Monday, September 28, 2020

रामपूर किल्ल्याची किल्लाप्रेमींकडून स्वच्छता


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

जतपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर पूर्वेला सांगली मार्गावर  शिवकालीन  रामदुर्ग किल्ला आहे. त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. सध्या इथे झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली होती.  रामदुर्गटीम  व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या कार्यकऱयांच्यावतीने  किल्ल्याची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. झाडे-झुडपे हटवण्यात आली आहेत. याला रामपूर ग्रामपंचायतीनेही मोठ्या प्रमाणात साथ दिली.

जतपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर शिवकालीन रामदुर्ग किल्ला आहे. येथे राबवण्यात आलेल्या  स्वछता मोहिमेदरम्यान गडावर वाढलेली अनावश्यक झाडे काढण्यात आली. तसेच गडावरील प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला.गडावरील महादेवाची पूजा करून व ध्येय मंत्र म्हणून कामाची सुरुवात करण्यात आली. त्याच बरोबर मंदिराच्या मधील दडपल्यागेलेल्या गोमुखास मोकळा श्वास देण्यात आला.यावेळी सांगलीमधून टीम रामदुर्ग चे स्वप्नील भजनाईक,गणेश घम,हेमंत खैरमोडे तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान जत शाखेचे धारकरी सिद्धगोंडा पाटील, ग्रामपंचायत रामपूर चे माजी सरपंच.मारुती पवार ,सरपंच रखमाबाई कोळेकर,तानाजी कोळेकर, सामाजिक कार्यकर्ते मनोहर शिंदे,प्रमोद शिंदे,प्रशांत शिंदे,टीम किल्ले रामदुर्ग चे मावळे व रामपूर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.यआ सगळ्यांनी मिळून गडाची स्वच्छता केली. 


Saturday, September 26, 2020

तुबची-बबलेश्वर योजनेचे पाणी जतच्या पूर्वभागात दाखल- आमदार सावंत


जत, (जत न्यूज वृत्तसेवा)- 

कर्नाटकातील तुबची- बबलेश्वर योजनेचे पाणी जत तालुक्यात कधीच येणार नाही, अशी वल्गना करणाऱ्या विरोधकांना पाणी आल्याने चाप बसला आहे, असे प्रतिपादन आ. विक्रम सावंत यांनी जत तालुक्यातील भिवर्गी येथे बोलताना केले. 

जत पुर्व भागातील भिवर्गी तलाव व करजगी बंधाऱ्यांतील पाण्याचे पुजन आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. आ.सांवत म्हणाले,आ. सावंत म्हणाले, जत पुर्व भागात कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर योजनेतून आलेले हे पाणी या भागातील शेतीचा कायापालट करून जनतेला समृध्द करू. मी विधानसभा निवडणूकीच्या पुर्वीपासून या योजनेतून पाणी यावे, यासाठी प्रयत्न करत होतो. निवडणूकीतही या भागाचा या योजनेतून पाणी आणून कायापालट करण्याचे आश्वासन दिले होते. आज त्यांची पुर्तता झाली आहे.मला माझ्या तालुक्यातील जनता सुखी,समृद्ध व्हावी यासाठी काम करायचे आहे. पाणी,रस्ते,विज,अशा मूलभूत सुविधा मुबलक उपलब्ध झाल्या पाहिजेत, शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ माझ्या तालुक्यातील जनतेला झाला पाहिजे, यासाठी मी पुढेही काम करणार आहे,असेही आ.सांवत म्हणाले.

पाण्याचे पुजन करून आ.सांवत यांनी या तलावाचा कॅनॉल दरवाजे उचलून कार्यान्वित केला.त्यामुळे करजगी,बेळोंडगी, बोर्गी, बालगाव, हळ्ळी, सोनलगी, सुसलाद ते पुढे कर्नाटकातील चडचण पर्यंत पाणी पोहचविण्यात येणार आहे.

यावेळी माजी सभापती बाबासाहेब कोडग, संतोष पाटील,मार्केट कमिटी संचालक संजय सांवत,पाटबंधारे विभागाचे अधिकारी श्री.मोरे,शेख,करजगीचे कॉग्रेस नेते डॉ.बशीर,संरपच सायबपाशा बिराजदार,सुभाष बालगाव,श्रीमंत आवटी, नबी जागीरदार,साहेबांना ककमरी, ज्ञानेश्वर बमनाली,आदी मान्यवर उपस्थित होते.

जत तालुक्यात लवकरच कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून मोफत मार्गदर्शन व कोरोना उपचार केंद्र सुरू करणार : दिनकर पतंगे


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)- 

जत तालुक्यात सध्या कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता लायन्स क्लब जत, नरेश फाऊंडेशन आणि पतंजली योगा समिती (जत) च्या वतीने लवकरच जत, उमदी, माडग्याळ येथे रूग्णांना उपचारासाठी मोफत मार्गदर्शन केंद्र सुरू करणार असल्याचे लायन्स क्लब झोन चेअरमन दिनकर पतंगे यांनी सांगितले. 

या तीन ठिकाणी विविध प्रकारच्या तज्ञ डॉक्टरांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात अॅलिवोपॅथिक, अॅक्युपेशन,निसर्ग उपचार तज्ञ, होमिओपॅथी, अशा अनेक प्रकारच्या डॉक्टरचा यात समावेश करण्यात आला आहे. यामध्ये जतमधील प्रसिद्ध डॉ रविंद्र आरळी, डाॅ.नितिन पतंगे,डाॅ.सौ.प्रगती पतंगे, डॉ. सुभाष मालाणी, डॉ. सार्थक हिट्टी,डाॅ.मुलचंदाणी,योगा तज्ञ आर जी माळी, योगा शिक्षिका घोडके, योगा शिक्षक दिनकर पतंगे आणि डाॅ. हत्तळी अशा तज्ञ  डॉक्टरांचा यात समावेश आहे.त्यासोबत कोरोना योध्दा सामाजिक कार्यकर्ते राजेन्द्र आरळी ,कोरोना योध्दा सामाजिक कार्यकर्ते सहदेव उर्फ एम जगदीश माळी सर व कोरोना योध्दा सन्मानित राजू सावंत यांचाही यात समावेश करण्यात आला आहे. तर अशा ठिकाणी  जत तालुक्यातील प्रत्येक रूग्णांनी जाऊन सल्ला घेऊन उपचार घ्यावेत. सर्वसामान्य लोकांना परवडेल असे हे मोफत मार्गदर्शन उपचार केंद्र जतमध्ये लवकरच सुरू करणार असून याचा लाभ घ्यावा असे दिनकर पतंगे यांनी सांगितले.

'जत' दुष्काळी तालुका हा 'कलंक' पुसून टाकणार: आ. सावंत


जत, (जत न्यूज वृत्तसेवा)-

जत तालुक्याचा दुष्काळी कलंक पुसून टाकण्यासाठी येत्या चार वर्षात पाणी, रस्ते या दोन गरजांच्या कामावर भर देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती आमदार विक्रम सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

जत तालुक्यात पावसाचे प्रमाण कायमच कमी असल्याने म्हैसाळ योजनेतून तलाव भरून देण्याची मागणी वारंवार शासनाकडे केली होती. त्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील व कृषीराज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. म्हैसाळ योजना १७ ऑगस्टला सुरू झाली.योजनेतून तलाव भरले. यासाठी मुख्यमंत्री,पालकमंत्री जयंत पाटील यांचे आभार.मात्र पूर्व भागातील अद्यापही ६७ गावे वंचीत आहेत. या गावांना तुबची-बबलेश्वर योजनेचे पाणी सहजपणे मिळू शकते.सध्या हे पाणी तिकोंडी तलाव व हळ्ळी पर्यंत आले आहे. तुबची-बबलेश्वर योजनेतून जतच्या पूर्व भागातील वंचीत ६७ गावासाठी अत्यंत उपयुक्त अशी योजना आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी कर्नाटक राज्याचे माजी जलसंपदा मंत्री एम.बी.पाटील यांच्या प्रयत्नामुळे व मानवतेच्या दृष्टीकोनातून योजनेतून पाणी मिळाले होते.यावेळी सुद्धा तुबची-बबलेश्वर योजनेचे पाणी जालेगिरी फाट्यापासून तिकोंडी तलावात आले आहे.तिकोंडी तलाव ओहरफ्लो होऊन भिवर्गी तलावात सोडले आहे.पुढे करजगी,बोर्गी,बेळोंडगी, बालगांव, हळ्ळी, सुसलाद, सोनलगी या भागात पाणी  पोहचू शकते. सध्या हळ्ळीपर्यंत पाणी पोहचले आहे.महाराष्ट्र शासनाच्यावतीने कर्नाटक राज्याकडे दोन टीएमसी इतक्या पाण्याची मागणी वारंवार केली आहे.तसेच नगरपरिषेदेची प्रशासकीय इमारतीचे काम टेंडर प्रोसेस मध्ये आहे.युवकांच्या हाताला उद्योग धंद्याच्या माध्यमातून राष्ट्रीयकृत  बँकांनी कर्जपुरवठा करावा अशा सूचना केल्या आहेत.सर्वांच्या सहकार्याने जत तालुक्यावर पडलेला दुष्काळाचा कलंक पुसण्याचा प्रयत्न करणार असल्याचे शेवटी आमदार सावंत म्हणाले.

शेवटी अंतर राहूनच गेलं...

 *शेवटी अंतर राहूनच गेलं...*

लहानपणी प्रवास करताना आई

घरून डबा करून द्यायची; पण

बाकीच्या लोकांना विकत घेऊन

खाताना बघितले की खूप वाटायचं,

आपणही विकत घेऊन खावं. पण

बाबा म्हणायचे, ती श्रीमंत माणसं,

पैसे खर्च करून खाऊ शकतात, आपण नाही.

मोठेपणी विकत घेऊन खाताना बघितले, तर आरोग्याची काळजी

म्हणून बाकी लोकं घरून करून आणलेला डबा खाताना दिसू

लागली.

शेवटी अंतर राहूनच गेलं..

लहानपणी जेव्हा मी सुती कपडे घालायचो, तेव्हा बाकी लोक

टेरिकॉट कपडे घालायचे, खूप वाटायचं आपणही असे कपडे घालावे.

मोठेपणी आम्ही टेरिकॉट घालायला लागलो आणि ते सुती. सुती कपड़े महाग झाले. परत शेवटी अंतर राहूनच गेलं..

लहानपणी खेळताना पडलो तर गुडघ्यावर पँट फाटायची, आई

छानपैकी शिवायची, पण शिवलेलं कोणाला दिसू नये ही माझी धडपड आसायची.

मोठेपणी गुडघ्यावर फाटलेले कपड़े

दामदुपटीने घेताना बघितले.

शेवटी अंतर राहूनच गेलं..

आता कळलं,

हे अंतर असंच कायम राहणार,

मनाशी पक्कं केलं.

जसा आहे. तसाच रहा,

मजेत रहा...

●●●●●●

जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा

चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे.

●●●●●●

आरशापुढे उभे असलेल्या पत्नीने पतिदेवाला विचारले - मी खूप जाड दिसते का?

पतीने निरुपयोगी भांडणे टाळण्यासाठी सांगितले - मुळीच नाही!

बायको आनंदी झाली आणि म्हणाली- ठीक आहे, मग मला आपल्या दोन्ही हातांनी उचलून घ्या आणि फ्रीजजवळ घेऊन चला. मी आइस्क्रीम खाईन!

परिस्थिती अनियंत्रित होत असल्याचे पाहून नवरा म्हणाला...

"थांब,.... मी फ्रीजच आणतो!"


जावयांचे प्रकार...

 *जावयांचे प्रकार...*

आपल्याकडे जावयाचे चार प्रकार पडतात...

१) साखऱ्या जावई :

साधारणतः २ टक्के जावई या प्रकारात मोडतात. ते १०० किलोमीटरपेक्षा लांब किंवा परराज्यात अथवा परदेशात असतात. त्या मुळे हे वर्ष-दोन वर्षातून सासुरवाडीला जातात. म्हणून या जावांना खाण्यासाठी गोड-धोड पदार्थ तसेच कपडेलत्ते देऊन यांचा मानपान होतो. चांगलीच बडदास्त असते याची. म्हणून हा साखऱ्या जावई... जावयांमध्ये उत्तम प्रकार हाच आहे...

२) भाकन्या जावई:

या प्रकारात ९५ टक्के जावई मोडतात. हे जावई सासुरवाडीच्या जवळपासच राहतात, तर काही एकाच शहरात राहतात. हे सासुरवाडीला वरचेवर जात असतात. तर काही वेळेस बायकोला तिच्या आई वडिलांची आठवण आली तर तिच्या सोबत जावे

लागते. यांचे जाणे येणे नेहमीचे असते त्यामुळे या जावयाला खाण्यासाठी जे घरात केले तेच वाढले जाते. तर कधी-कधी फक्त चहावर भागविले जाते... हा नेहमीचाच म्हणून काही खास मानपान नसतो, म्हणून हा भाकन्या जावई...

३) ढोकऱ्या जावई :

या प्रकारात २ टक्के जावई सापडतात. हे घरजावई असतात. या जावयाला घरात पाणी सुद्धा स्वतः घ्यावे लागते. तर कधी कधी घरात भाजीपाला, दुध असे आणून द्यावे लागते. झाड लोटीची कामे पण करावी लागतात. हा घरजावई म्हणून मानपान तर सोडा, पण दिवसांतून एक वेळेस तरी याचा अपमान नक्कीच केला

जातो. म्हणून हा ढोकऱ्या जावई...

४) दयावान जावई:

हा जावई सासरच्या लोकांना कायम मदत करतो. बायकोच ऐकतो. मेहुण्याला उसने पैसे देतो. त्याला सासरची मंडळी त्याला कायम गोड-गोड बोलून हरभऱ्याच्या झाडावर चढवून चांगलेच लुटतात. हा १-२ वर्षातून सासरी येतो, त्यावेळी त्याचेकडे आजूबाजूचे लोक दयेने बघतात म्हणून हा दयावान जावई...

आता तुम्हीच ठरवा आपण स्वत: कोणते जावई आहोत ते...?

●●●●●●

जो शर्यतीत धावणाऱ्या चाबकाचे फटके आणि चटके मिळतात म्हणून तो धावत राहतो. त्याला माहित नाही तो का धावतो?

जर आयुष्यामधे तुम्हाला फटके आणि चटके

पडत असतील तर परमेश्वर तुमचा राइडर आहे, तो फटके आणि चटके देतोय कारण तुम्ही जिंकणार

आहात!

●●●●●●

*विनोद*

तो : साहेब, हे बघा, हेल्मेट आहे डोक्यावर, पोल्युशन

सर्टिफिकेट, इन्शुरन्स, आरसी बुक सगळं आहे, अजुन काही राहिलंय?

साहेब : अरे पण गाडी कुठाय?

तो : तुम्ही दिसलात म्हणून मागे पार्क करून आलोय, कागदपत्र चेक करून घेतले, आता आणतो...


एका दारूच्या बाटली मागचे अर्थकारण*

 *एका दारूच्या बाटली मागचे अर्थकारण*

लक्षात ठेवा, एक बाटली मागे,

शासनाला महसूल,

वेटरला टीप,

हॉटेल व्यवसाय,

कर्मचारी रोजगार,

सोडा पाणी बाटली उद्योग,

फूड इंडस्ट्री,

चिकन मटण शॉप,

पोल्ट्री उद्योग,

शेळीपालन,

मसाले व इतर गृह उद्योग,

भंगारवाल्याला बाटली,

चकण्यामुळे बचत गटातील महिलांना पापडाची ऑर्डर,

असे अनेक अर्थचक्र या वर आहे,

परत जास्त झाली की दवाखाने आहेत,

 भानगडी झाल्या वर पोलीस व वकील आहेतच.

 आजपासून दारुडा अजिबात म्हणायचे नाही.

मग म्हणणार ना *अर्थसैनिक*?

●●●●●●

*शब्द*

माणसाजवळ त्याच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे त्याचे चांगले विचार... कारण धन आणि बळ कोणत्याही माणसाला वाईट मार्गावर नेऊ शकतात. परंतु चांगले विचार माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करित असतात.

जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात तर जिव्हारी लागणारे शब्द आयुष्य बिघडवतात

शब्द प्रेम देतात, शब्द प्रेरणा देतात

शब्द यश देतात, शब्द नातं देतात

शब्द आयुष्यभर आणि आयुष्या नंतरही मनामनात जपणारी भावना देतात.

 शब्दांचं मोल जपलं की आपलं आयुष्यही अनमोल

होतं.

●●●●●

*वाचा विनोद*

समोरच्या अपार्टमेंटमधील ती पाच मिनिटं हात हलवत होती..

मग बंड्याने पण हात केला, तेवढ्यात बायकोने पाठीत रट्टा दिला, व म्हणाली ती खिडकीची काच

पुसतेय...


*कुणावर तरी प्रेम करावे*

 *कुणावर तरी प्रेम करावे*

जमेल तसे प्रत्येकाने, कुणावर तरी प्रेम करावे!

कधी संमतीने, कधी एकतर्फी; पण, दोन्हीकडे सेम करावे!

प्रेम सखीवर करावे,

बहिणीच्या राखीवर करावे!

आईच्या मायेवर करावे,

बापाच्या छायेवर करावे!

प्रेम पुत्रावर करावे,

दिलदार शत्रूवरही करावे!

प्रेम मातीवर करावे,

निधड्या छातीवर करावे!

कोटर अंम कट्टा

शिवबाच्या बाण्यावर,

लतादीदींच्या गाण्यावर

सचिनच्या खेळावर आणि

वारकऱ्यांच्या टाळावरही

करावे!

 प्रेम पुलंच्या पुस्तकावर करावे,

गणपतीच्या मस्तकावरही करावे!

महाराष्ट्राबरोबरच देशावर आणि न चुकता

स्वतःवर जमेल तसे प्रेम करावे!

●●●●●

*ध्यान का करावे?*

लोक एकत्रितपणे साधना केल्याने त्यांच्या लहरी दूरवर

पसरतात आणि नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकता निर्माण करतात. आइन्स्टाईनने

शास्त्रीय दृष्टिकोनातून सांगितले आहे की एका अणुचे

विघटन केल्यास तो त्याच्या शेजारील अनेक अणूंचे

विघटन करतो. त्यालाच आपण अणुविस्फ़ोट म्हणतो.

हीच गोष्ट आपल्या ऋषी-मुनींनी आपल्याला हजारो

वर्षांपूर्वी सांगितली आहे. आपण ध्यान केले तर आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींवरील सकारात्मक परिणाम आपल्यास दिसून येईल.

आपण आपली भौतिक, तसेच आध्यात्मिक प्रगती

ध्यानामुळे कमी श्रमात साधू शकतो. गरज आहे ती फक्त ध्यानातून स्वत:चा शोध घेण्याची.

●●●●●

*वाचा विनोद*

कोंबडीचे पिल्लू कोंबडीला विचारते,

'आई, माणसाच्या बाळाचे जसे नाव ठेवतात; तसे आपल्यात का नाही.'

 कोंबडी म्हणते, 'आपल्यात मेल्यावर ठेवतात. चिकन चिली, चिकन मसाला, चिकन लॉलीपॉप, चिकन तंदूर, चिकन ६५, चिकन सूप, चिकन मंचूरी.'


Tuesday, September 15, 2020

लवकुमार मुळे यांची आयुष्याला भिडणारी कविता

 'कोणत्याही शक्यतेच्या पलिकडे'


कल्पना आणि भावनांची भाषा म्हणजे कविता असे हँझलीट या भाषा विमर्शकाने म्हटले आहे, तर उत्कट भावनेचा उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे काव्य असे वर्डस्वर्थने म्हटले आहे. म्हणजेच कविता ही एकप्रकारे प्रतिमा प्रतिकांची सेंद्रिय रचना असते आणि कवी या रचनेतून आपला भवताल शब्दबद्ध करत असतो. स्वतःला व्यक्त करत असतो. त्याच्या ह्रदयात धगधगणारे रसायन त्याला शब्दांच्या द्वारे तो वाट करून देत असतो.

         लवकुमार मुळे असाच एक भावनाशील व्यक्तित्व लाभलेला कवी. गुलमोहर, भावमुद्रा, काळीजवेणा,अर्धवेलांटी आणि आता कोणत्याही शक्यतेच्या पलिकडे असा कवीचा काव्यप्रवास चालू आहे. गुलमोहर मधल्या काही कविता रोमँटिक वातावरणातल्या होत्या पण आताचा कवितासंग्रह मात्र कवीला वास्तवाचे असणारे भान दर्शवणारा आहे.

       जागृती प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या या काव्यसंग्रहात एकूण छप्पन कविता असून त्यासाठी कवीने मुक्तछंद, ओवी, अभंग ,द्विपदी इ.रचना प्रकार उपयोगात आणले आहेत. कवीची शब्दांवरची हुकूमत आपणाला प्रत्येक कवितेतून जाणवत राहते.लयबद्धता ,अल्पाक्षरत्व, व्यापक जीवनाशय क्षमता ,संवेद्यता, आशय व अभिव्यक्तीतील एकात्मता ही महत्वाची काव्यलक्षणे या कवितांमधून ठळकपणे दिसून येतात.

    "जिंदगानी खपली सारी आयुष्याची पखाली वाहताना"या एकाच ओळीतून आबाचे कष्टमय जीवन कवी शब्दबद्ध करतो. तर अवतीभवती या कवितेतून"ऐसपैस बसून बघ सारी नावे गोंदू

अवतीभवती जमलेले सगळे श्वास बांधू"असा समन्वयवाद मांडतो.

        काही कवितांसाठी कवीने अभंग हा रचना प्रकार निवडला आहे. प्राचीन संत मंडळींनी हा रचना प्रकार अध्यात्म, देव,पारलौकिक जीवन यांच्या प्रकटनासाठी स्विकारला होता. पण कवीने आपल्या परिसरातील कायमच्या दुष्काळाची दाहकता सांगण्यासाठी अचूकपणे वापरला आहे."जगण्याचा गुंता,आटलेले पाणी

झर्यालाच वाणी मुकलेली"अशी साडेतीन चरणी रचना कवी या ठिकाणी करतो व दुष्काळी भागातील पाणीटंचाई झर्याच्या प्रतिकातून मांडतो.

      "कविता"या कवितेत कवीला एक सनातन असा प्रश्न पडला आहे. तो कवितेच्या निर्मितीसंदर्भातला "परिस्थितीच्या बंधातून की खोल वेदनेच्या वावरातून

नक्की कुठून येते कविता...?"

       शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा. बहुसंख्य लोकसंख्या या व्यवसायात आहे पण शेती हा बेभरवशाचा धंदा झाला आहे. जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी हतबल झाला आहे."आयुष्यभर ऐकत आलो सुर-असुरांच्या युद्धकथा

कुणीच ऐकून घेत नाही माझ्या कुणब्यांची व्यथा"ही शेतकरी जीवनाची परवड कवी शब्दबद्ध करतो.

     ..कवी निराशावादी नाही. अंधारबनीस्थितीतही त्याने आशा सोडलेली नाही."गवसेल कधीतरी उजेडाची लख्ख दिशा

बेभान वादळाचे चक्रावर्त भेदतो मी"असा आशावाद कवीच्या मनात टिकून आहे.

      "चिमणीत तेल नाही शोध चालू आहे

अंधारात चोरट्यांचा बोध सुरु आहे"या द्विपदीतून कवी सामाजिक वास्तव उलगडत जातो. कवीचा जीवनप्रवास"चक्रीवादळ कधी त्सुनामी लाट

स्वत्वात हरवलेली प्रत्येक पाऊलवाट..."असा खडतर होत असताना"आयुष्याच्या वळचणीचा सारा पसारा इस्कटलेला

भुईभेगा लिंपताना जीव नुसता मेटाकुटीला..."अशा तर्हेने त्रासलेल्या वेदनेने ग्रासलेल्या जीवनाचा लेखाजोखा कवी आपणासमोर ठेवतो.

         माणूस हा समाजशील व भोवतीच्या परिस्थिती शी समायोजन साधणारा प्राणी आहे. वाळवंट, जंगल, हिमाच्छादित प्रदेश, कुठेही तो वास्तव्य करून राहतो. निसर्गाशी तडजोड करून राहतो. तशाच प्रकारे तो सामाजिक घटकांशीही समरस होतो."कुठे चाललेत हे दिशाहीन पाय

रस्ता संपत नाही अजूनही

व्यवस्थेच्या तिरडीसोबत चालताना"

        काही कवितांतून कवीच्या व्यक्तिगत जीवनाचे चित्रणही आले आहे. प्रेमळ पित्याचे मन "शब्दफुल"या कवितेतून मांडताना कवी लिहून जातो"लहान थोर झाली पोर

आली गौर हळदीला"

     " पिंपळपार व पिंपळछाया "या कवितांमधून निसर्गातल्या अबोल घटकांना ही मुखर केले आहे. गावोगावी असणारी ही झाड -पेडं ,गावगाड्यातील अनेक घटनांची मूक साक्षिदार असतात. श्रांत क्लांत मनाला विसावा देण्याचे काम करत असतात.

       सामान्य माणसाचा संसार हा एकप्रकारचा जीवनसंघर्षच असतो हे कवीने"तुझ्या माझ्या जगण्याचे कसे झाले रणांगण"अशा शब्दांतून सांगितले आहे."जन्म कशासाठी हा विचार हाय बाकी

आयुष्य पेलून सारं आलं आहे नाकी"कविचा परिसर कायमदुष्काळीभाग रानबाभळीचीच झाडं जीथं रूजतात,तग धरून राहतात पण तेथील माणसं मात्र आतून उन्मळून पडलेली असतात. त्या झाडांच्या सावलीतही मनातली तगमग कमी होत नसते तर वाढतच जाते."अशांत सावली, भग्न वाळवंटी

भूत मानगुटी,बसलेले..."

     धर्म, अर्थ, काम, व मोक्ष हे चार पुरुषार्थ मानले गेले आहेत. यातील दोन गोष्टी सामान्यांसाठी आहेत. त्या म्हणजे अर्थार्जन व प्रजोत्पादन. धर्म व मोक्ष या गोष्टी प्रामुख्याने अलौकीकांसाठी आहेत. पण या पूर्ण करताना होणारी स्थिती कवी मांडतो."घर,लग्न, विहीर कसोशीनं केली पार

अजून आली ना आयुष्याला नवी धार"अशी कबुलीच जणू कवी देतो. लौकिक, प्रापंचिक जीवनात जरी कवी उदासीनता दर्शवत असला तरी कवीच्या काव्य लेखनाला मात्र एक वेगळीच धार,एक वेगळीच उंची प्राप्त झाल्याचे चित्र या संग्रहातून दिसून येते. कवीच्या पुढच्या लेखन प्रवासाला शुभेच्छा!

-एकनाथ गायकवाड

जनता विद्यामंदिर, त्रिंबक ता.मालवण जि.सिंधुदुर्ग पीन .416614 मो.नं.9421182337

Monday, September 14, 2020

जत पोलिसांची 150 मोटारसायकल स्वारांवर कारवाई


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)- 

जत शहरात सध्या जनता कर्फ्यू सुरू आहे. शहरातील व्यापारी वर्गाने प्रतिसाद दिल्याने जनता कर्फ्यु गेले चार दिवस यशस्वीरीत्या सुरू आहे. मात्र काही तरुण विनाकारण मोटारसायकलवरून शहरातून फेरफटका मारताना दिसत होते. शेवटी जत पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी या मोटारसायकल स्वारांच्या विरोधात पाऊल उचलले. आज सोमवारी जत पोलिसांकडून 150 च्यावर मोटरसायकल स्वारांच्यावर कारवाई करण्यात आली. 

जत शहरातील मोटर सायकल स्वारांवर कारवाई करण्यासाठी जत पोलीसानी चार पोलिसांचे एक पथक नेमले होते. विजापूर-सातारा रोडवर बसस्थानकाजवळील पेट्रोल पंपासमोर हे पथक थांबले होते. मोटरसायकलवरून जाताना मास्क न बांधणे, तिहेरी सीट बसून जाणे, लहान मूले गाडी चालविणे, लायसन्स नसणे आदी भंगाबद्दल 150 जणांच्यावर कारवाई करण्यात आली. आज दिवसभरात 100 रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई जत पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उत्तम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पोलिसांच्या कारवाईमुळे जत शहरातून समाधान होत आहे.

Tuesday, September 8, 2020

खोजनवाडीतील तरुणांचा शॉक लागून मृत्यू


जत,(प्रतिनिधी)-

 जत तालुक्यातील खोजनवाडी येथील मल्लापा कात्ताप्पा तेली वय (24) या तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 6 च्या दरम्यान घडली.याबाबतची अधिक माहिती अशी की, कात्ताप्पा तेली यांचे खोजनवाडी येथे बिळूर रोडला 9 एकर शेती असून त्यातील अडीच एकरामध्ये द्राक्षेची बाग लावलेली असून कात्ताप्पा यांना दोन मुली व एक मुलगा आहे.मयत मल्लाप्पा हा आपल्या वडिलांबरोबर शेती व्यवसाय करत होता.मंगळवारी सकाळी 6 च्या दरम्यान शेतातील विद्युत मोटार चालू करण्यासाठी गेला असता विजेचा शॉक लागून मल्लाप्पाचा जागीच मृत्यू झाला.मुलगा मल्लाप्पा शेतामधून अजून कसा घरी परत आला नाही हे बघण्यासाठी गेले असता मल्लाप्पा हा मृत अवस्थेत पडल्याचे वडिलांना दिसून आला.वडिलांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.तीन महिन्यांपूर्वी मयत मल्लाप्पाचा साखर पुडा झाला होता.त्याच्या मृत्यूने खोजनवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेची नोंद जत पोलीस ठाण्यात झालेली आहे.

Sunday, September 6, 2020

दि सॅलरी अर्नर्स को ऑप सोसायटीच्या वेबसाईटचे अनावरण


सांगली,(जत न्यूज वृत्तसेवा)-

 दि सॅलरी अर्नर्स को ऑप सोसायटी सांगली या महाराष्ट्रातील अग्रगण्य शतक महोत्सवी संस्थेच्या वेबसाईटचे अनावरण नुकतेच संस्थेच्या सभागृहात राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक जे. के.महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष अभिमन्यू मासाळ, उपाध्यक्ष प्रकाश पाटील व सर्व संचालक  यावेळी उपस्थित होते.

याप्रसंगी अभिमन्यू मासाळ म्हणाले की,माहिती व तंत्रज्ञाच्या या युगात संस्था कोअर बँकिंगच्या माध्यमातून सभासद, ठेवीदार याना अत्याधुनीक बँकिंग सेवा देत आहे. परंतु संस्थेच्या विविध योजनांची, उपक्रमांची तसेच संस्थेच्या कामकाजातील बदलाची माहिती संस्थेने सभासद,ठेवीदार व हितचिंतक यांना मिळावी या उद्देशाने http..//www.sanglisalary.com या नावाने वेबसाईट सुरु केली आहे. जे. के. महाडिक यांना कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी यांचेकडून सामाजिक कार्यात दिलेल्या योगदानाबद्दल मनाची डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक लालासाहेब मोरे, शरद पाटील, रामचंद्र महाडिक, पी. एन. काळे, राजेंद्र कांबळे, मलगोंडा कोरे, शक्ती दबडे, अरुण बावधनकर, अश्विनी कोळेकर, राजू कलंगुटगी, राजेंद्र बेलवकर, नाभिराज सांगले- पाटील, सचिव वसंत खांबे व कर्मचारी उपस्थित होते.

धनगर आरक्षणप्रश्नी जतमध्ये लक्षवेधी आंदोलन होणार


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

 धनगर समाजाच्या अनुसुचित जमाती आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जत येथे 7 सप्टेंबर 2020 रोजी लक्षवेधी आंदोलन केले जाणार असल्याची माहिती धनगर विवेक जागृती अभियानचे संयोजक विक्रम ढोणे यांनी दिली.

राज्यातील ठाकरे सरकार सत्तेवर येत असताना धनगर अरक्षणासंबंधीची ग्वाही देण्यात आली आहे. तत्पुर्वी या सरकारमधील तिन्ही घटक पक्षांनी धनगर आरक्षणाच्या मुद्यावर आवाज उठवला आहे, मात्र सत्तेवर आल्यानंतर अनुषंगिक कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे तातडीने कार्यवाही व्हावी, यासाठी हे आंदोलन केले जाणार आहे. राज्य विधीमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभुमीवर जत तहसिल कार्यालसाबाहेर 7 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता फिजीकल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून हे आंदोलन होणार असल्याचे ढोणे यांनी म्हटले आहे.

आरक्षणासंदर्भात राज्य शासनाने मंत्री समिती स्थापन करावी, तसेच राज्य आणि केंद्र शासनाशी समन्वय करणारी लोकप्रतिनिधी- अधिकाऱ्यांची समन्वय समिती गठित करावी. केंद्र शासनानेही अशीच स्वतंत्र समिती स्थापन करावी, अशी आमची मागणी आहे. त्यादृष्टीकोनातून राज्य सरकारनेही पाठपुरावा करावा, या मागण्या ढोणे यांनी केल्या आहेत.

Saturday, September 5, 2020

बहुजन क्रांती संघाच्या जिल्हाध्यक्षपदी संतोष व्हनकट्टे


जत (जत न्यूज वृत्तसेवा)-

सांगली जिल्हा बहुजन क्रांती संघाच्या  जिल्हाध्यक्षपदी संतोष शिवाजी व्हनकट्टे यांची निवड  झाली आहे. या निवडीचे पत्र बहुजन क्रांती संघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटक  दऱ्याप्पा मनोहर कांबळे यांच्या व जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.

जत तालुक्यातील तिप्पेहळळी येथील श्री. व्हनकट्टे यांना समाज कार्याची आवड असून अनेक समाजोपयोगी कार्यात त्यांचा सहभाग असतो. सांगली जिल्हा बहुजन क्रांती संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी झालेल्या निवडीचे पत्र देण्याच्या कार्यक्रमावेळी  अजिंक्यतारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकर  जाधव, जिल्हा परिषद सदस्या सौ. स्नेहलता प्रभाकर जाधव, जि.प.सदस्य सरदार पाटील, तिप्पेहळ्ळी गावचे लोकनियुक्त सरपंच सौ. मनिषा रविंद्र शिंदे, उपसरपंच सौ. लक्ष्मी शिंदे, विद्यमान ग्रा.पं. सदस्या सौ. शालनताई

सुर्वे, ग्रा.पं. सदस्य विक्रम बाळासो शिंदे, ग्रा.पं. सदस्य पृथ्वीराज शिंदे, माजी सरपंच सतिश चव्हाण, माजी सरपंच प्रतापराव शिंदे, प्रकाश शिवशरण, संभाजी शिवशरण, दिपक शिवशरण,सोने-चांदी व्यापारी रविंद्र मधुकर शिंदे, सुधाकर शिंदे,बबलु शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री सिद्धेश्वर स्वामी यांचा बालगाव येथे महिनाभर चिंतनसोहळा


आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तत्त्ववेत्ते आणि विजापूर येथील ज्ञानयोग मठाचे स्वामी प. पू. सिद्धेश्वर स्वामी हे त्यांच्या साधी राहणी, तसेच आपल्या रसाळ वाणीबद्दल सुप्रसिद्ध आहेत. कधीही कोणताही बडेजाव न मारता आपल्या व्याख्यानातून  समृद्ध आयुष्याची जीवनमूल्ये सांगताना स्वतःही असेच जीवन जगणारे 'बोले तैसा चाले' त्यांची वंदावी पाऊले ' असे व्यक्तिमत्त्व असलेल्या स्वामी सिद्धेश्वर स्वामी यांचा सहवास जतकरांना लाभणार आहे. महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर असलेल्या जत तालुक्यातील बालगाव येथील गुरुदेव आश्रमात महिनाभर ते वास्तव्यास असणार आहेत. प्रवचन होणार नसले तरी चिंतन सोहळा होणार आहे, त्यामुळे परिसरातील त्यांचे निस्सीम चाहते आनंदून गेले आहेत. 


श्री सिद्धेश्वर स्वामी यांचे व्याख्यान ऐकणे ही एक पर्वणीच असते. दैनंदिन जीवन जगताना अध्यात्माची सांगड कशी घालायची याविषयीचे त्यांचे विचार ऐकण्यासाठी भक्त गर्दी करतात.जत सारख्या दुष्काळी भागातील बालगाव येथील गुरुदेव आश्रमात कित्येक वर्षानंतर मुक्कामी येत असल्याने त्यांच्या भक्तांमध्ये उत्साह संचारला आहे. स्वामीजींच्या आगमनानंतर दररोज   महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील असंख्य भक्तगण त्यांचा आशीर्वाद व दर्शन घेण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे दररोज आश्रमात महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण आश्रमाची स्वच्छता,साफसफाई, रंगरंगोटी करून व पेंडॉल मारून सजावट करण्यात आली आहे. आश्रमात दिवाळी-दसऱ्यासारखे उत्साहाचे वातावरण तयार झाले असून महास्वामीजींच्या उपस्थितीने जत तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिकची उंची वाढणार आहे. 

ज्ञानयोगाश्रम विजयपूरचे (विजापूर) ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी यांचे संपूर्ण आयुष्य आधात्म क्षेत्रात गेले आहे. ते अगदी लहानपणीच आपले गुरू वेदांतकेसरी श्री मल्लिकार्जुन महाशिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व धर्मांचा सार प्राशून आध्यात्मिक

प्रवचनात परिपूर्ण बनले. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्यांनी 'सिद्धांत शिखामणी' या ग्रंथावर भाष्य केले. राजाराम कॉलेज, कोल्हापूर येथून एम.ए. (तत्त्वज्ञान) ची पदवी संपादन केलेले सिद्धेश्वर स्वामी अध्यात्मात सखोल तत्त्वचिंतन आचारलेले श्रेष्ठ महानुभावी

आहेत. त्यांचा निरागस स्वभाव, त्यांचे आचार व विचार सामान्य व असामान्यांनाही आकर्षून घेतात. उपनिषदे, भगवद्गीता, पातंजल योगशास्त्र, वचनशास्त्र, श्री अल्लमप्रभूदेव, महात्मा बसवेश्वर, श्री अक्कमहादेवी, श्री सिद्धरामेश्वर यांच्या वचनांवर व इतर विषयांवरही स्वामीं ची प्रवचने झालेली आहेत व होत आहेत.

गहन वेदांत तत्त्वेही सोप्या व सरळ भाषेत पंडित व सामान्य जनांनाही सुलभ आणि सहजरित्या समजेल अशा सुमधुर वाणीत प्रभावीपणे विवरण्याची त्यांना लाभलेली कला ही भगवंताची देणगीच आहे. महाशिवयोगी श्री अल्लमप्रभूदेव यांच्या समग्र वचनावर त्यांनी भाष्य लिहिले असून, 'श्री स्वामींनी कन्नड, संस्कृत, इंग्रजी, मराठी, हिंदी भाषेत पांडित्य संपादून अनेक उत्कृष्ट ग्रंथांची निर्मिती केली आहे. परदेशात त्यांची विपुल प्रवचने झालेली आहेत व होत आहेत. अशी ही महान विभूती जत सारख्या दुष्काळी भागात असलेल्या गुरुदेव आश्रमात वास्तव्यास येणार आहे.

सांगली जिल्ह्यातील बालगाव (ता.जत) येथील गुरुदेव आश्रम अलीकडच्या काळात योग विक्रमामुळे प्रसिद्धीस आले असले तरी इथे सातत्याने धार्मिक आणि योग प्रसाराचे कार्यक्रम होत असतात. मागे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बालगाव (ता. जत) येथे पार पडलेल्या योगशिबिरात एकाचवेळी १ लाख १0 हजार लोकांनी सूर्यनमस्कार घालून यापूर्वीचा विश्वविक्रम मोडीत काढला होता. सांगली जिल्हा प्रशासन व गुरुदेव आश्रमची नोंद यानिमित्ताने एशियन बुक ऑफ रेकॉर्डसह,मार्व्हल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड अशा तीन संस्थांचे  विश्वविक्रम नोंदविणाऱ्या तीन संस्थांकडे झाली आहे. त्याबाबतचे प्रमाणपत्रही बालगाव येथे वितरीत करण्यात आले होते. अशा आश्रमात श्री सिद्धेश्वर स्वामी महिन्याभर वास्तव्यास असणार आहेत.  त्यामुळे भक्त, शेतकरी, तरुणांनी व महिला वर्गांनी दररोज होणाऱ्या चिंतन व  आध्यात्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन  योगाचार्य डॉ  अमृतानंद स्वामीजींनी केले आहे.Friday, September 4, 2020

जत तालुक्यातील धरेप्पा कट्टीमनी, उद्धव शिंदे आणि संजय लोहार यांना जिल्हा परिषदेचा शिक्षक पुरस्कार जाहीर


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

सांगली जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या आदर्श व गुणवंत शिक्षकांचे पुरस्कार जाहीर झाले असून जत तालुक्यातील तिघांना हा पुरस्कार मिळाला आहे. जत तालुक्यातील उमराणी येथील कन्नड शाळेतील शिक्षक धरेप्पा मारुती कट्टीमनी, शेगाव शाळेतील उध्दव राजाराम शिंदे आणि जिरग्याळ शाळेतील संजय शामराव लोहार यांना आदर्श व गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत.

सांगली  जिल्हा परिषदेचे सन 2020 सालातील 

जिल्हा शिक्षक पुरस्कार खालीलप्रमाणे:1.श्रीम. मंदाकिनी प्रकाश मोरे (जि. प. शाळा. चिंचोली ता.शिराळा),2. सुरज मन्सुर तांबोळी (जि. प. शाळा, गोडवाडी ता. वाळवा),3. प्रकाश भिमाण्णा कलादगी (जि. प. शाळा विजयनगर -म्हैसाळ ता. मिरज),4. सौ. वैशाली राजेश पाटील ( जि. प. शाजा. बालगवडे ता. तासगांव), 5.अमोल विलास साळुखे (जि. प. शाळा, कुंडल ता पलुस),6.आप्पासाहेब तातोया जाधव (जि. प. शाळा, हणमंतवाडी ता. कडेगांव)7. प्रकाश शिवाजीराव चव्हाण जि. प. शाजा. गोरवाडी ता. खानापूर),8.हैबतराव जयवंत पावणे,शाळा गळवेवाडी आटपाडी), 9.संदिप सिताराम माने (जि.प.शाळा, करंजाडी ता.क.महांकाळ)10. धरेप्पा मारुती कट्टीमनी (जि. प. शाळा. उमराणी-कन्नड ता. जत),10. उध्दव राजाराम शिंदे (जि. प. शाळा. शेगांव ता.जत)

गुणवंत शिक्षक पुरस्कार खालीलप्रमाणे:

 1.रमण दगडू खबाले (जि. प. शाळा. मगदुर ता.शिराळा),2. श्रीम. आयेशा इकबाल नदाफ (जि. प. शाळा,तूजारपुर ता वाळवा),3.सचिन विश्वनाथ पाटील (जि.प.शाळा.सोनी ता. मिरज),4. सतिश रामचंद्र नलवडे (जि. प. शाळा. वैभवनगर ता. पलुस),5. रघुनाथ किसन जगदाळे (जि. प. शाळा. हिंगणगांव बु. ता. कडेगांव),6. नारायण तुकाराम पवार (जि. प. शाळा. रायेवाडी. ता. क. महाकाल), 7. संजय शामराव लोहार (जि. प. शाळा, जिरग्याळ ता.जत)

उर्दू शिक्षक पुरस्कार

1.श्रीम. रेहाना मोहंदरपिक मुजावर जि. प. शाळा, कुपवाड ता. मिरज)


जत शहरातील आशा वर्कर्सना कोरोना कामाचा प्रोत्साहन भत्ता द्या-हणमंत कोळी


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

 लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनेच्यावतीने उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटे यांना जत शहरातील आशा वर्कर्स यांना कोरोनाच्या कामाचा प्रोत्साहन भत्ता नगरपरिषदेकडून मिळावा, यासंदर्भात कॉ. हणमंत कोळी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.

जगभर कोरोना संसर्गामुळे हाहाकार माजला आहे. देशात आणि महाराष्ट्रातदेखील कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. कोरोना काळात सर्व प्रथम  आपल्या जीवाची पर्वा  न करता काम करणाऱ्या आशा वर्कर्स यांची कामगिरी कौतुकास्पद आहे. महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील  आशा वर्कर्स यांना ग्रामपंचायत स्तरावरून कोरोनाच्या कामासाठी विशेष   प्रोत्साहन भत्ता म्हणून एक हजार रुपये देऊ केले आहे व ते कोरोना जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांना तो प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. तसेच इतर ठिकाणीही म्हणजे महापालिका, नगरपालिकामध्ये आशा वर्कर्स यांना त्यांच्या सेस फंडातून प्रोत्साहन भत्ता देऊ केला आहे. आपल्या जत नगरपरिषदअंतर्गत 33 आशा वर्कर्स काम करत आहेत. या आशा वर्कर्स शासनाकडून मिळणाऱ्या  तटपुंज्या मानधनावर काम करत आहे, तरी जत नगरपरिषदनेही आपल्या सेस फंडातून आशा वर्कर्स यांना एप्रिल पासून प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा व जोपर्यंत कोरोना आहे तोपर्यंत प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा. यासंदर्भात वेळोवेळी जत नगरपरिषदेला भेटून निवेदन दिले आहे. मात्र ते म्हणतात की आम्हाला प्रोत्साहन भत्ता देण्यासंदर्भात पत्र नाही. आम्हाला जिल्हाधिकारी किंवा प्रात अधिकाऱ्याकडून लेखी पत्र आल्या शिवाय आम्ही भत्ता देऊ शकत नाही असे ससांगितले आहे. तरी प्रांतअधिकारी यांनी यात स्वतः लक्ष्य घालून आशा वर्कर्स यांच्या प्रोत्साहन भत्ताच्या प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली आहे. 

यावेळी ललिता सांवत,राजश्री कोळी,लता मदने, अर्चना काळे, रुकसाना मुजावर, विद्या साळे इ. आशा वर्कर्स उपस्थित होते.

डफळापूर येथे सफाई कामगार,आशा वर्कर्स, महावितरण कर्मचारी यांची आरोग्य तपासणी

कु.उत्कर्षा हणमंत कोळी हिच्या वाढदिवसानिमित्त आयोजन


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

जत तालुक्यातील डफळापूर येथील धडाडीचे युवक कॉम्रेड हणमंत कोळी यांची कन्या कु.उत्कर्षा हणमंत कोळी हिच्या वाढदिवसानिमित्त कोरोना महामारीमध्ये अहोरात्र कार्यरत असणाऱ्या आशा वर्कर्स, महावितरण कर्मचारी आणि ग्रामपंचायत सफाई कर्मचारी यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्राजक्ता फौंडेशन व जत येथील हिराई मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमाने डफळापूर येथील सवदे बंधू हॉल येथे आरोग्य शिबीर मोठ्या उत्साहात पार पडले.

यावेळी जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उत्तम जाधव, कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी, डॉ.सुदर्शन घेरडे, सांगली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य अभिजीत चव्हाण, जत पंचायत  समितीचे सदस्य दिग्विजय चव्हाण, डॉ.राजेंद्र झारे, डॉ.विनोद माळी, डॉ.गुरूशांत माळी व सर्व कर्मचारी, सवदे उद्योग समुहाचे मालक अशोक सवदे, कॉ.मिना कोळी, सरिता पवार, ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर शिंगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विकास शिंदे, आणि सर्व पत्रकार, आशा वर्कर्स, महावितरण कर्मचारी व ग्रामपंचायत सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गौस मकानदार, अमिर नदाफ,अतुल शिंदे, विशाल शिंदे, दिपक कांबळे नितिन पाटील, अशोक स्वामी, शरद सकट,वृषभ कोळी आदींनी आरोग्य शिबिराचे योग्य नियोजन केले. 

Wednesday, September 2, 2020

मुचंडी येथे आमदार सावंत यांच्याहस्ते व्यायाम शाळेचे उदघाटन

मुचंडी-शेडयाळ रस्त्याच्या खडीकरण,मुरुमीकरणचे भूमिपूजन


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

जत तालुक्यातील मुचंडी येथे 25/15 या योजनेतून मुचंडी ते शेडयाळ रस्त्याच्या खडीकरण आणि मुरुमीकरण या कामाचे भूमिपूजन आमदार विक्रम सावंत यांच्याहस्ते करण्यात आले. त्याचबरोबर गावात बांधण्यात आलेल्या व्यायाम शाळेचे उदघाटनही आमदार सावंत यांच्याहस्ते करण्यात आले.

जत तालुक्यातील मुचंडी येथे झालेल्या या कार्यक्रमांना जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष अप्पाराया बिराजदार, माजी पं.स.सभापती बाबासाहेब कोडग, सरपंच अशोक पाटील,ग्रा प.सदस्य श्री. बिराजदार, संजय मलमे, रमेश कोळूर,संजय कुमार बिराजदार, अण्णापा जालिहाल,शंकर शिंदे,बबन शिंदे,व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार विक्रम सावंत यांच्या पाठपुराव्याने म्हैसाळ योजनेच्या कामास गती-डॉ. प्रदीप कोडग


जत, (जत न्यूज वृत्तसेवा)-

जत तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे काम रेंगाळले आहे, त्यामुळे जत तालुक्यात सोडलेल्या कृष्णा नदीचे पाणी मिळण्यास पश्चिम भागाला अडचणीचे ठरत आहे. मात्र आमदार विक्रम सावंत यांनी पाठपुरावा केल्याने योजनेच्या पाईपलाईनच्या कामास गती आली आहे, अशी माहिती डॉ. प्रदिप कोडग यांनी दिली आहे. म्हैसाळ योजनेचे पाणी सध्या दुष्काळी जत तालुक्यात सुरु असुन पाईपलाईनच्या अपुऱ्या कामामुळे अजुन मोकाशेवाडी, सिंगनहळ्ळी, आवंढी व लोहगाव या गावांना पाणी जाऊ शकत नाही त्यातच यंदा या परिसरात पावसाचे प्रमाणही कमी आहे.  सध्या अजुबाजुच्या गावात चांगल्या पावसाबरोबरच म्हैसाळ योजनेचे पाणीही सुरु आहे. त्यामुळे पाईपलाईनचे काम पूर्ण होऊनही जाँईट करणे व व्हाँल्व बसविणे या कामाचे वेल्डिंग करण्याचे काम सुरु असल्याने पाणी सोडण्यास विलंब होत आहे, आमदार विक्रम सावंत यांनी संबंधीत अधिकारी, काँन्ट्रँक्टर, यांच्याशी वारंवार चर्चा करुन कामास गती देण्याचे काम केल्याचे यावेळी माजी उपसरपंच डॉ. प्रदिप कोडग यांनी यावेळी सांगितले, यावेळी सांगली जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस दिनेशभाऊ सोळगे म्हणाले कि, सध्या तालुक्यात पाणी सुरु असुन हे पाणी बंद होण्याच्या आगोदर वेल्डिंगचे काम पूर्ण करुन आवंढी व परिसरातील गावांना लवकरात लवकर पाणी सोडण्याचे पुण्यकाम ठेकेदाराने करावे, यावेळी आवंढी ग्रामस्थांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देऊन कामाच्या प्रगतीबाबत कामगारांशी चर्चा केली,यावेळी शिवाजी कोडग शेठ, सुरेश कोडग,सतिश कोडग, नितिन कोडग, सचिन कोडग,संजय कोडग,सुभाष कोडग,श्रीकांत कोडग, आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

Tuesday, September 1, 2020

येळवी येथे पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा लोकार्पण सोहळा


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

जत तालुक्यातील येळवी ग्रामपंचायतीच्यावतीने 14 वित्त आयोगातून पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा लोकार्पण सोहळा तसेच पेव्हींग ब्लाॅकच्या कामाचे उदघाटन  जत तालुक्याचे आमदार विक्रम (दादा) सावंत यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी परिवर्तन पॅनलचे प्रमुख पंचाक्षरी अंकलगी येळवीचे सरपंच विजयकुमार पोरे,माजी सरपंच दादासाहेब माने, जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आप्पाराया बिराजदार, माजी सभापती बाबासाहेब कोडग, उपसरपंच सुनील अंकलगी,ओंकार स्वरूपा फौंडेशन संस्थेचे अध्यक्ष दिपक अंकलगी,  ग्रामपंचायत सदस्य  संतोष पाटील, सोसायटीचे सदस्य शंकर  आवटे, संतोष स्वामी, नवनाथ पवार, तुकाराम सुतार आदींच्या उपस्थितीत पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा लोकार्पण सोहळा व पेविंग ब्लॉकचे उदघाटन  संपन्न झाले. या पिण्याच्या पाण्याच्या टाकीमुळे येळवी गावांमध्ये पाण्याची सोय 24 तास पाणी उपलब्ध झाली आहे.  तसेच रस्त्याचे काम केल्याने जनतेतून समाधान व्यक्त होत आहे. 

यावेळी बोलताना आमदार श्री. सावंत यांनी येळवी सोसायटीच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. सोसायटीच्या अधिकाऱ्यांना फटकारत येणाऱ्या पुढील काळात शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा व्यवस्थितरीत्या करण्यात यावा, असा आदेश दिला. 

उमदीमार्गे जाणाऱ्या अहमदनगर-विजयपूर राष्ट्रीय मार्गाचे काम सुरू करा-विलासराव जगताप


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

जत तालुक्यातील उमदीमधून जाणारा तसेच करमाळा, टेंभुर्णी, पंढरपूर, मंगळवेढा मार्गे जाणारा अहमदनगर- विजयपूर या राष्ट्रीय महामार्गाचे उर्वरित काम तातडीने सुरू करण्याची मागणी जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे. 

अहमदनगर-विजयपूर राष्ट्रीय मार्ग ( क्र. 561 A )हा 298 कि. मी. चा असुन त्याचे काम बहुतांशी पुर्ण झाले आहे. त्यापैकी महाराष्ट्र हद्दीमधील उमदी ते को. बोबलाद हा 36 कि. मी. व कर्नाटातील राज्यातील सिध्दापूर ते विजयपूर हा 18 कि. मी. असा एकुण 54 कि. मी. मार्ग अद्याप करण्याचा बाकी आहे. सदरचा महामार्ग हा अहमदनगर व विजयपूर या दोन ऐतिहासिक स्थळांना जोडला जाणार आहे. सध्या फक्त 54 कि. मी. रस्ताच बाकी राहीलेला आहे. उर्वरित मार्गाचे काम झालेले आहे. तो लवकरात लवकर व्हावा अशी सर्वांचीच मागणी आहे. तसेच विजयपूर येथे इंटरनॅशनल एअर पोर्टचेही काम सुरु आहे. त्यामुळे सदरच्या  रस्ताचे महत्व आपोआप वाढणार आहे. त्यामुळे राहीलेल्या 54 कि. मी. रस्त्याचे काम डीपीआरसह त्वरीत मंजुर करुन हा उर्वरित रस्ता सिमेंट काँक्रीटचा करावा, अशी मागणी  माजी आमदार विलासराव नारायण जगताप यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे  केली आहे.