Saturday, September 5, 2020

श्री सिद्धेश्वर स्वामी यांचा बालगाव येथे महिनाभर चिंतनसोहळा


आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तत्त्ववेत्ते आणि विजापूर येथील ज्ञानयोग मठाचे स्वामी प. पू. सिद्धेश्वर स्वामी हे त्यांच्या साधी राहणी, तसेच आपल्या रसाळ वाणीबद्दल सुप्रसिद्ध आहेत. कधीही कोणताही बडेजाव न मारता आपल्या व्याख्यानातून  समृद्ध आयुष्याची जीवनमूल्ये सांगताना स्वतःही असेच जीवन जगणारे 'बोले तैसा चाले' त्यांची वंदावी पाऊले ' असे व्यक्तिमत्त्व असलेल्या स्वामी सिद्धेश्वर स्वामी यांचा सहवास जतकरांना लाभणार आहे. महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर असलेल्या जत तालुक्यातील बालगाव येथील गुरुदेव आश्रमात महिनाभर ते वास्तव्यास असणार आहेत. प्रवचन होणार नसले तरी चिंतन सोहळा होणार आहे, त्यामुळे परिसरातील त्यांचे निस्सीम चाहते आनंदून गेले आहेत. 


श्री सिद्धेश्वर स्वामी यांचे व्याख्यान ऐकणे ही एक पर्वणीच असते. दैनंदिन जीवन जगताना अध्यात्माची सांगड कशी घालायची याविषयीचे त्यांचे विचार ऐकण्यासाठी भक्त गर्दी करतात.जत सारख्या दुष्काळी भागातील बालगाव येथील गुरुदेव आश्रमात कित्येक वर्षानंतर मुक्कामी येत असल्याने त्यांच्या भक्तांमध्ये उत्साह संचारला आहे. स्वामीजींच्या आगमनानंतर दररोज   महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील असंख्य भक्तगण त्यांचा आशीर्वाद व दर्शन घेण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे दररोज आश्रमात महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण आश्रमाची स्वच्छता,साफसफाई, रंगरंगोटी करून व पेंडॉल मारून सजावट करण्यात आली आहे. आश्रमात दिवाळी-दसऱ्यासारखे उत्साहाचे वातावरण तयार झाले असून महास्वामीजींच्या उपस्थितीने जत तालुक्यातील सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिकची उंची वाढणार आहे. 

ज्ञानयोगाश्रम विजयपूरचे (विजापूर) ज्ञानयोगी श्री सिद्धेश्वर स्वामीजी यांचे संपूर्ण आयुष्य आधात्म क्षेत्रात गेले आहे. ते अगदी लहानपणीच आपले गुरू वेदांतकेसरी श्री मल्लिकार्जुन महाशिवयोगी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व धर्मांचा सार प्राशून आध्यात्मिक

प्रवचनात परिपूर्ण बनले. वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्यांनी 'सिद्धांत शिखामणी' या ग्रंथावर भाष्य केले. राजाराम कॉलेज, कोल्हापूर येथून एम.ए. (तत्त्वज्ञान) ची पदवी संपादन केलेले सिद्धेश्वर स्वामी अध्यात्मात सखोल तत्त्वचिंतन आचारलेले श्रेष्ठ महानुभावी

आहेत. त्यांचा निरागस स्वभाव, त्यांचे आचार व विचार सामान्य व असामान्यांनाही आकर्षून घेतात. उपनिषदे, भगवद्गीता, पातंजल योगशास्त्र, वचनशास्त्र, श्री अल्लमप्रभूदेव, महात्मा बसवेश्वर, श्री अक्कमहादेवी, श्री सिद्धरामेश्वर यांच्या वचनांवर व इतर विषयांवरही स्वामीं ची प्रवचने झालेली आहेत व होत आहेत.

गहन वेदांत तत्त्वेही सोप्या व सरळ भाषेत पंडित व सामान्य जनांनाही सुलभ आणि सहजरित्या समजेल अशा सुमधुर वाणीत प्रभावीपणे विवरण्याची त्यांना लाभलेली कला ही भगवंताची देणगीच आहे. महाशिवयोगी श्री अल्लमप्रभूदेव यांच्या समग्र वचनावर त्यांनी भाष्य लिहिले असून, 'श्री स्वामींनी कन्नड, संस्कृत, इंग्रजी, मराठी, हिंदी भाषेत पांडित्य संपादून अनेक उत्कृष्ट ग्रंथांची निर्मिती केली आहे. परदेशात त्यांची विपुल प्रवचने झालेली आहेत व होत आहेत. अशी ही महान विभूती जत सारख्या दुष्काळी भागात असलेल्या गुरुदेव आश्रमात वास्तव्यास येणार आहे.

सांगली जिल्ह्यातील बालगाव (ता.जत) येथील गुरुदेव आश्रम अलीकडच्या काळात योग विक्रमामुळे प्रसिद्धीस आले असले तरी इथे सातत्याने धार्मिक आणि योग प्रसाराचे कार्यक्रम होत असतात. मागे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बालगाव (ता. जत) येथे पार पडलेल्या योगशिबिरात एकाचवेळी १ लाख १0 हजार लोकांनी सूर्यनमस्कार घालून यापूर्वीचा विश्वविक्रम मोडीत काढला होता. सांगली जिल्हा प्रशासन व गुरुदेव आश्रमची नोंद यानिमित्ताने एशियन बुक ऑफ रेकॉर्डसह,मार्व्हल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड अशा तीन संस्थांचे  विश्वविक्रम नोंदविणाऱ्या तीन संस्थांकडे झाली आहे. त्याबाबतचे प्रमाणपत्रही बालगाव येथे वितरीत करण्यात आले होते. अशा आश्रमात श्री सिद्धेश्वर स्वामी महिन्याभर वास्तव्यास असणार आहेत.  त्यामुळे भक्त, शेतकरी, तरुणांनी व महिला वर्गांनी दररोज होणाऱ्या चिंतन व  आध्यात्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन  योगाचार्य डॉ  अमृतानंद स्वामीजींनी केले आहे.No comments:

Post a Comment