रामदास खोत, प्रेमदास भोसले, सिदराया मोरे, रामदास भोसले, मोहनधुमाळ, नाना भोसले, दत्ता सावळे, पोलीस पाटील धुमाळ उपस्थित होते. सामाजिक बांधलिकी कोरोनाचे महाभंयकार संकट व दुष्काळावर दोन हात करण्याची ताकद द्यावी. यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने करावा. गणपतीला मास्क घालून कोराना जागृतीचा संदेश पोहोचवण्याचा अनोखा उपक्रम राबवून सामाजिक बांधलिकी जपली आहे.कोरोनाचे महाभंयकार संकट टळावे. गणपतीचे चरणी साकडे घातले आहे.असे ते म्हणाले. गेल्या वर्षीही तुकाराम बाबा यांनी गणेश मंडळांना मूर्ती दिल्या होत्या.

Saturday, August 22, 2020

संख येथील बलात्कार प्रकरण: आरोपीस अटक न केल्यास आक्रोश आंदोलन-भुपेंद्र कांबळे

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

जत तालुक्यातील संख येथील एका 65 वर्षीय दलित महिलेवर बलात्कार करून फरारी झालेल्या आरोपीला अद्याप उमदी पोलीसानी अटक केली नाही.दोन दिवसात आरोपीस अटक न केल्यास संख गाव बंद ठेऊन आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा जत तालुक्याचे युवा नेतृत्व,दलित पॅंथरचे नेते व जत नगरपरिषदेचे शिक्षण क्रीडा व सांस्कृतिक सभापती  संतोष उर्फ भूपेंद्र कांबळे यांनी दिला आहे.

जत तालुक्यातील उमदी पोलिस ठाण्याचे ठाणे अंमलदार यांना प्रत्यक्ष भेटून याबाबतचे निवेदन देण्यात आले. भूपेन्द्र कांबळे यांच्यासह जत तालुक्याचे पॅंथरचे अध्यक्ष अमर कांबळे तसेच पँथरचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यासंदर्भात उमदी पोलीस ठाणे येथे निवेदन देण्यात आले. संख येथे एका दलित 65 वर्षे महिलेवर अत्याचार झालेला आहे. घटना घडून 10ते 12 दिवस झाले उलटूनही अद्याप आरोपीला अटक झालेला नाही. दोन दिवसात जर त्या आरोपीस अटक नाही केली तर दलित पँथरच्या वतीने संख गाव बंद करून आक्रोश आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

Friday, August 21, 2020

वाद्य कलाकारांना वाद्ये वाजवण्यास परवानगी द्या:गणेश ऐवळे

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

होलार समाजातील वाद्य कलाकारांना वाद्य वाजवण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे  (A गट) शहराध्यक्ष गणेश आबासाहेब ऐवळे यांनी जतच्या तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या टाळेबंदीमुळे होलार समाजातील वाद्य कलाकारांच्या हाताला काम नाही. यामुळे सध्या हे कलाकार हालाखीचे जीवन जगत आहेत. त्यांना उपासमारीला सामोरे जावे लागत आहे. दुसऱ्याच्या मदतीच्या आशेवर त्यांना जगावे लागते आहे. कला असूनही काही उपयोग नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या गणेशोत्सव सुरू झाला आहे. यानिमित्ताने या कलाकारांना वाद्ये वाजवण्यास परवानगी दिल्यास किमान त्यांचे पोट भरेल,इतपत तरी यानिमित्ताने  त्यांची सोय होईल. त्यामुळे होलार समाजातील वाद्य कलाकारांना वाद्य वाजवण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी जत तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवी स्मारकासाठी शासकीय समिती स्थापन करा : विक्रम ढोणेमुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी भुमीपूजनापूर्वी अध्यासन केंद्रासाठी 18 कोटींचा निधी मंजूर करावा  

सोलापूर,(जत न्यूज वृत्तसेवा)-

येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातील अहिल्यादेवी स्मारकासाठी शासकीय निधीची तरतूद करण्याची भुमिका राज्य शासनाने घेतली आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करत आहोत. आता हे स्मारक साकारण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाच्या धर्तीवर शासकीय समिती स्थापन करावी, अशी मागणी धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे. यासंबंधीचे पत्र त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांना पाठवले आहे. 

गेल्या काही दिवसांपासून कुलगुरू मृणालिनी फडणवीस यांनी अहिल्यादेवींचे स्मारक हे जाणीवपुर्वक लोकवर्गणीतून करण्याचा घाट घातला होता. यापार्श्वभुमीवर अहिल्यादेवींच्या पुण्यतिथीदिवशी (13 ऑगस्ट) धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी मुख्यमंत्री, तसेच सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून अहिल्यादेवी स्मारक हे शासकीय निधीतून झाले पाहिजे, अशी मागणी केली होती. कुलगुरू मृणालिनी फडणवीस या अहिल्यादेवींना एका जातीत बंदीस्त करत असून त्या मन मानेल तसे निर्णय घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या वादग्रस्त निर्णयांची चौकशी करण्याची मागणीही ढोणे यांनी केली होती. 

यासंदर्भाने बुधवारी मुंबईत उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या दालनात बैठक झाली. या बैठकीत स्मारकासाठी भरीव निधी देण्याचे जाहीर करण्यात आले, तसेच ऑक्टोंबर महिन्यात मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत स्मारकाचे भुमीपूजन करण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. या निर्णय़ाचे स्वागत करून ढोणे यांनी मुख्यमंत्री आणि उच्च शिक्षण मंत्र्यांना पत्र पाठवून काही मुद्दे उपस्थित केले आहेत. 

राज्य शासन भरीव निधी देणार असे मंत्री सामंत यांनी जाहीर केले आहे मात्र नेमका निधी स्पष्ट केलेला नाही. अहिल्यादेवी स्मारक आणि अहिल्यादेवी अध्यासन या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. स्मारकासाठी विद्यापीठाने सुमारे अडीच कोटी मागितले आहेत, असे आम्हाला समजले आहे. पण हा निधी पुरेसा आहे का, याचा विचार करणे आवश्यक आहे. कुलगुरू फडणवीस यांनी स्मारकासंबंधीची प्रक्रिया घाईगडबडीत केलेली आहे. त्यामुळे स्मारकाचा आराख़डा आणि तरतुदीचा विचार नव्याने करणे आवश्यक आहे. गरजेनुसार वाढीव तरतूद करावी. तसेच अहिल्यादेवी अध्यासनासाठी सुमारे 18 कोटींचा प्रस्ताव आहे. त्याला मंजूरी मिळावी. सोलापूर विद्यापीठात शैक्षणिक आणि भौगोलिक विकासाच्या अनेक बाबी तातडीने होणे आवश्यक आहेत. अहिल्यादेवींच्या नावाला साजेसे स्मारक करण्याबरोबरच विद्यापीठातील शिक्षणही त्या दर्जाचे झाले पाहिजे. विद्यापीठात सर्व विद्याशाखांचे विभाग सुरू व्हावेत.मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्र्यांनी भुमीपूजनाला येण्यापुर्वी अध्यासानाचा 18 कोटींचा प्रस्ताव मंजूर करावा, असेही ढोणे यांनी म्हटले आहे. 

यापुर्वी कुलगुरू फडणवीस यांनी वादग्रस्त व्यक्तींना घेवून स्मारक समिती बनवली आहे, याची चौकशी झाली पाहिजे, असे नमूद करून ढोणे यांनी म्हटले आहे की, अहिल्यादेवींचे स्मारक साकारण्यासाठी राज्य शासनाने उच्चस्तरीय समिती स्थापन करावी. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात पुतळा उभा करताना अशी समिती करण्यात आली होती. त्याप्रमाणे निर्णय व्हावा. त्यामुळे अल्पावधीत स्मारकाचे काम मार्गी लागेल. हे स्मारक करीत असताना त्यात राजकीय कार्यकर्त्यांचा भरणा करू नये. या समितीत मंत्री, शासनाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी, इतिहासाचे अभ्यासक, वास्तूरचनाकार असावेत, असेही ढोणे यांनी म्हटले आहे. 

कुलगुरूंच्या हेतूविषयी शंका

राज्य शासनाने कालच्या एका बैठकीत स्मारकाचा विषय मार्गी लावला. तसेच भुमीपूजनाची संभाव्य तारीखही जाहीर केली. यापार्श्वभुमीवर कुलगुरू फडणवीस यांच्या कार्यपद्धतीबद्दल काही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यांनी यापुर्वी स्मारकाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे दिला होता का, त्याचा पाठपुरावा केला का, हे जनतेला समजणे आवश्यक आहे. लॉकडाऊनची पॅनिक परिस्थिती असताना फडणवीस लोकवर्गणीसाठी खाते उघडण्याची घाई करताना दिसल्या. समिती स्थापन करताना त्यांनी सुरवातीला सोलापूरचे पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांनासुद्धा अदखलपात्र समजले. नंतरच्या टप्प्यात त्यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांना समितीत घेतले. फडणवीस या राज्य शासनाला बाजूला ठेवून स्मारकाचे काम कां करू इच्छित होत्या, हेही समोर आले पाहिजे, असे ढोणे यांनी म्हटले आहे.

Tuesday, August 18, 2020

ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्यक कर्मचारी आणि सुविधा पुरवा-प्रकाश जमदाडेजत (जत न्यूज वृत्तसेवा)- 

जत तालुक्यातील माडग्याळ व जत ग्रामीण रूग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्यक सुविधा तात्काळ उपलब्ध कराव्यात व रुग्णांची होणारी हेळसांड थांबवावी, अशी मागणी रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जत तालुका हा विस्ताराने सर्वात मोठा तालुका असून अवर्षण प्रवर्ग २ लाख २४ हजार ७२२ हे. क्षेत्रफळ इतके आहे. तालुक्यात २ ग्रामीण रूग्णालय, ८ प्राथमिक आरोग्य केंद्र व ४३ उपकेंद्र कार्यरत आहेत. परंतु यासाठी आवश्यक ते वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी तसेच मूलभूत उपकरणे उपलब्ध नाहीत. रूग्णांना योग्य व वेळेत उपचार मिळणेसाठी डॉक्टर, नर्स व इतर कर्मचारी यांची त्वरीत नेमणूक करून जत तालुक्यातील जनतेला न्याय द्यावा व त्यांची होणारी हेळसांड थांबवावी. आवश्यक असा औषध-गोळ्यांचा पुरवठाही होत नाही.

माडग्याळ येथे जवळपास ७ ते ८ कोटी रुपये खर्च करून ग्रामीण रुग्णालयाची अद्यावत इमारत व निवासस्थाने  उभारण्यात आली आहेत, परंतू ग्रामीण रूग्णालय स्थापन झालेपासून वैद्यकीय अधिक्षक (वर्ग १) प्रभारी आहे. डॉक्टर, नर्स व इतर कर्मचारी यांची १६ पदे रिक्त आहेत. ग्रामीण रूग्णालयासाठी आवश्यक असणारी उपकरणे, लँबोरटरीे,एक्स-रे मशीन,सोनोग्राफी मशीन, १०८ नंबर रूग्णवाहीका तसेच पोस्ट मार्टम रूम यांची कोणतीही सुविधा नाही.त्यामुळे हे ग्रामीण रुग्णालय म्हणजे 'असून अडचण आणि नसून खोळंबा' अशी झाली आहे. या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

जत येथेही एक ग्रामीण रूग्णालय आहे. जत शहराची लोकसंख्या ५० हजारहून अधिक  आहे. या  ग्रामीण रूग्णालयात कर्मचारी संख्या अपूरी आहे. तसेच उपचारासाठी लागणारी आवश्यक ती कोणतीही उपकरणे नाहीत. कोणताही रूग्ण असला तरी त्यास मिरज किंवा सांगलीला 'रेफर' करून पाठवले जाते. तालुक्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येदेखील  अनेक जागा रिक्त असून तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय बंडगर यांचेकडे वळसंग व संख केंद्राचा अतिरिक्त कार्यभार आहे. तर डॉ. शिंदे यांचेकडे को-बोबलाद व उमदी तर डॉ.सौ.पाटील यांचेकडे शेगाव व येळवी केंद्राचा कार्यभार आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक स्टाफ व उपकरणे नसलेने रूग्णाचे हाल होत आहेत. संख प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गळके पत्रे आहेत.

तसेच उमदी येथे पोस्ट मार्टम रूम असूनदेखील त्याठिकाणी जाण्यास साधा रस्ताही नाही हे दुर्दैव आहे. जत तालुक्यात ४२ उपकेंद्रे असून याठिकाणाची १२ पदे रिक्त आहेत. सामुदायिक आरोग्य अधिकारी (सी.एच.ओ) कंत्राटी पगारावर नेमणूक केली आहे, परंतू त्यांनाही बऱ्याच दिवसापासून पगार देण्यात आला नाही. कायमस्वरूपी नर्सना ३५ हजार रुपये पगार, तर १० वर्षापासून काम करणाऱ्या नर्सना १२हजार रुपये पगार व कोव्हीडमध्ये कंत्राटी नर्सना १८हजार रुपये पगार आहे. काम तेच पण पगारामध्ये तफावत आहे.त्यामूळे कामात अनियमितता येत आहे.

शासनाने प्रत्येक ठिकाणी लाखो रुपये खर्चुन दवाखाने इमारती व निवासस्थाने बांधली आहेत, परंतु अनुभवी व पुरेशे डॉक्टर व इतर स्टाफ तसेच आवश्यक उपकरणे नसलेने या इमारतींचा शासनाला आणि रुग्णांना काहीच उपयोग होत नाही. सर्वसामान्यांना तर  उपचारही मिळत नाही.तरी प्रत्येक PHC ला laboratory,x-ray machine,Sonography machine व आवश्यक पाहीजे ते औषध -गोळया पुरविणे विषयी सुचना करावीत, अशी मागणी जमदाडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

Monday, August 17, 2020

एक गाव एक गणपती उपक्रम राबविणाऱ्या गावास गणेश मूर्ती भेट देणार- तुकाराम बाबा महाराज

 ★ अनावश्यक खर्चाला, लोकवर्गणीला फाटा देण्याचे आवाहन

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावोगावी असलेल्या गणेश मंडळांनी सार्वजनिक गणेश उत्सव साजरा न करता एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवावा. एक गाव एक गणपती उपक्रम राबविणाऱ्या गावास गणेश मूर्ती भेट देण्यात येणार आहे. गणेश मूर्ती बरोबरच मंडळाचे पदाधिकारी यांना सॅनिटायझर तसेच मास्कचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती चिकलगी मठाचे मठाधिपती हभप तुकाराम बाबा महाराज यांनी दिली.

तुकाराम बाबा महाराज म्हणाले, दरवर्षी गणेशोत्सव मोठया प्रमाणात साजरा करण्यात येतो. मागील नऊ वर्षापासून म्हणजे २०११ पासून दरवर्षी एक गाव एक गणपती राबविणाऱ्या मंडळास, गावास श्री ची मूर्ती आपण भेट दिली आहे. २०११ ला मंगळवेढा येथून या उपक्रमास सुरुवात केली त्यानंतर जत तालुक्यात हा अभिनव उपक्रम राबविला. यावर्षीही ज्या गावात सर्वजण एकत्र येत एक गाव एक गणपती हा अभिनव उपक्रम राबवतील त्यांना श्री ची मूर्ती भेट देण्यात येणार आहे. त्याचबरोबर एक गाव एक गणपती मंडळाचे जे पदाधिकारी आहेत त्यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात येणार आहेत. ज्या गावात गणेशोत्सव काळात मंडळे औषध फवारणीसाठी पुढाकार घेतील त्यांना औषधे मोफत देण्यात येणार आहेत.

दरवर्षी एकाच दिवशी श्री च्या मूर्तीचे वाटप करण्यात येते पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावोगावी स्थापन करण्यात आलेल्या श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेमार्फत श्री ची मूर्ती, सॅनिटायझर तसेच औषध फवारणीसाठीचे औषध पोच करण्यात येणार असल्याचे तुकाराम बाबा महाराज यांनी सांगितले.

कोरोनाच्या या कठीण काळात जत तालुक्यात कोरोनाने शिरकाव करण्यापूर्वीच आपण जत तालुक्यातील शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले होते. जत तालुक्यात आठ हजार मास्कचे वाटप करण्यात आले तसेच लॉक डाऊन काळात साडेपाच हजार गरजुना जिवनावश्यक किट, २२ हजार कुटूंबियांना भाजीपाला किटचे वाटप करण्यात आले. पोलीस व अन्य कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था लॉक डाऊन काळात करण्यात आल्याचे सांगून तुकाराम बाबा महाराज म्हणाले की, सध्याच्या या कठीण काळात गणेशोत्सव असो की अन्य कोणताही उत्सव असो सामाजिक बांधिलकी जपत मंडळ व ग्रामस्थांनी काम करणे गरजेचे आहे. यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने सोशल डिस्टन्सच्या नियमाचे पालन करत साजरा करावा. लोकवर्गणी जमा करू नये, श्री च्या मिरवणुकीला तसेच डॉल्बी व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमाला फाटा द्यावा. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गावोगावी स्वच्छता मोहीम राबवावी, कोरोनाबाबत जनजागृती करावी, वृक्षारोपन व वृक्ष संवर्धन करावे, गावात औषध फवारणी करावी असे आवाहन चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी केले आहे.

■ सामाजिक बांधिलकी जपा...

श्री गणेशाचे आगमन ते विसर्जन हा आपल्यासाठी मोठा उत्सव काळ पण आज कोरोनामुळे या उत्सवाला सामाजिक बांधिलकीचे रूप देणे काळाची गरज आहे. यंदाच्या गणेशोत्सव काळात विविध सामाजिक उपक्रम राबविताना सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यक्रम तर हाती घ्यावेच त्याचबरोबर या कठीण काळात माणुसकीचे दर्शन घडवावे, एकमेकाला सहकार्य करावे असे आवाहन तुकाराम बाबा महाराज यांनी यावेळी केले.

■ संपर्क करण्याचे आवाहन

मंडळानी मूर्तीसाठी प्रशांत कांबळे ( अचकनहळळी), .सुरज मणेर, सिद्धनाथ ऐवले, विनोद भोसले , विवेक टेंगले (कोसारी), रवी शिंदे .(तिप्पेहळळी), किरण कोळी .(डफळापूर), खिल्लारे सर (बागलवाडी), रामदास शिंदे (अंतराळ), रामचंद्र रणशिंग (बनाळी), संजय कांबळे (कुनिकोनुर), विक्रम कांबळे (देवनाळ), गंगाधर हिरगौड (रावळगुंडवाडी), विलास राठोड ( दरिकोनुर), दादासाहेब सबकाळे (गिरगाव), बाळासाहेब मोटे (मोटेवाडी), संतोष व्हनमोरे (भिवर्गी), गंगाधर कांबळे (सालेकिरी), जयदीप मोरे (संखं), आमसिद्ध सरगर (लवंगा) यांना संपर्क साधावा असे आवाहन तुकाराम बाबा महाराज यांनी केले आहे.

संविधानिक हक्काप्रमाणे मागासवर्गीयांना पदोन्नती द्या - गणेश मडावी

सांगली,(जत न्यूज वृत्तसेवा)-

कास्ट्राईब कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने भारतीय संविधानातील तरतुदीनुसार मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना न्यायालय निकालाच्या अधीन राहून इतर राज्याप्रमाणे नोकरीत पदोन्नती मिळण्यासाठी तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी सांगली  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे आंदोलन करण्यात आले व वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष गणेश मडावी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना  यासंदर्भात निवेदन  देण्यात आले.                

काष्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मागासवर्गीय कर्मचार्यांना नोकरीत पदोन्नती प्रक्रिया राबवण्यासाठी देशातील इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने

विशेष सरकारी वकील नेमण्यात येऊन कर्मचाऱ्यांसाठी  महत्वपूर्ण असणारे पदोन्नती आरक्षण कायम राहण्यासाठी व यावर तात्काळ निर्णय होण्यासाठी विशेष प्रयत्न राज्य सरकारने करावेत आणि आरक्षण पदोन्नतीचा विषय कायमस्वरूपी निकालात काढण्यासंदर्भात सरकारतर्फे विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करणेबाबत महासंघाच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी केली आहे.पदोन्नतीच्या आरक्षणबाबत राज्यातील राज्यशासनाची याचिका क्र. 28306 /2017 मा. सुप्रिम  कोर्टात न्याय प्रविष्ठ आहे. परंतू असे असतानाही न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिन राहुन देशातील इतर राज्यांनी पदोन्नतीचे आरक्षण यापूर्वीच दिले आहे. परंतु महाराष्ट्र शासन याबाबत कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका घेत नाही. राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने दि. 29 डिसेंबर 2017 पासून पदोन्नतीस स्थगिती दिली आहे. तेंव्हापासून आजपावेतो पदोन्नती आणि नोकरीतील आरक्षण हे विषय रखडले आहेत.याबद्दल कर्मचारी वर्गातून संताप आणि नाराजी व्यक्त होत आहे. त्याविरुद्ध  शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या नेतृत्वाखाली कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने 03 नोव्हेंबर 2018 मध्ये "लोकशाही की पेशवाई"  या नावाने संपुर्ण राज्यभर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले होते. याही आंदोलनाची शासनाने दखल घेतली नाही. तरीही आजपावेतो मागासवर्गीयांना पदोन्नतीचे आरक्षण मिळाले नाही. राज्यातील काष्ट्राईब  संघटनेने पदोन्नतीच्या निर्णयाबाबत वेळोवेळी शासनाकडे मागणी करूनही आरक्षण आणि पदोन्नतीचे भिजत घोंगडे कायम आहे. म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन दिले आहे.

यावेळी वरिष्ठ राज्य उपाध्यक्ष गणेश मडावी, पुणे विभागीय कार्याध्यक्ष बाळासाहेब व्हनखडे, शिक्षक संघटनेचे पुणे विभागीय अध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत, जिल्हा कार्याध्यक्ष विजयकुमार सोनवणे, सचिव बाबासाहेब माने,शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे, कार्याध्यक्ष लखन होनमोरे, महसूल संघटनेचे अध्यक्ष अभिजीत कांबळे, पाटबंधारे विभागाचे अध्यक्ष कुमार कांबळे, अपंग युनिटचे अध्यक्ष अनिल राजमाने, समाज कल्याण विभागाचे अध्यक्ष सुरेंद्र कुमार मोरे, जिल्हा परिषद अध्यक्ष दयानंद लांडगे, सुशांत कांबळे, महेश माने, कृष्णा मासाळ, सुशांत होवाळे, शिक्षक संघटना मिरज तालुक्याचे अध्यक्ष परशुराम जाधव उपस्थित होते.

(काष्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना तात्काळ पदोन्नती देण्याची मागणीसाठी धरणे धरत जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी गणेश मडावी व इतर) 
मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनातील शहीद  कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी आणि दहा लाख रुपये द्या

मराठा आरक्षण आंदोलनामध्ये जे शहीद झाले आहेत त्यांच्या कुटुंबास शासनाने दहा लाख रुपये आणि एका व्यक्तीस नोकरी देण्याचे जाहीर केले आहे  त्याधर्तीवर मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी आंबेडकर समाजाकडून मोठ्या प्रमाणावर आंदोलन  झाले होते. या आंदोलनाला आज बरीच वर्षे झाली आहेत तथापि सदर नामांतर आंदोलनामध्ये आंबेडकरी समाजातील 29 जण शहीद झालेले होते. शाहिद कुटुंबातील एका व्यक्तीला शासनाने नोकरी देण्याचे मान्य केले होते परंतु त्यापैकी केवळ एका कुटुंबातील व्यक्तीलाच नोकरी दिली आहे मात्र अजूनही 28 कुटुंबातील व्यक्तींना शासनाकडून आजतागायत नोकरी देण्यात आलेली नाही. तरी सदर कुटुंबीयातील एकाला शासकीय नोकरीत समावेश करून घेऊन  प्रत्येकी दहा लाख रुपये आर्थिक मदत देऊन उपकृत करावे असेही काष्ट्राईब महासंघाकडून निवेदनात म्हंटले आहे.

'ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंडस सर्कल'च्या केंद्रीय अध्यक्षपदी गणेश कोळी तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी झुल्पिकार काझी यांची निवड

रत्नागिरी,(जत न्यूज वृत्तसेवा)-

ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंडस सर्कल या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी गणेश कोळी (पनवेल) यांची तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी झुल्पिकार काझी (परांडा) यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल (रत्नागिरी) यांनी या निवडी जाहीर केल्या आहेत.

ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंडस सर्कल ही पत्रकार आणि पत्रकार मित्रांची राष्ट्रीय संघटना असून महाराष्ट्र राज्यासह देशभरात ही संघटना गेल्या एक तपाहून अधिक काळापासून कार्यरत आहे. राज्याचे पहिले प्रदेश संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल यांनी मोठ्या कष्टाने ही संघटना राज्यभर बांधली.आतापर्यंत  राज्यात गणपतीपुळे, मिरज, सांगोला, मुंबई, पुणे, अमरावती, कराड यांसह विदर्भ, मराठवाड्यात पत्रकार संमेलने पार पडली आहेत. यानिमित्ताने पत्रकारांचे अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्याचबरोबर राज्यातल्या विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या संघटनेच्या विश्वस्त बैठकीत या निवडी करण्यात आल्या आहेत. यासीन पटेल, युयुत्स आर्ते, विकास कुलकर्णी ,गणेश गोडसे, अतुल होनकाळसे आदींच्या विश्वस्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. श्री. कोळी आणि श्री. काझी यांना निवडीची पत्रे देण्यात आली आहेत. श्री. कोळी म्हणाले की, पत्रकारांच्या प्रश्नांसाठी आपण सतत कार्यरत असून यापुढेही अधिक जोमाने प्रयत्नशील राहणार आहे. देशात संघटना आणखी बळकट करण्यासाठीही प्रयत्न केले जातील.

'ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंडस सर्कल'ची केंद्रीय कार्यकारी मंडळ जाहीर ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंडस सर्कलच्या केंद्रीय अध्यक्षपदी गणेश कोळी यांची तर सचिवपदी अब्दूलभाई शेख यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय सदस्य खालीलप्रमाणे-माधव अंकलगे, अजिंक्य गोवेकर, दीपक नागरे, विठ्ठल मोघे, सत्यवान विचारे.

Sunday, August 16, 2020

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते आणि पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयाचे १७ रोजी लोकार्पण

सांगली,(जत न्यूज वृत्तसेवा)-

 इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उभारण्यात आलेल्या अद्यावत कोविड हॉस्पिटलचे लोकार्पण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते सोमवार दि.१७ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ४.३० वाजता होणार आहे. ज्यांच्या प्रयत्न,व संल्पनेतून हे अद्यावत कोविड हॉस्पिटल उभा राहिले आहे,ते राज्याचे जलसंपदामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंतराव पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविणार आहेत. टाटा ट्रस्टच्यावतीने ९-१० कोटी रुपये खर्चून हे अद्यावत हॉस्पिटल उभारण्यात आले आहे.

      इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात ४० बेडचे हे अद्यावत कोविड हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. यामध्ये १० बेड हे अतिदक्षता आहेत. २० बेडचा जनरल वॉर्ड असणार आहे. या हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन,व व्हेंटिलेटरसह विविध अद्यावत,व खास सोई-सुविधा दिल्या जाणार आहेत. या हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टरकडून कोविड रुग्णांवर अद्यावत उपचार केले जाणार आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.विश्वास साळुंखे,उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.नरसिंह देशमुख,कोविड सेंटरचे प्रमुख डॉ.राणोजी शिंदे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी,कर्मचारी कार्यक्रमाचे संयोजन करीत आहेत.

यापूर्वी इस्लामपूर येथे जिल्ह्याची कोविड आढावा बैठक आरोग्य मंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री व पालकमंत्री जयंतराव पाटील हे दुपारी ३ वाजता येथील तहसीलदार कार्यालयात सांगली जिल्ह्याची कोविड आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीस जिल्ह्यातील अधिकारी,व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Wednesday, August 12, 2020

वन्यजीवांच्या हत्या रोखण्यासाठी गस्ती वाढवा:श्रीकांत सोनवणे

जत, (जत न्यूज वृत्तसेवा)- 

वन्यजिवांची हत्या करण्याचे प्रमाण जत तालुक्यात वाढले असून वन विभागाने वन क्षेत्रात गस्ती पथक वाढवून जत तालुक्यातील वन्य प्राणी व पक्षांचे संरक्षण करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत सोनवणे यांनी केली आहे. 

महिनाभरापूर्वी राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार करणारे दोघेजण जत-सांगली रोडवरील वाशाण जवळील आडव्या डोंगरावर काही नागरिकांना आढळून आल्याने त्यांनी त्यांना पकडून वन विभाग व पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्याचबरोबर उटगीत सशाची शिकार केल्याप्रकरणी दोघांना वन विभागाने पकडले. त्याच बरोबर दुर्मिळ पक्षांची शिकार केल्या प्रकरणी आणखी एका ठिकाणी कारवाई करण्यात आली. उमदी पोलिसांनी सीमेवर मांडूळ जातीचे सर्प जप्त केले होते. अशा प्रकारे वन्य जिवांची शिकार तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. 

आधीच जत तालुक्यात कमी आहे. वनक्षेत्र कमी असल्याने पाऊसमान कमी झाले आहे. त्यामुळे तालुक्याला सातत्याने दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे.  त्यातच वनक्षेत्रदेखील कमी होऊ लागले आहे. वनक्षेत्र कब्जात घेणे, तेथील झाडे तोडणे असेही प्रकार तालुक्यात होत आहेत. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे मोर, कासव आणि मांडूळ यांची तस्करी पैशासाठी मोठ्या प्रमाणात होत आहे. सशाची शिकार तर नित्यच होत आहे. कासव आणि मांडूळ पैशांचा पाऊस पाडतात, अशी अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात पसरल्याने हे प्राणी मोठ्या किंमतीला विकले जात आहेत. मोराचे मांस औषधी म्हणून खाण्यासाठी वापरले जाते. या सगळ्यामुळे तालुक्यातील पक्षी आणि प्राणी संपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. 

वेगाने होत असलेल्या शहरीकरणामुळे व लोकसंख्या वाढीमुळे प्राण्यासाठी असणारी वन्य जमिनीचे क्षेत्र कमी कमी होत चालले आहे व प्राण्यांना स्वताचे अस्तित्व टिकवणे अवघड झाले आहे व काही प्राण्याचा प्रजाती नामशेष होण्याचा मार्गावर आहेत. ह्या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देवून नामशेष होवू घातलेल्या प्राणी व पक्षी यांच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी वन विभागाने जत तालुक्यात गस्ती वाढविणे गरजेचे आहे, असे सोनवणे यांनी म्हटले आहे.

नोकरीतील पदोन्नतीसाठी राज्यभरात कास्ट्राईबतर्फे धरणे आंदोलन - कृष्णा इंगळे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन सादर ; तीन वर्षांपासून 40 हजार कर्मचारी पदोन्नती पासून  वंचित!

सांगली,(जत न्यूज वृत्तसेवा)-

 महाराष्ट्र राज्यातील जवळपास 40 हजार मागासवर्गीय कर्मचारी पदोन्नती पासून 3 वर्षेपासून वंचित आहेत. तत्कालीन सरकारने पदोन्नतीस  स्थगिती दिल्यानंतर राज्यातील सर्व आस्थापनेमधील पदोन्नत्या मोठ्या प्रमाणावर रखडल्या आहेत. याबद्दल राज्य काष्ट्राईब आणि विविध मागासवर्गीय कर्मचारी वर्गामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.महाविकास आघाडी सरकारकडून तरी पदोन्नतीच्या निर्णयाबाबत तात्काळ निर्णय अपेक्षित असताना याही सरकारने आपली भूमिका स्पष्ट करत नाही. याच्या निषेधार्थ येत्या 17 ऑगस्ट 2020 सोमवार रोजी  संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असून तसे निवेदन मुख्यमंत्री मा उद्धव ठाकरे आणि सर्वसंबंधीत मंत्र्याना काष्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने देण्यात आले आहे.      

पदोन्नतीच्या आरक्षणबाबत राज्यातील राज्यशासनाची याचिका क्र.28306 /2017 मा. सुप्रिम कोर्टात न्याय प्रविष्ठ आहे. परंतू असे असतानाही न्यायालयाच्या निर्णयाला अधिन राहुन देशातील इतर राज्यांनी पदोन्नतीचे आरक्षण दिले आहे. परंतु महाराष्ट्र शासन याबाबत कोणत्याही प्रकारची ठोस भूमिका घेत नाही. राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने दि.29 डिसेंबर 2017 पासून पदोन्नतीस स्थगिती दिली आहे. तेंव्हापासूनआजपावेतो पदोन्नती आणि नोकरीतील आरक्षण हे विषय रखडले आहेत.याबद्दल कर्मचारी वर्गातून संताप आणि नाराजी व्यक्त होत आहे. त्याविरुद्ध  शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्याध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या नेतृत्वाखाली कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने 03 नोव्हेंबर 2018 मध्ये "लोकशाही की पेशवाई"  या नावाने संपुर्ण राज्यभर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले होते. या आंदोलनाचे शासनाने दखल घेतली नाही. तरीही आजपावेतो मागासवर्गीयांना पदोन्नतीचे आरक्षण मिळाले नाही.राज्यातील काष्ट्राईब संघटसह विविध मागासवर्गीय संघटनेने पदोन्नतीच्या निर्णयाबाबत वेळोवेळी शासनाकडे मागणी करूनही आरक्षण आणि पदोन्नतीचे भिजत घोंगडे कायम आहे.

येत्या  21 ऑगस्टला मा.सुप्रिम कोर्टाने या विषयीची अंतिम सुनावणी लावली आहे. अनूसुचीत जाती आणि जमातींचे पदोन्नतीचे आरक्षण हा त्यांंचा संविधानिक हक्क आहे आणि तो मिळवून देणे ही राज्य शासनाची जबाबदारी आहे. परंतू दुर्देवाने राज्य शासन याविषयी गंभीर आहे असे दिसत नाही. यापूर्वी राज्य शाखा आणि सांगली शाखा  कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने पदोन्नती व मागासवर्गीय अनुशेष भरती करणे संदर्भात अनेक वेळा निवेदन दिले आहे.

अनुसूचित जाती आणि जमातींची बाजू मा.सर्वोच्च न्यायालयात मांडण्यासाठी राज्य शासनाने अजूनही जेष्ठ विधीज्ञ नियुक्त केलेले नाहीत. यासाठी राज्य सरकारतर्फे विशेष सरकारी वकील नेमणेसाठी व कर्मचाऱ्यांसाठी महत्वपूर्ण असणारे पदोन्नती आरक्षण कायम राहण्यासाठी यावर तात्काळ निर्णय होण्यासाठी  विशेष प्रयत्न राज्य सरकारने करावेत. आणि आरक्षण आणि पदोन्नतीचा विषय कायमस्वरूपी निकालात काढण्यासंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्याध्यक्ष कृष्णा इंगळे यांचे आदेशानुसार राज्यभर महासंघ संलग्न 30 शाखांच्या वतीने एक दिवसाचे धरणे आंदोलन प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, कार्यालया समोर दिनांक 17 ऑगस्ट 2020 सोमवारी या एक दिवसाचे धरणे आंदोलन करीत  असल्याची माहिती राज्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा सांगली जिल्हा अध्यक्ष गणेश मडावी यांनी दिली. यावेळी महासंघ पुणे विभागीय कार्याध्यक्ष बाळासाहेब व्हनखंडे, शिक्षक संघटनेचे  विभागीय अध्यक्ष बाजीराव प्रज्ञावंत जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे,  जिल्हा कार्याध्यक्ष लखन होनमोरे, महासंघाचे जिल्हा सचिव बाबासाहेब माने, कार्याध्यक्ष विजयकुमार सोनवणे, रमेश सोनवणे, शिवाजी जोशी, दिपक बनसोडे, सुलोचना खंदारे, रेखा माने, आदी उपस्थित होते.

Monday, August 10, 2020

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जत शहरवासीयांनी स्वतःची काळजी घ्यावी-श्रीकांत सोनवणे

जत, (जत न्यूज वृत्तसेवा)- 

जत शहर हे कोरोना रुग्णांचे हॉटस्पॉट बनत चालले असून शहरात 12 ते 13 ठिकाणी कंटेनमेंट झोन झाले आहेत. सध्या जत शहरात 46च्यावर रुग्णसंख्या पोहोचली आहे. त्यामुळे जत शहरवासियांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत सोनवणे यांनी केले आहे. 

अलीकडच्या पंधरा दिवसात जत शहरात कोरोना रुग्णांची संख्या खूपच वाढली आहे. आधीच तीन महिने लॉकडाऊन काळात जत शहरात एकही रुग्ण सापडला नव्हता. मात्र लॉक डाऊन उठल्यानंतर बाहेर गावाहून म्हणजेच पुण्या- मुंबईहून आलेल्या लोकांच्या संपर्काने जत शहरात संसर्गाने रुग्णांची संख्या आता 46 च्यावर गेली आहे. कंटेनमेंट झोनमूळे निम्म्याहून आधिक शहरातील रस्ते सील असल्यामुळे बंद आहेत. त्यामूळे जत शहरात फिरण्यासाठी जागा अगर रस्ते नाहीत. तरीही लोक आपली काळजी न घेता रस्त्याने फिरत आहेत. बँकांच्या समोर तर लांबच्या लांब रांगा लागलेल्या असतात. कुणीही सोशल डिस्टनसिंग पाळत नाहीत. नागरिकांनी याची दखल घेतली पाहिजे.

लॉक डाऊन काळात व्यापार व कामधंदे ठप्प झाले होते. त्यामुळे पेमेंट येत नाही. विक्री ना च्या बरोबर आहे. कमीत कमी खर्च करा. खर्चात कपात करा. आपल्या मानसिक परेशानी मध्ये एकटे राहू नका.  या स्थितीचा सामना करा.हळुहळु डोंगर पोखरून रस्ता बनविण्यासाठी स्वतःला तयार करा. कमी खर्चात जगायचे आहे. ही वेळ आपली परिक्षा घेण्यासाठी आली आहे. एक वेळा शुन्यापासून सुरवात करून इथपर्यंत आलो होतो. तर पुन्हा एकदा शुन्यापासून सुरवात करून आपण पुन्हा नेटाने प्रगती करू. आपण पुन्हा एकदा बैलगाडी पासून सुरुवात करून मर्सिडीज पर्यंत पोहोचण्याची हिम्मत ठेवूया. आपल्या प्रकृतीला जपा. आपल्या कुटुंबातील सर्वांना आजारापासून दूर ठेवा, असे आवाहन सोनवणे यांनी केले आहे.

Friday, August 7, 2020

गुड्डापूर येथे चोरी; पावणेदोन लाखांचा मुद्देमाल लंपास

जत (जत न्यूज वृत्तसेवा)-

जत तालुक्यातील गुड्डापूर येथील माजी सैनिक संभाजी शिवाजी माने यांच्या राहते बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम व संसारोपयोगी साहित्य असे मिळून 1लाख 67 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना गुरुवारी पहाटे घडली.

माजी सैनिक संभाजी माने यांनी गुड्डापूर गावातच दुसरे घर. बांधले आहे. त्याची वास्तूशांती आदल्या दिवशी झाली. नवीन घरात पहिल्या दिवशी राहण्याचा नियम असल्याने ते त्यांच्या कुटुंबासह नवीन  घरातच झोपले. नवीन घरापासून 300 मीटर अंतरावर जुने घर आहे. मात्र या घराला बाहेरून कुलूप असल्याचा व घरात कुणी नसल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून चार तोळे सोने, 15 हजार रुपये रोख रक्कम, आहेरासाठी आणलेला कपड्यांचा गठ्ठा व मिलिटरी कँटिन मधून आणलेले संसारोपयोगी साहित्य असे मिळून 1लाख 67 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. संभाजी माने यांनी स्वतः जत पोलिस ठाण्यात शुक्रवारी फिर्याद दिली. जत पोलिस ठाण्यात अज्ञातांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून आधिक तपास पोलिस नाईक बंडगर करीत आहेत.

Thursday, August 6, 2020

उमदीत सॅनिटायझर, रोगप्रतिकारक शक्तीच्या गोळ्यांचे वाटत

उमदी,(जत न्यूज वृत्तसेवा)
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उमदी (ता.जत) ग्रामपंचायत व तालुका पाणी संघर्ष समितीच्यावतीने गावातील नागरिकांना नुकतेच सॅनिटायझर आणि रोगप्रतिकारक शक्तीच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच सौ. वर्षाताई निवृत्ती शिंदे, निवृत्ती शिंदे, फिरोज मुल्ला, तालुका पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार, संगु हळके, बंडू शेवाळे, सुरेश पवार,  भीमु कोरे, सरदार जकाते, सुजित सावंत, राजू शिंदे, अनिल शिंदे,संगम ममदापुरे,   आण्णाप्पा आडवी, पवन शिंदे,राजू धोत्री, धोंडीराम शिंदे, केशव पाटील आदीं उपस्थित होते.
यावेळी पत्रकार मलकारी वायचळ, सुभाष कोकळे, राहुल संकपाळ, सोमण्णा नाटीकर, गोरख भोसले, आदीं पत्रकारांनादेखील मान्यवरांच्या हस्ते सॅनिटायझर, व रोग प्रतिकारक शक्तीच्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच सौ. वर्षा शिंदे म्हणाल्या की, उमदी गावांतील प्रत्येक कुटुंबियांना सॅनिटायझर आणि गोळ्यांचे  वाटप करण्यात येणार आहे  ग्रामपंचायतीच्या कर्मचारी आणि आशा वर्कर , अंगणवाडी व प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचाऱ्यांकडून  घरोघरी या साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगून आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनेनुसार गोळ्या घ्यायचे आहे, असे सांगून प्रत्येकांनी सामाजिक अंतर, स्वच्छता, व मास्कचा वापर या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, असे आवाहन केले. 

Monday, August 3, 2020

अखिल भारतीय होलार समाज संघटना ए गटाचे धरणे आंदोलन

   
वाद्य कलाकारांवर उपासमारीची वेळ;आर्थिक मदत देण्याची मागणी 
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
कोरोनामुळे वाद्य कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे.विविध क्षेत्रात काम करणाऱ्या हजारो  कलाकारांना सध्या काम नाही. यासाठी सरकारने सरसकट अर्थिक पाच हजार रुपये कलाकारांना मदत करण्यात यावी ,यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय होलार समाज संघटना(A)गट यांचेवतीने जत तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदार कार्यालयात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब ऐवळे ,जेष्ठ नेते रामभाऊ हेगडे व जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब गेजगे यांनी दिले आहे.
 निवेदनात म्हटले आहे की, जिल्हास्तरीय कलाकार मानधन समितीमध्ये होलार समाजातील कलाकारांना प्रतिनिधीत्व मिळावे. सर्व कलाकारांना शासनाने कोरोना कालावधीमध्ये सरसकट पाच हजार रुपये मानधन देण्यात यावे व वयाची अट रद्द करावी.सर्व कलाकारांना शासनाने जीवनावश्यक वस्तुचे वाटप करावे.कलाकारांनाही राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज पुरवठा करण्यात यावा व तसे बँकाना शासनाने आदेश करावेत.अनेक कलाकार हे कोरोना या  आजारावर प्रबोधन जनजागृती करत आहेत त्यांना शासनामार्फत
योग्य मानधन देऊन कार्यक्रम करणेसाठी परवानगी देणेत यावी.या मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी कुंभारीचे लोकनियुक्त सरपंच राजाराम जावीर, भगवंत जावीर, रखमाजी जावीर, अंकूश जावीर, तुकाराम ऐवळे, कुंडलिक जावीर यांच्या सह होलार समाज कार्यकर्ते उपस्थित होते.

Saturday, August 1, 2020

म्हैसाळ विस्तारित योजनेला मंजुरी देऊन पूर्व भागाला पाणी द्या

प्रकाश जमदाडे यांची खासदार पाटील यांच्याकडे मागणी
जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
जत तालुक्यात हरिक्रांती आणणारी १९९५ ची मूळ म्हैसाळ उपसा सिंचन योजना पूर्ण करावी व पूर्वभागातील वंचित गावांकरिता विस्तारीत म्हैसाळ जत पूर्वभाग अशी योजना बनवून तिला मान्यता देण्यात यावी,अशी मागणी केंद्रीय रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी खासदार संजय पाटील यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. शिवाय सध्याच्या परिस्थितीत तुबची-बबलेश्वर (कर्नाटक राज्य ) योजनेतून जत तालुक्यातील तिकोंडी व मोटेवाडी तलावात पाणी सोडावे,अशीही मागणी जमदाडे यांनी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, जत तालुका हा कायम दुष्काळी आहे. आजही ऐन पावसाळ्यात ९ गावे ४२ वाड्यावस्त्यावर पिण्याच्या पाण्यासाठी टँकर चालू आहेत. आपल्या प्रयत्नामुळे तालुक्याच्या उत्तरेस येळवी, सनमडी तर दक्षिणेस बिळूर पर्यंत म्हैशाळ योजनेचे पाणी आले आहे. पूर्व भागात मात्र दरवर्षी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असते.अनियमित पाऊस यामुळे शेतीत हंगामी पिकेही व्यवस्थित घेता येत नाहीत, अशी स्थिती आहे. ६ मार्च २०१९ रोजी पूर्व भागातील वंचित गावासाठी विस्तारीत म्हैशाळ योजना, जत पूर्वभाग ही योजना आपण शासनास सादर केली आहे. परंतु,  अद्याप यावरती काहीही कार्यवाही झाली नाही. म्हैशाळ उपसा सिंचन योजनेमुळे २२ हजार ५०० हे. आर क्षेत्र ओलीताखाली येणे शक्य आहे. तसेच १६ लघुपाटबंधारे तलाव, संख दोड्डानाला मध्यम प्रकल्प भरून देणेची या योजनेत तरतूद आहे.२००३ साली गुडडापूर साठवण तलावास प्रशासकीय मान्यता देताना म्हैसाळ योजनेच्या पाण्याने हा तलाव भरण्यात येणार आहे,असे पाटबंधारे कार्यालयाकडून सांगणेत आले होते. म्हैसाळ योजनेचा ८३ कि.मी.चा मूळ कालवा या तलावापर्यंत होता, परंतु ८१ कि.मी.जवळ हा कालवा मायथळ येथूनच गुड्डापूरकडे न वळविता मंगळवेढ्याकडे वळविण्यात आला आहे. यामुळे माडग्याळ,सोन्याळ,उटगी, कुलाळवाडी, अंकलगी, व्हसपेठ, गुड़डापूर, आसंगी (जत),गोधळेवाडी व संख ही गावे अद्यापही हक्काच्या सिंचन योजनेपासून वंचित
आहेत. व्हसपेठपर्यंत कॅनॉल काढल्यास कमी खर्चात पाणी सुमारे १२ गावांना पाणी देणे शक्य आहे. विस्तारीत योजनेची कार्यवाही होईपर्यत मायथळ ते व्हसपेठपर्यंत कॅनॉल काढल्यास दहा ते बारा गावात शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही जुलै महिना संपत आला तरी,गतवर्षी पेक्षा पर्जन्यमान अत्यल्प आहे. त्यामुळे शेती संपुष्टात येण्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या कर्नाटक शासनाच्या कागवाड पासून अलमट्टीपर्यंत असणाऱ्या सर्व उपसा सिंचन योजना सुरू आहेत. यातील अनेक योजनेतून जतच्या पूर्व भागातील हद्दीपर्यंत पाणी आले आहे. सध्या हे पाणी समुद्रहट्टी व टक्कलगी (जिल्हा विजयपूर) येथे सोडण्यात येत आहे. तेच पाणी पुढे नैसर्गिक सायफन पध्दतीने जत तालुक्यात सोडल्यास कागनरी,मोठेवाडी, पांडोझरी, भिवर्गी तलावापर्यंत पोहोचू शकते. तसेच टक्कलगीतून पाणी सोडल्यास यत्नाळ,तिकोंडी,भिवर्गी मार्गे पुढे करजगी,बेळोंडगी,बालगाव, सुसलाद, कर्नाटक हद्दीत बोर नदीपात्रातून पाणी जाऊ शकते. यापूर्वी महाराष्ट्र शासनाने कर्नाटक शासनाला अतिरिक्त टीएमसी पाणी दिले आहे. आता कर्नाटकातून महाराष्ट्राला पाणी घेण्याची गरज आहे. त्यासाठी आपण केंद्र, महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारकडे पाठपुरवा करून 'कायम दुष्काळी' हा जतचा कलंक पुसावा,असेही जमदाडे यांनी निवेदनात म्हटले आहे.