Tuesday, August 18, 2020

ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्यक कर्मचारी आणि सुविधा पुरवा-प्रकाश जमदाडेजत (जत न्यूज वृत्तसेवा)- 

जत तालुक्यातील माडग्याळ व जत ग्रामीण रूग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्यक सुविधा तात्काळ उपलब्ध कराव्यात व रुग्णांची होणारी हेळसांड थांबवावी, अशी मागणी रेल्वे बोर्डाचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जत तालुका हा विस्ताराने सर्वात मोठा तालुका असून अवर्षण प्रवर्ग २ लाख २४ हजार ७२२ हे. क्षेत्रफळ इतके आहे. तालुक्यात २ ग्रामीण रूग्णालय, ८ प्राथमिक आरोग्य केंद्र व ४३ उपकेंद्र कार्यरत आहेत. परंतु यासाठी आवश्यक ते वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी तसेच मूलभूत उपकरणे उपलब्ध नाहीत. रूग्णांना योग्य व वेळेत उपचार मिळणेसाठी डॉक्टर, नर्स व इतर कर्मचारी यांची त्वरीत नेमणूक करून जत तालुक्यातील जनतेला न्याय द्यावा व त्यांची होणारी हेळसांड थांबवावी. आवश्यक असा औषध-गोळ्यांचा पुरवठाही होत नाही.

माडग्याळ येथे जवळपास ७ ते ८ कोटी रुपये खर्च करून ग्रामीण रुग्णालयाची अद्यावत इमारत व निवासस्थाने  उभारण्यात आली आहेत, परंतू ग्रामीण रूग्णालय स्थापन झालेपासून वैद्यकीय अधिक्षक (वर्ग १) प्रभारी आहे. डॉक्टर, नर्स व इतर कर्मचारी यांची १६ पदे रिक्त आहेत. ग्रामीण रूग्णालयासाठी आवश्यक असणारी उपकरणे, लँबोरटरीे,एक्स-रे मशीन,सोनोग्राफी मशीन, १०८ नंबर रूग्णवाहीका तसेच पोस्ट मार्टम रूम यांची कोणतीही सुविधा नाही.त्यामुळे हे ग्रामीण रुग्णालय म्हणजे 'असून अडचण आणि नसून खोळंबा' अशी झाली आहे. या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

जत येथेही एक ग्रामीण रूग्णालय आहे. जत शहराची लोकसंख्या ५० हजारहून अधिक  आहे. या  ग्रामीण रूग्णालयात कर्मचारी संख्या अपूरी आहे. तसेच उपचारासाठी लागणारी आवश्यक ती कोणतीही उपकरणे नाहीत. कोणताही रूग्ण असला तरी त्यास मिरज किंवा सांगलीला 'रेफर' करून पाठवले जाते. तालुक्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येदेखील  अनेक जागा रिक्त असून तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय बंडगर यांचेकडे वळसंग व संख केंद्राचा अतिरिक्त कार्यभार आहे. तर डॉ. शिंदे यांचेकडे को-बोबलाद व उमदी तर डॉ.सौ.पाटील यांचेकडे शेगाव व येळवी केंद्राचा कार्यभार आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात आवश्यक स्टाफ व उपकरणे नसलेने रूग्णाचे हाल होत आहेत. संख प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गळके पत्रे आहेत.

तसेच उमदी येथे पोस्ट मार्टम रूम असूनदेखील त्याठिकाणी जाण्यास साधा रस्ताही नाही हे दुर्दैव आहे. जत तालुक्यात ४२ उपकेंद्रे असून याठिकाणाची १२ पदे रिक्त आहेत. सामुदायिक आरोग्य अधिकारी (सी.एच.ओ) कंत्राटी पगारावर नेमणूक केली आहे, परंतू त्यांनाही बऱ्याच दिवसापासून पगार देण्यात आला नाही. कायमस्वरूपी नर्सना ३५ हजार रुपये पगार, तर १० वर्षापासून काम करणाऱ्या नर्सना १२हजार रुपये पगार व कोव्हीडमध्ये कंत्राटी नर्सना १८हजार रुपये पगार आहे. काम तेच पण पगारामध्ये तफावत आहे.त्यामूळे कामात अनियमितता येत आहे.

शासनाने प्रत्येक ठिकाणी लाखो रुपये खर्चुन दवाखाने इमारती व निवासस्थाने बांधली आहेत, परंतु अनुभवी व पुरेशे डॉक्टर व इतर स्टाफ तसेच आवश्यक उपकरणे नसलेने या इमारतींचा शासनाला आणि रुग्णांना काहीच उपयोग होत नाही. सर्वसामान्यांना तर  उपचारही मिळत नाही.तरी प्रत्येक PHC ला laboratory,x-ray machine,Sonography machine व आवश्यक पाहीजे ते औषध -गोळया पुरविणे विषयी सुचना करावीत, अशी मागणी जमदाडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

No comments:

Post a Comment