Friday, October 23, 2020

सातारा जिल्ह्यातील उपळावी येथील अल्पवयीन मुलीच्या हत्येची चौकशी करावी


होलार समाज संघटनेचे तहसीलदारांना निवेदन

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-

सातारा जिल्ह्यातील उपळावी (ता.फलटण) येथील कु. अक्षदा देवीदास ऐवळे या अल्पवयीन मुलीच्या हत्येची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय होलार समाज  संघटनेचे (ए गट) चे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब नामदेव गेजगे यांनी जत तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

जतचे तहसीलदार यांना दिलेल्या  निवेदनात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यातील उपळावी (ता. फलटण) येथील कु. अक्षदा देवीदास ऐवळे या होलार समाजातील अल्पवयीन मुलीची गावातील काही नराधमानी अत्याचार करून अमानुषपणे हत्या केली व नंतर तिचा मृतदेह विहीरीत फेकून दिला. ही घटना माणूसकीला काळीमा फासणारी अत्यंत  संतापजनक आणि  दुदैवी घटना आहे. या घटनेची सखोल उच्च स्तरीय चौकशी करून नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहीजे. सदर खटल्यासाठी सरकारी वकिल म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी तसेच पिडीत कुटूंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे व लवकर न्याय न मिळाल्यास संघटनेच्यावतीने राज्यभर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब ऐवळे, राजाराम जावीर, सतीश गेजगे, दिनकर पतंगे, प्रकाश देवकुळे यांच्या सह्या आहेत. 

No comments:

Post a Comment