Friday, September 4, 2020

जत शहरातील आशा वर्कर्सना कोरोना कामाचा प्रोत्साहन भत्ता द्या-हणमंत कोळी


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

 लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनेच्यावतीने उपविभागीय अधिकारी प्रशांत आवटे यांना जत शहरातील आशा वर्कर्स यांना कोरोनाच्या कामाचा प्रोत्साहन भत्ता नगरपरिषदेकडून मिळावा, यासंदर्भात कॉ. हणमंत कोळी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.

जगभर कोरोना संसर्गामुळे हाहाकार माजला आहे. देशात आणि महाराष्ट्रातदेखील कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत. कोरोना काळात सर्व प्रथम  आपल्या जीवाची पर्वा  न करता काम करणाऱ्या आशा वर्कर्स यांची कामगिरी कौतुकास्पद आहे. महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील  आशा वर्कर्स यांना ग्रामपंचायत स्तरावरून कोरोनाच्या कामासाठी विशेष   प्रोत्साहन भत्ता म्हणून एक हजार रुपये देऊ केले आहे व ते कोरोना जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांना तो प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. तसेच इतर ठिकाणीही म्हणजे महापालिका, नगरपालिकामध्ये आशा वर्कर्स यांना त्यांच्या सेस फंडातून प्रोत्साहन भत्ता देऊ केला आहे. आपल्या जत नगरपरिषदअंतर्गत 33 आशा वर्कर्स काम करत आहेत. या आशा वर्कर्स शासनाकडून मिळणाऱ्या  तटपुंज्या मानधनावर काम करत आहे, तरी जत नगरपरिषदनेही आपल्या सेस फंडातून आशा वर्कर्स यांना एप्रिल पासून प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा व जोपर्यंत कोरोना आहे तोपर्यंत प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा. यासंदर्भात वेळोवेळी जत नगरपरिषदेला भेटून निवेदन दिले आहे. मात्र ते म्हणतात की आम्हाला प्रोत्साहन भत्ता देण्यासंदर्भात पत्र नाही. आम्हाला जिल्हाधिकारी किंवा प्रात अधिकाऱ्याकडून लेखी पत्र आल्या शिवाय आम्ही भत्ता देऊ शकत नाही असे ससांगितले आहे. तरी प्रांतअधिकारी यांनी यात स्वतः लक्ष्य घालून आशा वर्कर्स यांच्या प्रोत्साहन भत्ताच्या प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली आहे. 

यावेळी ललिता सांवत,राजश्री कोळी,लता मदने, अर्चना काळे, रुकसाना मुजावर, विद्या साळे इ. आशा वर्कर्स उपस्थित होते.

No comments:

Post a Comment