Wednesday, August 12, 2020

वन्यजीवांच्या हत्या रोखण्यासाठी गस्ती वाढवा:श्रीकांत सोनवणे

जत, (जत न्यूज वृत्तसेवा)- 

वन्यजिवांची हत्या करण्याचे प्रमाण जत तालुक्यात वाढले असून वन विभागाने वन क्षेत्रात गस्ती पथक वाढवून जत तालुक्यातील वन्य प्राणी व पक्षांचे संरक्षण करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत सोनवणे यांनी केली आहे. 

महिनाभरापूर्वी राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार करणारे दोघेजण जत-सांगली रोडवरील वाशाण जवळील आडव्या डोंगरावर काही नागरिकांना आढळून आल्याने त्यांनी त्यांना पकडून वन विभाग व पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्याचबरोबर उटगीत सशाची शिकार केल्याप्रकरणी दोघांना वन विभागाने पकडले. त्याच बरोबर दुर्मिळ पक्षांची शिकार केल्या प्रकरणी आणखी एका ठिकाणी कारवाई करण्यात आली. उमदी पोलिसांनी सीमेवर मांडूळ जातीचे सर्प जप्त केले होते. अशा प्रकारे वन्य जिवांची शिकार तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. 

आधीच जत तालुक्यात कमी आहे. वनक्षेत्र कमी असल्याने पाऊसमान कमी झाले आहे. त्यामुळे तालुक्याला सातत्याने दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे.  त्यातच वनक्षेत्रदेखील कमी होऊ लागले आहे. वनक्षेत्र कब्जात घेणे, तेथील झाडे तोडणे असेही प्रकार तालुक्यात होत आहेत. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे मोर, कासव आणि मांडूळ यांची तस्करी पैशासाठी मोठ्या प्रमाणात होत आहे. सशाची शिकार तर नित्यच होत आहे. कासव आणि मांडूळ पैशांचा पाऊस पाडतात, अशी अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणात पसरल्याने हे प्राणी मोठ्या किंमतीला विकले जात आहेत. मोराचे मांस औषधी म्हणून खाण्यासाठी वापरले जाते. या सगळ्यामुळे तालुक्यातील पक्षी आणि प्राणी संपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. 

वेगाने होत असलेल्या शहरीकरणामुळे व लोकसंख्या वाढीमुळे प्राण्यासाठी असणारी वन्य जमिनीचे क्षेत्र कमी कमी होत चालले आहे व प्राण्यांना स्वताचे अस्तित्व टिकवणे अवघड झाले आहे व काही प्राण्याचा प्रजाती नामशेष होण्याचा मार्गावर आहेत. ह्या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देवून नामशेष होवू घातलेल्या प्राणी व पक्षी यांच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी वन विभागाने जत तालुक्यात गस्ती वाढविणे गरजेचे आहे, असे सोनवणे यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment