Sunday, August 23, 2020

सध्या आपले सरकार काय करते?

कोरोना संसर्गाच्या टाळेबंदीने देशाची अर्थव्यवस्था चिंताजनक बनली आहे. महासत्तापदाचे स्वप्न पाहणाऱ्या या देशास आर्थिक दैन्यावस्थेतून बाहेर काढण्यासाठी सत्ताधारी लोकांकडून कोणते प्रयत्न सुरू आहेत, हे कळायला मार्ग नाही. जर ते सुरू आहेत किंवा काय हे तपासण्याची काही मापपट्टी आपल्या नागरिकांकडे आहे का, याचीही माहिती मला नाही. कारण सत्ताधारी गटाच्या बाजूचे लोक उदोउदो करताना दिसत आहेत तर विरोधक देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली असल्याचे सांगतात. त्यामुळे देशात नक्की नेमकं काय चाललं आहे आणि आपला देश अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यावर कोणत्या टप्प्यावर आहे कळायला मार्ग नाही. खरे तर आज केवळ आपलाच देश नाही तर संपूर्ण विश्वच गंभीर आर्थिक संकटात सापडलेले असताना आणि अनेक देशांत या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न सुरू असताना आपले काय सुरू आहे, हा प्रश्न मात्र भेडसावतो आहे. सध्या या व्यापक आर्थिक दुरवस्थेचे खापर करोना विषाणूवर फोडण्याची सोय आहे, हे मान्य. पण हा कोरोनाकाळ सुरू होण्याआधीच आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेस मुडदुस झालेला होता. त्यामुळे आपली आर्थिक अवस्था हातपायांच्या काडय़ा झाल्यासारखी आहे म्हणून कोरोनास बोल लावण्याचे काहीच कारण नाही, असेही अनेकांना वाटत आहे. आपल्या अर्थव्यवस्थेची करोनाच्या आधीपासूनच बोंब होती. करोनाने तिचे तीनतेरा वाजवले इतकेच,असेही म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या वास्तवाकडे आपण उघडय़ा डोळ्यांनी पाहायला हवे. पण तसे कोणीच पाहताना दिसत नाही. अभिनेता सुशांतसिंग याच्या आत्महत्येनंतर जे काही राजकारण चालले आहे, ते खरेच क्लेशदायक आहे.  अर्थतज्ज्ञांच्या भाकितानुसार या वेळेस पहिल्यांदाच आपल्या अर्थव्यवस्थेचा वेग शून्याखाली जाईल. याचा अर्थ असा की याआधी अनेकदा आपल्या अर्थव्यवस्थेचे आकुंचन झाले आहे. तिचा वेग मंदावला आहे. पण १९७९ पासून तो कधीही उणे झालेला नाही. यंदा तो तसा असेल. ऐंशीच्या दशकातील आर्थिक संकटास जागतिक तेल समस्या कारणीभूत होती. त्यामुळे सर्वच देशांची परिस्थिती दयनीय होती. आता तसे म्हणता येणार नाही. आपल्यासारखे देश आताच्या संकटात इतरांच्या तुलनेत अधिक भरडले जाणार आहेत. अनेक तज्ज्ञांनी दाखवून दिल्यानुसार यंदा आपले सकल राष्ट्रीय उत्पन्न किमान पाच टक्के ते १० टक्क्यांपर्यंत घसरू शकते. गतकालीन आणि सध्याच्या संकटकालात फरक असा की याआधीच्या अरिष्टांमुळे गरिबांची अन्नान्नदशा होत असे. परंतु, अभ्यासू पत्रकार हरीश दामोदरन यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’मधील लेखात दाखवून दिल्याप्रमाणे यंदा धान्याची कोठारे ओसंडून वाहतील इतके कृषी उत्पन्न पिकेल. तथापि मोठय़ा प्रमाणावरील नागरिकांची हे धनधान्य खरेदी करण्यासारखी परिस्थितीच नसेल. याचा सरळ अर्थ असा की पुरवठा ही या आर्थिक आव्हान काळातील समस्या नाही. प्रश्न आहे तो मागणी नसण्याचा. ही मागणी नाही कारण नागरिकांच्या हाती पैसा नाही आणि ज्यांच्या हाती तो आहे तो वर्ग उद्याच्या चिंतेने खर्च करण्यास तयार नाही. म्हणून आता प्रयत्न हवे आहेत ते मागणी कशी वाढेल यासाठी. पण त्याबाबत सरकार एक चकार शब्द काढण्यास तयार नाही. आपण योजलेले उपाय अत्यंत परिपूर्ण असल्याची सरकारला खात्री आणि ते पुरेसे नाहीत या सत्याची जाणीवच अनेकांना नाही. अशा वातावरणात आभासी आनंदाचा एक बुडबुडा तयार होतो आणि सर्वच त्यात सुखाने नांदू लागतात. तसे आपले आहे. वास्तविक अशा परिस्थितीत किती नावीन्यपूर्ण उपाय योजायला हवेत हे इंग्लंडचे अर्थमंत्री ऋषी सुनक यांच्यासारख्यांनी दाखवून दिले आहे. जास्तीतजास्त नागरिकांनी हॉटेलात जाऊन खावे यासाठी त्यांनी विशेष योजना जाहीर केली. त्यानुसार त्या देशात हॉटेलात खाण्यावर होणाऱ्या खर्चाच्या दरडोई १० पौंडांपर्यंतच्या बिलातील निम्मा वाटा सरकार उचलते. याचा परिणाम म्हणून नागरिकांची हॉटेलांकडे रीघ लागली. म्हणून त्या देशातील उपाहारगृहांत काम करणाऱ्या १८ लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या वाचल्या. जर्मनी, अमेरिका, युरोपातील अन्य काही देश यांनीही असे काही अप्रचलित उपाय योजून नागरिकांकडून मागणी कशी वाढेल यासाठी प्रयत्न केले. त्याचा परिणाम त्या त्या देशांच्या अर्थव्यवस्थांवर ठसठशीतपणे दिसतो. याउलट आपल्याकडची सरकारी मदत योजना मात्र कर्ज हमीच्या मर्यादा वाढवण्यापलीकडे फार काही करीत नाही. तीत उद्योगादींसाठी पतपुरवठय़ाच्या मर्यादेत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे, हे मान्य. पण बाजारात उत्पादनांस मागणीच नसताना अधिक आणि स्वस्त पतपुरवठय़ाच्या आधारे जास्त उत्पादन करून बाजारात धाडण्याचा उपयोग तरी काय? त्यातून फक्त दुकानांची धन. पण खरेदीदारच नसल्याने दुकानदारांनीही हात आखडता घेतल्यास आश्चर्य ते काय! सध्या समाजजीवन मात्र एका अत्यंत भुक्कड विषयात तल्लीन झाले आहे. ही आपल्याच इतिहासाची पुनरावृत्ती. देशावर सोने गहाण ठेवण्याची वेळ आली असता त्या संकटाच्या गांभीर्याचा लवलेशही नसलेले अनेक जण त्या वेळी दूरदर्शनवरील भक्तिरसपूर्ण मालिकेत चित्त हरवून घेत होते. तसेच हे. यात निष्पाप निरागसता नाही. असलेच तर अज्ञान आहे. त्याची व्याप्ती आणि खोली किती याची जाणीव कुणालाच नाही.

No comments:

Post a Comment