Thursday, October 1, 2020

दरवाढ करार झाल्याशिवाय मजूर ऊसतोड करणार नाहीत-आमदार पडळकर


जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

 'नवीन दरवाढीचा करार मान्य होईपर्यंत राज्यातील ऊस तोड मजूर ऊस तोडणीसाठी जाणार नाहीत', असा इशारा माजी मंत्री सुरेश धस आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत तालुक्यातील संख येथे दिला.

 जत तालुक्यातील संख येथील संत बागडे बाबा मंगल कार्यालयात उसतोड मजूर व ऊस तोड मजुरांच्या आंदोलनाची घोषणा आणि सुरुवात करण्यात आली यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार गोपीचंद पडळकर, चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज, जि. प. सभापती तम्मन्नगौडा रवी-पाटील, आजिंक्यतारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रभाकर जाधव, काम्माण्णा बंडगर, बिळूरचे लक्ष्मण जखगोंड यांच्यासह आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना धस म्हणाले राज्यातील ऊस तोड मजूर, वाहतूकदार आणि मुकादम संघटनांचा करार संपला आहे. नवीन दरवाढीचा करार करण्याकडे राज्य सरकार आणि साखर कारखानदारांनी दुर्लक्ष केले आहे, असा आरोप करत धस आणि पडळकरांनी आंदोलनाची घोषणा केली. सुरेश धस यांनी ऊस तोड मजूर, मुकादम आणि वाहतूकदार यांच्या प्रश्नावरुन राज्य सरकार आणि साखर संघाला इशारा दिला. सध्या अधिवेशन सुरु नसले तरी सरकारने कायदा करण्याची तयारी सुरु करावी. आम्ही राज्य सरकारला मदत करु, असे धस म्हणाले. ऊस तोडणी मजुरांचा करार २०१४ ला झाला होता. त्याला आता सहा वर्षे झाली आहेत. त्यावेळची परिस्थिती दुष्काळी होती. यापुढे दर तीन वर्षांनी करार करण्यात यावेत अशी मागणी धस यांनी केली. ऊस तोडणीच्या दरात १५० टक्के वाढ करावी, अशी मागणी धस यांनी केली. ऊस वाहतूकदार यांचाही प्रश्न गंभीर आहे.

डिझेल ५२ रुपये प्रतिलिटर होते त्यावेळच्या दरात ऊस वाहतूक करावी लागते. डिझेलचे प्रतिलिटर दर ८२रुपयांवर गेले आहेत. त्यांचाही प्रश्न सोडवण्याची मागणी धस यांनी केली.ऊस तोड मजूर, मुकादम आणि वाहतूकदारांच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, सुरेश धस यांच्या सूचने नुसार आंदोलन करण्यात येत आहे. सरकारने या प्रश्नाची दखल न घेतल्यास दि. 5 ओक्टोंबर पासून राज्यव्यापी आंदोलन तीव्र करण्यात येईल. ऊसतोड मजुरांना न्याय मिळाला पाहिजे. ऊसतोडणीच्या कामासाठी आल्यानंतर अनेक मजुरांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे मजुरांचा आणि बैलांचा विमा उतरवण्यात यावा, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.No comments:

Post a Comment