Saturday, September 26, 2020

'जत' दुष्काळी तालुका हा 'कलंक' पुसून टाकणार: आ. सावंत


जत, (जत न्यूज वृत्तसेवा)-

जत तालुक्याचा दुष्काळी कलंक पुसून टाकण्यासाठी येत्या चार वर्षात पाणी, रस्ते या दोन गरजांच्या कामावर भर देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती आमदार विक्रम सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

जत तालुक्यात पावसाचे प्रमाण कायमच कमी असल्याने म्हैसाळ योजनेतून तलाव भरून देण्याची मागणी वारंवार शासनाकडे केली होती. त्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील व कृषीराज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. म्हैसाळ योजना १७ ऑगस्टला सुरू झाली.योजनेतून तलाव भरले. यासाठी मुख्यमंत्री,पालकमंत्री जयंत पाटील यांचे आभार.मात्र पूर्व भागातील अद्यापही ६७ गावे वंचीत आहेत. या गावांना तुबची-बबलेश्वर योजनेचे पाणी सहजपणे मिळू शकते.सध्या हे पाणी तिकोंडी तलाव व हळ्ळी पर्यंत आले आहे. तुबची-बबलेश्वर योजनेतून जतच्या पूर्व भागातील वंचीत ६७ गावासाठी अत्यंत उपयुक्त अशी योजना आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी कर्नाटक राज्याचे माजी जलसंपदा मंत्री एम.बी.पाटील यांच्या प्रयत्नामुळे व मानवतेच्या दृष्टीकोनातून योजनेतून पाणी मिळाले होते.यावेळी सुद्धा तुबची-बबलेश्वर योजनेचे पाणी जालेगिरी फाट्यापासून तिकोंडी तलावात आले आहे.तिकोंडी तलाव ओहरफ्लो होऊन भिवर्गी तलावात सोडले आहे.पुढे करजगी,बोर्गी,बेळोंडगी, बालगांव, हळ्ळी, सुसलाद, सोनलगी या भागात पाणी  पोहचू शकते. सध्या हळ्ळीपर्यंत पाणी पोहचले आहे.महाराष्ट्र शासनाच्यावतीने कर्नाटक राज्याकडे दोन टीएमसी इतक्या पाण्याची मागणी वारंवार केली आहे.तसेच नगरपरिषेदेची प्रशासकीय इमारतीचे काम टेंडर प्रोसेस मध्ये आहे.युवकांच्या हाताला उद्योग धंद्याच्या माध्यमातून राष्ट्रीयकृत  बँकांनी कर्जपुरवठा करावा अशा सूचना केल्या आहेत.सर्वांच्या सहकार्याने जत तालुक्यावर पडलेला दुष्काळाचा कलंक पुसण्याचा प्रयत्न करणार असल्याचे शेवटी आमदार सावंत म्हणाले.

No comments:

Post a Comment