Thursday, October 29, 2020

29 ऑक्टोबर 2020 चा शासन निर्णय तातडीने मागे घ्या आमदार कपिल पाटील व शिक्षक भारतीची मागणी


मुंबई,(जत न्यूज वृत्तसेवा)-

राज्यातील शाळांमध्ये 50 टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहण्याबाबत मार्गदर्शक सुचना देणारा दि. 29 ऑक्टोबर 2020 चा शासन निर्णय संदिग्ध व अनाकलनीय आहे. राज्यातील शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था दि. 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत विद्यार्थ्यांसाठी व नियमित वर्ग घेण्यासाठी बंद राहतील अशा सूचना शासन निर्णयात दिलेल्या असून 1 नोव्हेंबर पासून शाळा उघडणार का असा प्रश्न राज्यातील शैक्षणिक संस्था व मुख्याध्यापकांना पडला आहे. व्हॅक्सीन आल्याशिवाय शाळा, महाविद्यालय उघडू नये अशी मागणी पालकांकडून होत असतांना 50 टक्के शिक्षक, शिक्षकेतरांना शाळेत उपस्थित राहण्याची सक्ती करणारा शासन निर्णय तातडीने मागे घ्या अशी मागणी आमदार कपिल पाटील व शिक्षक भारतीने केली आहे, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली.

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये शिक्षक शिक्षकेतरांना प्रवेश देण्यापूर्वी शाळांचे निर्जंतुकीकरण करणे, हँडवॉश, सॅनिटायझर उपलब्ध करून देणे, सहा फुट अंतर ठेवणे, 3 ते 4 तासानंतर सॅनिटायझेशन करणे, शाळेत प्रवेश करतांना थरमल स्कॅनरने तापमान तपासणे, अध्यापन साहित्य, संगणक, लॅपटॉप, प्रिंटर या उपकरणांचे 70 टक्के अल्कोहल वाईफने निर्जंतुकीकरण इत्यादी बाबींचा समावेश केला आहे. या संपूर्ण  व्यवस्थेसाठी शैक्षणिक संस्थाना किमान 25 हजार ते 1 लाखापर्यंत खर्च येणार आहे. त्याची कोणतीही आर्थिक मदत शासनाने जाहीर केलेली नाही. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीच्या प्रमुखांची परवानगी न घेता शाळा सुरु करणे म्हणजे लहान मुलांच्या आयुष्याशी खेळ केल्यासारखे होईल. शासनाने विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना व्हॅक्सीन दिल्याशिवाय बोलावू नये. अशी मागणी केली आहे.


बँकांनी प्रलंबित कर्ज प्रकरणांचा तात्काळ निपटारा करावा- जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी


सांगली,(जत न्यूज वृत्तसेवा)-

 बँकांनी पीककर्जासाठी संवेदनशिलपणे व सुलभतेने कर्ज वितरण करावे. स्वयंरोजगाराला चालना देण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. विविध योजनेंतर्गत जी कर्ज प्रकरणे मंजुर झाली आहेत अशांना लवकरात लवकर वित्त पुरवठा करावा व जी कर्ज प्रकरणे प्रलंबित आहेत त्यांचा तात्काळ निपटारा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले.

जिल्हास्तरीय पुनर्विलोकन सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक राजेंद्र यादव, नाबार्डचे श्री. धानोरकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक दिपक चव्हाण, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक नितीन कोळेकर, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी श्री. बिळगी यांच्यासह विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

यावर्षी खरीपासाठी 1 हजार 497 कोटी 50 लाख रुपयांचे तर रब्बीसाठी 1 हजार 97 कोटी 50 लाख रुपयांचे पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट आहे. एप्रिल ते सप्टेंबर अखेर खरीपासाठी 1 लाख 70 हजार 15 खातेदारांना 1387 कोटी 77 लाख रुपयांचे पीककर्ज वितरण करण्यात आले. खरीप हंगामासाठी पीककर्ज वितरणाची 93 टक्के उद्दिष्टपूर्ती झाली असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

यावेळी नाबार्डच्या वतीने तयार करण्यात आलेल्या सांगली जिल्ह्याच्या सन 2021-22 करीता संभाव्य वित्त पुरवठा आराखडा पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले. सन 2021-22 करीता सांगली जिल्ह्याचा संभाव्य वित्त पुरवठा आराखडा 7115 कोटी 19 लाख रूपयांचा असून यामध्ये प्रामुख्याने शेती / शेतीपुरक क्षेत्रासाठी 4882 कोटी 55 लाख रूपये, सुक्ष्म/लघु/मध्यम उद्योगासाठी 1434 कोटी 30 लाख रूपये आणि इतर प्राथमिक क्षेत्रासाठी 834 कोटी 34 लाख रूपये प्रस्तावित केले आहेत. शेती/शेतीपुरक क्षेत्रामध्ये प्रामुख्याने पिक कर्जासाठी 3200 कोटी 29 लाख, सिंचनासाठी 448 कोटी 52 लाख रूपये, शेती यांत्रिकीकरणासाठी 349 कोटी 47 लाख, मत्स्य, कुक्कुटपालन, पशुपालन आणि दुग्ध व्यवसायासाठी 343 कोटी 40 लाख रूपये, गोदामे/शीतगृहासाठी 56 कोटी 99 लाख रूपये, भुविकास/जमीन सुधारणा 46 कोटी 78 लाख रूपये, शेती माल प्रक्रिया उद्योगासाठी 62 कोटी 60 लाख रूपये, इतर प्राथमिक क्षेत्रामध्ये प्रामुख्याने गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज तसेच जे एल जी/महिला बचत गटासाठी वित्त पुरवठा प्रस्तावित करण्यात आला आहे. या वित्त आराखड्याचा उपयोग अग्रणी बँकेला जिल्ह्यासाठी वार्षिक पत धोरण निश्चित करण्यासाठी तसेच बँकांना वित्त पुरवठ्यासाठी असणारे संभावित क्षेत्र याची माहिती घेण्यासाठी होणार आहे. या बैठकीत विविध प्राधान्यक्रम योजना व महामंडळांकडील योजनांचा आढावाही घेण्यात आला.

Saturday, October 24, 2020

राजे रामराव महाविद्यालयात श्रीमती सुशिलादेवी साळुंखे यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

 


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

श्री स्वामी विवेकानंद  शिक्षण संस्था  कोल्हापूर या संस्थेच्या संस्थामाता श्रीमती सुशिलादेवी  साळुंखे  यांच्या  पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य  डाॅ. व्ही.एस. ढेकळे यांनी संस्थामाता श्रीमती सुशिलादेवी साळुंखे  यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून  अभिवादन केले. यानिमित्ताने प्राचार्य डॉ.ढेकळे यांनी संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या  जीवनातील विविध प्रसंग सांगितले.  ते आपल्या  भाषणात  म्हणाले, शिक्षणमहर्षी डाॅ. बाबूजी साळुंखे यांच्या  ज्ञानयज्ञात त्यांचा  प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष  मोलाचा वाटा आहे. त्यांनी बापूजीच्यां देशसेवेच्या कार्यालाही भुमिगतांना  एक महिना  जेवण देऊन हातभार लावला.तसेच बहुजन समाजाला सुसंस्कारी करण्याचा वसा घेतलेल्या  बापूजीचा दौरा  असे तेव्हा  कोणतीही  प्रापंचिक  अडचण त्या खंबीरपणे सोडवित. त्यामुळे  बापूजींनी ज्ञानगंगा खेड्यापाड्यातील  घरापर्यंत  पोहोचवली. त्यांनी  प्रतिकूल  परिस्थितीतही बापूजींना समर्थसाथ दिली म्हणूनच आज आपण या ज्ञान मंदिरात  अखंड ज्ञानदानाचे काम करीत आहोत. आज आपण त्यांच्या कार्याच्या प्रेरणेतून प्रेरित होऊन सत्य, शील, प्रामाणिकता, त्याग ,पिळवणुकीस आळा या पंचसूत्रीचे आचरण करूया हीच आपल्या संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांना आदरांजली असेल. तसेच या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक  विभागप्रमुख  प्रा.ए. एच. बोगुलवार यांनी केले. तर आभार प्रा.डॉ.बी एम डहाळके यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ. शिवाजी कुलाळ, प्रा.एस. एस. चव्हाण,प्रा.एम. एच.करेनवार, प्रा. के. के.रानगर, तसेच सांस्कृतीक विभागातील सदस्य प्रा. सौ. एन. व्ही. मोरे,प्रा.एम. बी.सज्जन, प्रा.एच. डी. टोगरे, प्रा.पी. जे. चौधरी व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.

जत येथील राजे रामराव महाविद्यालयाला विविध कौशल्याधिष्टीत अभ्यासक्रमांना मंजुरी


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

एन. एस. क्यू. एफ अंतर्गत विद्यापीठ अनुदान आयोग (यु.जी.सी.) यांच्याकडून जत येथील राजे रामराव महाविद्यालयाला कौशल्याधिष्टीत पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही. एस.ढेकळे यांनी दिली.
कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे आहेत-
1) Physics- Instrumentation:self Cleaning Solar Cell Panels
2) Commerce-  Office Automation&E- commerce
3) Chemistry - Soil,Water Analysis &Management
4) Botany- Identification Cultivation and Conservation of  Medicinal Plants.
5) Zoology-Medical  Laboratory Techniques
या अभ्यासक्रमांना गरजू विद्यार्थ्यांनी प्रवेश घेण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे यांनी केले आहे.  अधिक माहितीसाठी कोर्सचे नोडल ऑफिसर प्रा. जी. डी. साळुंके, रसायनशास्त्र विभाग यांचेशी संपर्क साधावा.
मोबाईल नंबर - ०९६६५५८९०६३

Friday, October 23, 2020

सातारा जिल्ह्यातील उपळावी येथील अल्पवयीन मुलीच्या हत्येची चौकशी करावी


होलार समाज संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

सातारा जिल्ह्यातील उपळावी (ता.फलटण) येथील कु. अक्षदा देवीदास ऐवळे या अल्पवयीन मुलीच्या हत्येची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय होलार समाज  संघटनेचे (ए गट) चे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब नामदेव गेजगे यांनी जत तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

जतचे तहसीलदार यांना दिलेल्या  निवेदनात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यातील उपळावी (ता. फलटण) येथील कु. अक्षदा देवीदास ऐवळे या होलार समाजातील अल्पवयीन मुलीची गावातील काही नराधमानी अत्याचार करून अमानुषपणे हत्या केली व नंतर तिचा मृतदेह विहीरीत फेकून दिला. ही घटना माणूसकीला काळीमा फासणारी अत्यंत  संतापजनक आणि  दुदैवी घटना आहे. या घटनेची सखोल उच्च स्तरीय चौकशी करून नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहीजे. सदर खटल्यासाठी सरकारी वकिल म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी तसेच पिडीत कुटूंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे व लवकर न्याय न मिळाल्यास संघटनेच्यावतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब ऐवळे, राजाराम जावीर, सतीश गेजगे, दिनकर पतंगे, प्रकाश देवकुळे यांच्या सह्या आहेत. 

Monday, October 19, 2020

जिल्ह्यातील सर्व गावातील आठवडा बाजार सुरू करा


जनसेवा संघटनेचे अध्यक्ष शंभोराज काटकर यांचे आवाहन

सांगली,(जत न्यूज वृत्तसेवा)-

सांगली, मिरज, कुपवाड शहरांप्रमाणे जिल्ह्यातील नगर पालिका आणि सर्व गावातील आठवडा बाजार सुरू करण्यात यावेत. स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी आणि प्रशासनाने सहकार्य करावे असे आवाहन जनसेवा फळे भाजीपाला आणि खाद्यपेय विक्रेता संघाचे अध्यक्ष शंभोराज काटकर यांनी केले आहे.

    श्री. काटकर यांनी पत्रकात म्हटले आहे की, जनसेवा संघटनेच्या पाठपुराव्याला प्रतिसाद देत मुख्यमंत्री उध्दव जी ठाकरे यांनी राज्यातील सर्व आठवडा बाजार सुरू करण्यास परवानगी दिली आहे.  जिल्ह्यातील सलगरे, माधवनगर आणि बुधगाव या बरोबरच जिल्ह्यातील काही बाजार तेथील गावचे व्यापारी, शेतकरी आणि सरपंच यांच्यासह सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी यांनी अत्यंत गतीने निर्णय घेऊन बाजार सुरू केले. त्यामुळे परिसरातील शेतमाल विक्रीची सोय झाली. जनतेला गेले सात महिने न मिळालेल्या अत्यावश्यक वस्तू सहज उपलब्ध झाल्या. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील अर्थचाके गतिमान होण्यास मदत होणार आहे. सध्या बाजारात भाजीपाल्याची टंचाई आहे. पावसामुळे शेतमाल बाहेर काढता येत नाही.  त्यामुळे दर वाढलेले आहेत. शेतकरी आपला भाजीपाला बाजारात आणून शकले तर त्यांचा आर्थिक भारही हलका होणार आहे. त्यामुळे बाजार सुरू होणे ही शहर आणि ग्रामीण भागाची गरज आहे. गावोगावच्या भाजिपला विक्रेत्यांना व्यवसाय पुन्हा सुरळीत करण्यासाठी दहा हजाराचे कर्ज सरकार देत आहे. त्यामुळे हे व्यापारीही पुन्हा उभे राहणार आहेत. याचा विचार करून मोठ्या नगर पालिका नगर पंचायती आणि ग्राम पंचायतीने तातडीने बाजार सुरू करावेत. कर्जासाठी भाजीपाला विक्रेते आणि व्यापाऱ्यांनी संघटनेशी 9970555570 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन ही जनसेवा संघटनेचे अध्यक्ष शंभोराज काटकर यांनी केले आहे.

Tuesday, October 13, 2020

अतिवृष्टी कालावधीत नागरिकांनी दक्षता घ्यावी - जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी 1077 टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा

सांगली,(जत न्यूज वृत्तसेवा)-

आंध्रप्रदेशच्या उत्तर किनारपट्टीवर निर्माण झालेला तीव्र कमी दाबाचा पट्टा हा तेलंगणा राज्यातील खम्माम व आंध्रप्रदेश येथील काकीनाडा किनारपट्टीवर प्रवेश करणार आहे. या परिस्थितीमुळे दिनांक 13 ते 14 ऑक्टोबर 2020 या कालावधीत पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार मध्य महाराष्ट्रामध्ये दि. 13 ऑक्टोबर रोजी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस व दि. 14 ऑक्टोबर रोजी अत्यंत मुसळधार पाऊसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अतिवृष्टीच्या कालावधीत सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.

 मुसळधार पावसात आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे. घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. पाऊस पडत असताना, विजा चमकत असल्यास नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये. मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलेक्ट्रीक वस्तूपासून दूर रहावे. अशा परिस्थितीत पक्के घर किंवा इमारतीत आसरा घ्यावा. मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या कुठल्याही प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये मदतीसाठी 1077 या टोल फ्री आपत्ती व्यवस्थापन क्रमांकावर संपर्क साधावा. कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये व अफवा पसरवू नये. कुठल्याही अशा मिळालेल्या बातमीची खात्री अधिकृत सुत्राकडून करून घ्यावी. अतिवृष्टी होत असताना कोणीही नदी नाला इत्यादी ठिकाणी प्रवेश करू नये. पूराच्या पाण्यात नागरिकांनी सेल्फी काढू नये. DAMINI Lighetening Alert हे ॲप आपल्या क्षेत्रात पडणाऱ्या आगाऊ वीजपडीची माहिती देते. तसेच वीजपडीपासून संरक्षण करावयाच्या उपाय योजनांची माहिती देते. तरी हे ॲप प्ले स्टोर वरून डाऊनलोक करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या आहेत.


Monday, October 12, 2020

डफळापूर येथील जि. प. शाळा क्र.2 मधील विद्यार्थिनींचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश


डफळापूर,(जत न्यूज वृत्तसेवा)-

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च माध्यमिक (इयत्ता-पाचवी ) शिष्यवृत्ती व पूर्व माध्यमिक (इयत्ता-आठवी ) शिष्यवृत्तीचा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यात जत तालुक्यातील डफळापूर येथील जिल्हा परिषद मुलींची शाळा नं 2 मधील विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामुळे त्यांचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.  विशेष म्हणजे या शाळेतील विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती परीक्षेत सलग पाचव्या वर्षी उज्ज्वल यश संपादन केले. उत्तम नियोजन व त्याप्रमाणे कार्यवाही यामुळेच शाळेचा निकाल 65 टक्के लागला आहे व केंद्रातील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थीनाही याच शाळेतील आहेत, अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिकांनी दिली. शाळेतील यशस्वी मुलींची नावे अशी: कु. हाफ्सा नौशाद तांबोळी (232), कु. अनुष्का अजितराव माने (176), कु. तमन्ना अरमान तडवी (176), कु. तृप्ती राजू शिंदे(160), कु. चेतना लक्ष्मण केंगर (154), कु. हर्षता शहाजी पाटोळे (148), कु. ऋतुजा प्रशांत माने (136), कु. साक्षी बाळासाहेब माने (126), कु.लक्ष्मी श्रीकांत कोष्टी (124).यशस्वी मुलींचे डफळापूर केंद्राचे केंद्रप्रमुख रतन जगताप व शंकर बेले, मुख्याध्यापिका रेखा कोरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोटू शिंदे, उपाध्यक्ष हणमंत कोळी  व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांनी कौतुक केले. शाळेतील शिक्षक उदयोगरत्न संकपाळ, अलका पवार ,शंकर कुंभार, सुषमा चव्हाण, अजय डोंगरे यांचे विद्यार्थिनींना मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थिनींचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Friday, October 9, 2020

मुलानेच केला बापाचा खून; जत तालुक्यातील बिळूर येथील घटना


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

 मुलानेच आपल्या जन्मदात्या बापाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना जत तालुक्यातील बिळूर येथे गुरुवारी रात्री उशिरा घडली. भीमू सत्याप्पा जामगोंड (वय 83) असे मयताचे नाव आहे. तर  सदाशिव भीमु जामगोंड (रा. बिळूर वय-35) असे खून करणाऱ्या मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे जत तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मयताच्या मुलीला सोन्याची अंगठी कुणाला विचारून दिली या कारणावरून घरात बाप आणि मुलामध्ये वादावादी सुरू झाली याचे पर्यवसान भांडणात झाले. शेवटी रागाच्या भरात मुलाने जन्मदात्या बापाचा दगडाने ठेचून खून केला. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात मयताची मुलगी महानंदा राजेन्द्र कोरे (रा. बेडग, ता. मिरज) हिने फिर्याद दिली आहे. आरोपीला जत पोलिसांनी अटक केली असून आधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कांबळे करीत आहेत.

कंठी येथील धनाजी नामदेव मोटे याचा अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून व डोके दगडाने ठेचून निघृनपणे खून

एका संशयित आरोपीला पोलिसांनी चौकशीसाठी घेतलं ताब्यात


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार व गुंड धनाजी नामदेव मोटे (वय 45 , रा. कंठी, ता. जत) याचा अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून व डोके दगडाने ठेचून निघृनपणे खून केल्याची  धक्कादायक घटना घडली आहे.जत तालुक्यातील कंठी येथे गुरूवारी मध्यरात्री मरगुबाई देवीच्या मंदिराजवळ ही घटना घडली. खूनाचे नेमके कारण समजू शकले नाही.

या घटनेनंतर मारेकरी फरार झाले होते. त्याचा शोध घेतला असता एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले.दरम्यान  जत पोलिस पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, धनाजी मोटे हा हत्यारांची तस्करी, यासह अनेक गुन्हे जत पोलिस ठाण्यात दाखल आहेत.तसेच सांगली शहर पोलिसात ही त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. गुरूवारी मध्यरात्री एकच्या  सुमारास धनाजी मोटे यांचा अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून व डोक्‍यात दगड घालून निघृनपणे खून केला. या घटनेनंतर परिसरात खळबळ माजली होती. 

दरम्यान, शुक्रवारी पहाटे घटनास्थळी मृतदेहाजवळ दुचाकी व बंदुकीच्या गोळ्या आढळून आल्या आहेत. तर जत उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले, पोलिस निरीक्षक उत्तम जाधव ,पोलीस नाईक केरबा जाधव,प्रशांत गुरव,प्रवीण पाटील व  सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. तपासाची चक्रे फिरवत जत पोलिसांकडून एका संशयित आरोपीला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतल आहे.तर अन्य आरोपींच्या शोधात जत पोलिसांची तीन पथके तर  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखांची पथके  रवाना केली आहेत.

Monday, October 5, 2020

कोरोना काळात अहोरात्र झटणाऱ्या आशा सेविकांना प्रोत्साहन भत्ता देण्याचा जत नगरपरिषदेचा निर्णय


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

जत शहरात कोरोना संसर्ग वाढला असताना ही अशा परिस्थितीत आशा सेविका आपला जीव धोक्यात घालून अहोरात्र आपले काम करत आहेत. त्यांना मागणीनुसार प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय जत नगरपरिषदेने घेतला आहे. त्यामुळे आज (सोमवारी) होणारे आंदोलन स्थगित करण्यात आले. ही माहिती कॉ. हणमंत कोळी यांनी दिली.

सोमवार दि. 5 ऑक्टोबर रोजी जत नगरपरिषद समोर आशा सेविका यांच्या प्रोत्साहन भत्त्या संदर्भात धरणे आंदोलनाला बसण्यात येणार होते  पण नगरपरिषदेने संघटनेच्या पदाधिकारी यांना बैठकी साठी बोलावले होते. या बैठकीच्या चर्चातून जत शहरातील 33 आशा सेविका यांना कोरोनाच्या काळामध्ये अहोरात्र काम करत असल्याबद्दल नगरपरिषद कडून आशा वर्कर्स यांना प्रोत्साहन भत्ता देण्याचे मंजूर केले आहे व जोपर्यंत कोरोना आहे तोपर्यंत आशांना प्रोत्साहन भत्ता देण्याचे ठरले आहे या मिटिंग साठी नगरपरिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. देसाई ,उपनगराध्यक्ष आप्पा पवार ,नगरसेवक स्वप्नील शिंदे , निलेश बामणे ,आशा व गटप्रवर्तक संघटनेचे जिल्हा संघटक कॉ हणमंत कोळी  , आशा वर्कर्स ,ललिता सांवत, लता मदने, रेश्मा शेख ,व इतर अनेक आशा वर्कर्स या उपस्थित होत्या.

Thursday, October 1, 2020

दरवाढ करार झाल्याशिवाय मजूर ऊसतोड करणार नाहीत-आमदार पडळकर


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

 'नवीन दरवाढीचा करार मान्य होईपर्यंत राज्यातील ऊस तोड मजूर ऊस तोडणीसाठी जाणार नाहीत', असा इशारा माजी मंत्री सुरेश धस आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत तालुक्यातील संख येथे दिला.

 जत तालुक्यातील संख येथील संत बागडे बाबा मंगल कार्यालयात उसतोड मजूर व ऊस तोड मजुरांच्या आंदोलनाची घोषणा आणि सुरुवात करण्यात आली यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार गोपीचंद पडळकर, चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज, जि. प. सभापती तम्मन्नगौडा रवी-पाटील, आजिंक्यतारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकर जाधव, काम्माण्णा बंडगर, बिळूरचे लक्ष्मण जखगोंड यांच्यासह आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना धस म्हणाले राज्यातील ऊस तोड मजूर, वाहतूकदार आणि मुकादम संघटनांचा करार संपला आहे. नवीन दरवाढीचा करार करण्याकडे राज्य सरकार आणि साखर कारखानदारांनी दुर्लक्ष केले आहे, असा आरोप करत धस आणि पडळकरांनी आंदोलनाची घोषणा केली. सुरेश धस यांनी ऊस तोड मजूर, मुकादम आणि वाहतूकदार यांच्या प्रश्नावरुन राज्य सरकार आणि साखर संघाला इशारा दिला. सध्या अधिवेशन सुरु नसले तरी सरकारने कायदा करण्याची तयारी सुरु करावी. आम्ही राज्य सरकारला मदत करु, असे धस म्हणाले. ऊस तोडणी मजुरांचा करार २०१४ ला झाला होता. त्याला आता सहा वर्षे झाली आहेत. त्यावेळची परिस्थिती दुष्काळी होती. यापुढे दर तीन वर्षांनी करार करण्यात यावेत अशी मागणी धस यांनी केली. ऊस तोडणीच्या दरात १५० टक्के वाढ करावी, अशी मागणी धस यांनी केली. ऊस वाहतूकदार यांचाही प्रश्न गंभीर आहे.

डिझेल ५२ रुपये प्रतिलिटर होते त्यावेळच्या दरात ऊस वाहतूक करावी लागते. डिझेलचे प्रतिलिटर दर ८२रुपयांवर गेले आहेत. त्यांचाही प्रश्न सोडवण्याची मागणी धस यांनी केली.ऊस तोड मजूर, मुकादम आणि वाहतूकदारांच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, सुरेश धस यांच्या सूचने नुसार आंदोलन करण्यात येत आहे. सरकारने या प्रश्नाची दखल न घेतल्यास दि. 5 ओक्टोंबर पासून राज्यव्यापी आंदोलन तीव्र करण्यात येईल. ऊसतोड मजुरांना न्याय मिळाला पाहिजे. ऊसतोडणीच्या कामासाठी आल्यानंतर अनेक मजुरांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे मजुरांचा आणि बैलांचा विमा उतरवण्यात यावा, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.