Friday, August 7, 2020

गुड्डापूर येथे चोरी; पावणेदोन लाखांचा मुद्देमाल लंपास

जत (जत न्यूज वृत्तसेवा)-

जत तालुक्यातील गुड्डापूर येथील माजी सैनिक संभाजी शिवाजी माने यांच्या राहते बंद घरातून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोन्याच्या दागिन्यासह रोख रक्कम व संसारोपयोगी साहित्य असे मिळून 1लाख 67 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना गुरुवारी पहाटे घडली.

माजी सैनिक संभाजी माने यांनी गुड्डापूर गावातच दुसरे घर. बांधले आहे. त्याची वास्तूशांती आदल्या दिवशी झाली. नवीन घरात पहिल्या दिवशी राहण्याचा नियम असल्याने ते त्यांच्या कुटुंबासह नवीन  घरातच झोपले. नवीन घरापासून 300 मीटर अंतरावर जुने घर आहे. मात्र या घराला बाहेरून कुलूप असल्याचा व घरात कुणी नसल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून चार तोळे सोने, 15 हजार रुपये रोख रक्कम, आहेरासाठी आणलेला कपड्यांचा गठ्ठा व मिलिटरी कँटिन मधून आणलेले संसारोपयोगी साहित्य असे मिळून 1लाख 67 हजारांचा मुद्देमाल लंपास केला. संभाजी माने यांनी स्वतः जत पोलिस ठाण्यात शुक्रवारी फिर्याद दिली. जत पोलिस ठाण्यात अज्ञातांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून आधिक तपास पोलिस नाईक बंडगर करीत आहेत.

No comments:

Post a Comment