Monday, August 17, 2020

एक गाव एक गणपती उपक्रम राबविणाऱ्या गावास गणेश मूर्ती भेट देणार- तुकाराम बाबा महाराज

 ★ अनावश्यक खर्चाला, लोकवर्गणीला फाटा देण्याचे आवाहन

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

 कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावोगावी असलेल्या गणेश मंडळांनी सार्वजनिक गणेश उत्सव साजरा न करता एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवावा. एक गाव एक गणपती उपक्रम राबविणाऱ्या गावास गणेश मूर्ती भेट देण्यात येणार आहे. गणेश मूर्ती बरोबरच मंडळाचे पदाधिकारी यांना सॅनिटायझर तसेच मास्कचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती चिकलगी मठाचे मठाधिपती हभप तुकाराम बाबा महाराज यांनी दिली.

तुकाराम बाबा महाराज म्हणाले, दरवर्षी गणेशोत्सव मोठया प्रमाणात साजरा करण्यात येतो. मागील नऊ वर्षापासून म्हणजे २०११ पासून दरवर्षी एक गाव एक गणपती राबविणाऱ्या मंडळास, गावास श्री ची मूर्ती आपण भेट दिली आहे. २०११ ला मंगळवेढा येथून या उपक्रमास सुरुवात केली त्यानंतर जत तालुक्यात हा अभिनव उपक्रम राबविला. यावर्षीही ज्या गावात सर्वजण एकत्र येत एक गाव एक गणपती हा अभिनव उपक्रम राबवतील त्यांना श्री ची मूर्ती भेट देण्यात येणार आहे. त्याचबरोबर एक गाव एक गणपती मंडळाचे जे पदाधिकारी आहेत त्यांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात येणार आहेत. ज्या गावात गणेशोत्सव काळात मंडळे औषध फवारणीसाठी पुढाकार घेतील त्यांना औषधे मोफत देण्यात येणार आहेत.

दरवर्षी एकाच दिवशी श्री च्या मूर्तीचे वाटप करण्यात येते पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावोगावी स्थापन करण्यात आलेल्या श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेमार्फत श्री ची मूर्ती, सॅनिटायझर तसेच औषध फवारणीसाठीचे औषध पोच करण्यात येणार असल्याचे तुकाराम बाबा महाराज यांनी सांगितले.

कोरोनाच्या या कठीण काळात जत तालुक्यात कोरोनाने शिरकाव करण्यापूर्वीच आपण जत तालुक्यातील शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले होते. जत तालुक्यात आठ हजार मास्कचे वाटप करण्यात आले तसेच लॉक डाऊन काळात साडेपाच हजार गरजुना जिवनावश्यक किट, २२ हजार कुटूंबियांना भाजीपाला किटचे वाटप करण्यात आले. पोलीस व अन्य कर्मचाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था लॉक डाऊन काळात करण्यात आल्याचे सांगून तुकाराम बाबा महाराज म्हणाले की, सध्याच्या या कठीण काळात गणेशोत्सव असो की अन्य कोणताही उत्सव असो सामाजिक बांधिलकी जपत मंडळ व ग्रामस्थांनी काम करणे गरजेचे आहे. यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने सोशल डिस्टन्सच्या नियमाचे पालन करत साजरा करावा. लोकवर्गणी जमा करू नये, श्री च्या मिरवणुकीला तसेच डॉल्बी व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमाला फाटा द्यावा. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गावोगावी स्वच्छता मोहीम राबवावी, कोरोनाबाबत जनजागृती करावी, वृक्षारोपन व वृक्ष संवर्धन करावे, गावात औषध फवारणी करावी असे आवाहन चिकलगी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी केले आहे.

■ सामाजिक बांधिलकी जपा...

श्री गणेशाचे आगमन ते विसर्जन हा आपल्यासाठी मोठा उत्सव काळ पण आज कोरोनामुळे या उत्सवाला सामाजिक बांधिलकीचे रूप देणे काळाची गरज आहे. यंदाच्या गणेशोत्सव काळात विविध सामाजिक उपक्रम राबविताना सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यक्रम तर हाती घ्यावेच त्याचबरोबर या कठीण काळात माणुसकीचे दर्शन घडवावे, एकमेकाला सहकार्य करावे असे आवाहन तुकाराम बाबा महाराज यांनी यावेळी केले.

■ संपर्क करण्याचे आवाहन

मंडळानी मूर्तीसाठी प्रशांत कांबळे ( अचकनहळळी), .सुरज मणेर, सिद्धनाथ ऐवले, विनोद भोसले , विवेक टेंगले (कोसारी), रवी शिंदे .(तिप्पेहळळी), किरण कोळी .(डफळापूर), खिल्लारे सर (बागलवाडी), रामदास शिंदे (अंतराळ), रामचंद्र रणशिंग (बनाळी), संजय कांबळे (कुनिकोनुर), विक्रम कांबळे (देवनाळ), गंगाधर हिरगौड (रावळगुंडवाडी), विलास राठोड ( दरिकोनुर), दादासाहेब सबकाळे (गिरगाव), बाळासाहेब मोटे (मोटेवाडी), संतोष व्हनमोरे (भिवर्गी), गंगाधर कांबळे (सालेकिरी), जयदीप मोरे (संखं), आमसिद्ध सरगर (लवंगा) यांना संपर्क साधावा असे आवाहन तुकाराम बाबा महाराज यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment