Tuesday, September 15, 2020

लवकुमार मुळे यांची आयुष्याला भिडणारी कविता

 'कोणत्याही शक्यतेच्या पलिकडे'


कल्पना आणि भावनांची भाषा म्हणजे कविता असे हँझलीट या भाषा विमर्शकाने म्हटले आहे, तर उत्कट भावनेचा उत्स्फूर्त आविष्कार म्हणजे काव्य असे वर्डस्वर्थने म्हटले आहे. म्हणजेच कविता ही एकप्रकारे प्रतिमा प्रतिकांची सेंद्रिय रचना असते आणि कवी या रचनेतून आपला भवताल शब्दबद्ध करत असतो. स्वतःला व्यक्त करत असतो. त्याच्या ह्रदयात धगधगणारे रसायन त्याला शब्दांच्या द्वारे तो वाट करून देत असतो.

         लवकुमार मुळे असाच एक भावनाशील व्यक्तित्व लाभलेला कवी. गुलमोहर, भावमुद्रा, काळीजवेणा,अर्धवेलांटी आणि आता कोणत्याही शक्यतेच्या पलिकडे असा कवीचा काव्यप्रवास चालू आहे. गुलमोहर मधल्या काही कविता रोमँटिक वातावरणातल्या होत्या पण आताचा कवितासंग्रह मात्र कवीला वास्तवाचे असणारे भान दर्शवणारा आहे.

       जागृती प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या या काव्यसंग्रहात एकूण छप्पन कविता असून त्यासाठी कवीने मुक्तछंद, ओवी, अभंग ,द्विपदी इ.रचना प्रकार उपयोगात आणले आहेत. कवीची शब्दांवरची हुकूमत आपणाला प्रत्येक कवितेतून जाणवत राहते.लयबद्धता ,अल्पाक्षरत्व, व्यापक जीवनाशय क्षमता ,संवेद्यता, आशय व अभिव्यक्तीतील एकात्मता ही महत्वाची काव्यलक्षणे या कवितांमधून ठळकपणे दिसून येतात.

    "जिंदगानी खपली सारी आयुष्याची पखाली वाहताना"या एकाच ओळीतून आबाचे कष्टमय जीवन कवी शब्दबद्ध करतो. तर अवतीभवती या कवितेतून"ऐसपैस बसून बघ सारी नावे गोंदू

अवतीभवती जमलेले सगळे श्वास बांधू"असा समन्वयवाद मांडतो.

        काही कवितांसाठी कवीने अभंग हा रचना प्रकार निवडला आहे. प्राचीन संत मंडळींनी हा रचना प्रकार अध्यात्म, देव,पारलौकिक जीवन यांच्या प्रकटनासाठी स्विकारला होता. पण कवीने आपल्या परिसरातील कायमच्या दुष्काळाची दाहकता सांगण्यासाठी अचूकपणे वापरला आहे."जगण्याचा गुंता,आटलेले पाणी

झर्यालाच वाणी मुकलेली"अशी साडेतीन चरणी रचना कवी या ठिकाणी करतो व दुष्काळी भागातील पाणीटंचाई झर्याच्या प्रतिकातून मांडतो.

      "कविता"या कवितेत कवीला एक सनातन असा प्रश्न पडला आहे. तो कवितेच्या निर्मितीसंदर्भातला "परिस्थितीच्या बंधातून की खोल वेदनेच्या वावरातून

नक्की कुठून येते कविता...?"

       शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा. बहुसंख्य लोकसंख्या या व्यवसायात आहे पण शेती हा बेभरवशाचा धंदा झाला आहे. जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी हतबल झाला आहे."आयुष्यभर ऐकत आलो सुर-असुरांच्या युद्धकथा

कुणीच ऐकून घेत नाही माझ्या कुणब्यांची व्यथा"ही शेतकरी जीवनाची परवड कवी शब्दबद्ध करतो.

     ..कवी निराशावादी नाही. अंधारबनीस्थितीतही त्याने आशा सोडलेली नाही."गवसेल कधीतरी उजेडाची लख्ख दिशा

बेभान वादळाचे चक्रावर्त भेदतो मी"असा आशावाद कवीच्या मनात टिकून आहे.

      "चिमणीत तेल नाही शोध चालू आहे

अंधारात चोरट्यांचा बोध सुरु आहे"या द्विपदीतून कवी सामाजिक वास्तव उलगडत जातो. कवीचा जीवनप्रवास"चक्रीवादळ कधी त्सुनामी लाट

स्वत्वात हरवलेली प्रत्येक पाऊलवाट..."असा खडतर होत असताना"आयुष्याच्या वळचणीचा सारा पसारा इस्कटलेला

भुईभेगा लिंपताना जीव नुसता मेटाकुटीला..."अशा तर्हेने त्रासलेल्या वेदनेने ग्रासलेल्या जीवनाचा लेखाजोखा कवी आपणासमोर ठेवतो.

         माणूस हा समाजशील व भोवतीच्या परिस्थिती शी समायोजन साधणारा प्राणी आहे. वाळवंट, जंगल, हिमाच्छादित प्रदेश, कुठेही तो वास्तव्य करून राहतो. निसर्गाशी तडजोड करून राहतो. तशाच प्रकारे तो सामाजिक घटकांशीही समरस होतो."कुठे चाललेत हे दिशाहीन पाय

रस्ता संपत नाही अजूनही

व्यवस्थेच्या तिरडीसोबत चालताना"

        काही कवितांतून कवीच्या व्यक्तिगत जीवनाचे चित्रणही आले आहे. प्रेमळ पित्याचे मन "शब्दफुल"या कवितेतून मांडताना कवी लिहून जातो"लहान थोर झाली पोर

आली गौर हळदीला"

     " पिंपळपार व पिंपळछाया "या कवितांमधून निसर्गातल्या अबोल घटकांना ही मुखर केले आहे. गावोगावी असणारी ही झाड -पेडं ,गावगाड्यातील अनेक घटनांची मूक साक्षिदार असतात. श्रांत क्लांत मनाला विसावा देण्याचे काम करत असतात.

       सामान्य माणसाचा संसार हा एकप्रकारचा जीवनसंघर्षच असतो हे कवीने"तुझ्या माझ्या जगण्याचे कसे झाले रणांगण"अशा शब्दांतून सांगितले आहे."जन्म कशासाठी हा विचार हाय बाकी

आयुष्य पेलून सारं आलं आहे नाकी"कविचा परिसर कायमदुष्काळीभाग रानबाभळीचीच झाडं जीथं रूजतात,तग धरून राहतात पण तेथील माणसं मात्र आतून उन्मळून पडलेली असतात. त्या झाडांच्या सावलीतही मनातली तगमग कमी होत नसते तर वाढतच जाते."अशांत सावली, भग्न वाळवंटी

भूत मानगुटी,बसलेले..."

     धर्म, अर्थ, काम, व मोक्ष हे चार पुरुषार्थ मानले गेले आहेत. यातील दोन गोष्टी सामान्यांसाठी आहेत. त्या म्हणजे अर्थार्जन व प्रजोत्पादन. धर्म व मोक्ष या गोष्टी प्रामुख्याने अलौकीकांसाठी आहेत. पण या पूर्ण करताना होणारी स्थिती कवी मांडतो."घर,लग्न, विहीर कसोशीनं केली पार

अजून आली ना आयुष्याला नवी धार"अशी कबुलीच जणू कवी देतो. लौकिक, प्रापंचिक जीवनात जरी कवी उदासीनता दर्शवत असला तरी कवीच्या काव्य लेखनाला मात्र एक वेगळीच धार,एक वेगळीच उंची प्राप्त झाल्याचे चित्र या संग्रहातून दिसून येते. कवीच्या पुढच्या लेखन प्रवासाला शुभेच्छा!

-एकनाथ गायकवाड

जनता विद्यामंदिर, त्रिंबक ता.मालवण जि.सिंधुदुर्ग पीन .416614 मो.नं.9421182337

No comments:

Post a Comment